Next
कल्पक व्यावसायिक बनायचंय? हा आहे ‘वाटाड्या’!
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Saturday, May 05 | 06:33 PM
15 0 0
Share this story

२१व्या शतकात, अनेक क्षेत्रांत तंत्रज्ञानानं उत्तुंग झेप घेतली असतानाच नोकरीच्या संधी कमी होताना दिसतात. अनेक माणसांनी करायची किचकट कामं कॉम्प्युटर्समुळे चुटकीसरशी होत असतात. पूर्वीची अनेक प्रॉडक्ट्स इतिहासजमा झालेली आहेत आणि ते बनवणाऱ्या कंपन्यांना नवीन प्रॉडक्ट्सकडे वळावं लागलं आहे. आजकालच्या जीवघेण्या स्पर्धेत माणूस नुसता शिकलेला असून भागत नाही, तर त्यानं कल्पक असल्याशिवाय यशस्वी होणं कठीण आहे. याची सांगोपांग माहिती देणारं पुस्तक म्हणजे श्रीरंग गोखले लिखित ‘कल्पकतेचे दिवस.’ त्याचा हा परिचय...
...........
एकीकडे नोकरीच्या संधी कमी होत आहेत म्हणून म्हणा किंवा स्वतःचा व्यवसाय हवा या स्वप्नाने भारलेले आहेत म्हणून म्हणा, पण अनेक तरुण, छोटासा का होईना, उद्योग सुरू करायचं ठरवतात; पण त्यांना योग्य मार्गदर्शक, योग्य वेळी नाही मिळाला, तर त्या धंद्यात बरेच धोके संभवतात किंवा मनासारखं यश मिळण्यात अडचणी निर्माण होतात. अशा व्यवसायोत्सुक तरुणांना नक्कीच मार्गदर्शक ठरणारं, त्यातले संभाव्य खाचखळगे दाखवणारं आणि अतिशय नियोजनबद्धप्रकारे व्यवसाय चालू करून वृद्धी कशी करता येईल, याचं उपयुक्त ज्ञान देणारा वाटाड्या, श्रीरंग गोखले यांच्या ‘कल्पकतेचे दिवस’ या पुस्तकाच्या रूपाने समोर आला आहे.

श्रीरंग गोखले यांना पुण्यात ‘फिलिप्स’सारख्या ख्यातनाम कंपनीत, ‘ड्राफ्ट्समन’ पदापासून ते ‘संशोधन आणि विकास खात्याचे प्रमुख’ अशा पदांपर्यंत तब्बल ३४ वर्षं काम करण्याचा अनुभव आहे. या अनुभवाचा पुरेपूर वापर करून, अत्यंत सोप्या आणि समजायला सुलभ अशा पद्धतीचं हे पुस्तक त्यांनी तरुण वाचकांसमोर आणलं आहे. २३ प्रकरणं आणि तीन परिशिष्टं अशा एकूण २६ भागांत या पुस्तकाची मांडणी केली आहे. 

गोखले यांनी आपल्या फिलिप्ससारख्या प्रख्यात कंपनीतल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेऊन अगदी बारीकसारीक उदाहरणं देऊन ‘मूलभूत संशोधन, डिझाइन, डेव्हलपमेंट, प्रॉडक्शन, क्वालिटी, मार्केटिंग, सेल, आणि आफ्टर सर्व्हिस’ अशा अनेक संकल्पना नीट समजावून दिल्या आहेत. 

‘आयडिया टू इम्प्लिमेंटेशन’मधले सर्व टप्पे, इंडस्ट्रियल डिझाइन, शहरी ग्राहक आणि ग्रामीण ग्राहक यांचा वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन, बेंचमार्किंग, क्वालिटी, व्हॅल्यू अॅडिशन अशा कितीतरी बाबींवर त्यांनी सखोल आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली आहे. 

ग्राहकाला हव्या त्या गुणवत्तेचा माल देताना नव्या परिभाषेप्रमाणे वस्तूचं मोल हे वस्तूची उपयुक्तता आणि त्यासाठी मोजली जाणारी किंमत यावर ठरत असतं, याविषयी गोखले यांनी ‘अशी ठरवा किंमत’ या स्वतंत्र प्रकरणातून प्रकाश टाकला आहे. यशस्वी उद्योजक घडण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता असते हेही त्यांनी ‘असा घडतो उद्योजक’ या स्वतंत्र प्रकरणामधून खुबीनं मांडलं आहे.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे समस्या दूर करण्यासाठी आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरायची सर्व नवीन तंत्रं - ‘प्रॉब्लेम सॉल्व्हिंग टेक्निक, इशिकावा डायग्रॅम, पॅरेटो चार्ट, फेल्युअर मोड आणि इफेक्ट अॅनालिसिस, क्वालिटी फंक्शन डिप्लॉयमेंट’- गोखले यांनी तपशीलवार समजावून सांगितली आहेत. 

सर्वांत शेवटी विक्रीचं महत्त्वाचं तंत्र - SPACER म्हणजे सस्पेक्टिंग, प्रॉस्पेक्टिंग, अॅडव्हाइस, क्लोझिंग, अर्निंग, रिपीट अर्निंग - या टप्प्यांची पूर्ण माहिती देऊन त्यांनी नवीन उद्योजकांना सजग केलं आहे. शेवटी परिशिष्टामध्ये त्यांनी वस्तू निर्मिती प्रक्रियेत डिझाइन, क्वालिटी आणि प्रॉडक्शनचा असणारा सहभाग तक्त्यांच्या साह्याने समजावून दिला आहे. 

या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे वाचकांना उत्पादन प्रक्रिया, डिझाइन, मार्केटिंगविषयी सांगताना गोखले यांनी आपल्या ‘फिलिप्स’च्या करिअरमधल्या प्रत्यक्ष उत्कंठावर्धक घटनांचा, माणसांचा आणि त्यांनी केलेल्या परिश्रमांचा आणि रिझल्ट्च्या कथा सांगितल्या आहेत. त्यामुळे तो मुद्दा वाचकांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचतो. 

नवउद्योजकांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणारं हे पुस्तक उत्पादन प्रक्रिया, गुणवत्ता, ग्राहकाभिमुखता यांची सुंदर माहिती देणारं आहे. त्यामुळे अवश्य वाचावं असंच.

पुस्तक : कल्पकतेचे दिवस   
लेखक : श्रीरंग गोखले     
प्रकाशक : पराग गोरे 
संपर्क : ९८९०० ४००१३    
पृष्ठे : २०६  
मूल्य : २१० ₹ 

(‘कल्पकतेचे दिवस’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link