Next
कुसुमाग्रज, ज्योत्स्ना देवधर, श्याम आफळे
BOI
Tuesday, February 27 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा’ लिहिणारे श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर; स्त्रीला किती आणि कुठल्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं ते आपल्या समर्थ लेखणीद्वारे मांडणाऱ्या लोकप्रिय कादंबरीकार ज्योत्स्ना देवधर आणि पुष्पा भावे यांनी ज्यांचा उल्लेख ‘एक घराणं’ म्हणून केला ते आघाडीचे कथाकार आणि नाटककार श्याम मनोहर आफळे यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
.......
विष्णू वामन शिरवाडकर

२७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यामध्ये जन्मलेले गजानन रंगनाथ तथा वि. वा. तथा तात्यासाहेब शिरवाडकर तथा कुसुमाग्रज हे मराठी भाषेमधलं एक अलौकिक व्यक्तिमत्त्व!! ज्ञानपीठ पुरस्कार विजेते शिरवाडकर हे मराठीचे अग्रेसर कवी, लेखक, नाटककार आणि समीक्षक म्हणून अवघ्या जगात प्रसिद्ध आहेत. ओजस्वी आणि तेजस्वी भाषा हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. त्यांनी आपल्या अनुपम भाषावैभवाची उधळण आपल्या नटसम्राट, कौन्तेय, वीज म्हणाली धरतीला, बेकेट यांसारख्या असंख्य नाटकांमधून आणि विशाखा, समिधा, हिमरेषा यांसारख्या अनेक काव्यसंग्रहांमधून रसिकांवर केली आणि त्यांना मोहवून टाकलं. धाकटी बहीण कुसुम म्हणून कुसुमाग्रज हे टोपणनाव घेऊन त्यांनी कविता लिहिल्या. त्यांच्या अफाट कर्तृत्वाचा गौरव म्हणून त्यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. 

लहानपणी रामायण, महाभारत, सरदेसायांच्या रियासतीबरोबरच आपट्यांच्या कादंबऱ्या आणि प्रामुख्याने गडकऱ्यांच्या नाटकांवर शिरवाडकरांचा पिंड पोसला गेला. त्यामुळेही असेल, पण त्यांची नाटकाकडे विशेष ओढ होती. त्यांनी लिहून ठेवलंय, ‘कित्येक वर्षे गडकऱ्यांची नाटके मी पुन्हा पुन्हा नवीन उत्साहाने वाचून काढी. त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. दिव्यावर दिवा पेटला...’ . त्यांनी नाटकात काम करायचा प्रयत्नही केला होता; पण नाटकात ‘तू शेवटी माझे दात माझ्याच घशात घातलेस’ या संवादाऐवजी त्यांनी ‘तू शेवटी तुझे दात माझ्या घशात घातलेस’ म्हणून फजिती करून घेतली होती आणि नाटकात काम करण्याचा नाद सोडला; मात्र त्यांनी नाटककार म्हणून जी कामगिरी केली ती अफाटच! आणि अगदी तसंच गडकरींची काव्य वाचून त्यांना कविता करण्याचीही स्फूर्ती मिळाली. गडकरींप्रमाणेच त्यांना आणखी एका लेखकाने स्फूर्ती दिली ती म्हणजे पी. जी. वुडहाउसने! त्याच्या आकंठ प्रेमात बुडालेल्या शिरवाडकरांनी त्याचं लेखन जिथे प्रसिद्ध होत असे त्या इंग्लंडच्या ‘स्ट्रँड’ मासिकातच थेट लेख पाठवून दिला होता.

किनारा, जाईचा कुंज, जीवनलहरी, मराठी माती, मेघदूत, रसयात्रा, वादळवेल, विशाखा, समिधा, स्वगत, हिमरेषा यांसारखे जवळपास २२ कवितासंग्रह, ऑथेल्लो, आनंद, आमचं नाव बाबुराव, किमयागार, कैकेयी, कौन्तेय, जेथे चंद्र उगवत नाही, दुसरा पेशवा, नटसम्राट, बेकेट, महंत, मुख्यमंत्री, ययाति देवयानी, राजमुकुट, विदूषक, वीज म्हणाली धरतीला, वैजयंती यांसारखी २२ नाटकं; आहे आणि नाही, अपॉइंटमेंट, बारा कथा, जान्हवी, काही वृद्ध काही तरुण, कल्पनेच्या तीरावर, प्रेम आणि मांजर यांसारखे कथासंग्रह, याशिवाय अनेक एकांकिकासंग्रह, निबंधलेखन, कादंबऱ्या, असं त्यांचं विपुल लेखन लोकप्रिय आहे. 

त्यांच्या ‘जीवनलहरी’ मधल्या काही पंक्ती –

फडफडसी, तडफडसी
जाळसि का जीवन रे,
क्षुद्रांच्या बाजारी
क्षुद्रतेस मोल भरे!
हृदयाचे मोठेपण
पडतिल त्यावरती घण
काचमणी मांडुनि बस ,
दडवुनिया ठेव हिरे!
..............
कुंजाच्या जाळीतुन
चंद्रकिरण पाझरती
चरणांशी लहरे जळ
चंद्रमुखी सांगाती
झुळझुळती वाऱ्यावर
मंजुळसे गीतस्वर
संगम स्वर्भूमिचा
सीमा नि:सीम बने!...

१९६४ सालच्या मडगावमधल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तसंच मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषेदेचे ते अध्यक्ष होते.

१९७० साली कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठी नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं.

दहा मार्च १९९९ रोजी त्यांचं नाशिकमध्ये निधन झालं.

(कुसमाग्रजांच्या निवडक कविता अन् त्यांवरचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील लेख वाचण्यासाठी https://goo.gl/UoDAaC येथे क्लिक करा. कुसुमाग्रजांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/fp3o2p येथे क्लिक करा. आजच्या मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
............... 
ज्योत्स्ना देवधर 

२७ फेब्रुवारी १९२६ रोजी जोधपूरमध्ये जन्मलेल्या ज्योत्स्ना केशव देवधर या मराठीबरोबरच हिंदीमध्ये लिहिणाऱ्या ख्यातनाम कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात. आपल्या विपुल आणि स्वतंत्र साहित्याने त्यांनी आपलं वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केलं आहे. 

सुरुवातीला ‘घरगंगेच्या काठी’ आणि ‘कल्याणी’ यांसारख्या कादंबऱ्यांनी त्यांनी रसिक वाचकांना आपल्या लेखनाची दखल घ्यायला लावली. राजस्थानात बालपण गेल्यामुळे तिथलं पुरुषसत्ताक जीवन आणि स्त्रियांची कुचंबणा आणि वागणुकीत मिळणारा दुय्यमपणा त्यांनी जवळून पाहिला होता. 

लग्न होऊन पुण्यात राहायला आल्यानंतर त्यांनी बीए, एमए केलं आणि आकाशवाणीवर नोकरी केली. त्या नोकरीनिमित्त त्यांचा सर्वसामान्य गृहिणीपासून ते देवदासी, पतित स्त्रियांपर्यंत सर्वांशी परिचय होत गेला. स्त्रीला किती आणि कुठल्या प्रकारच्या अनुभवांना सामोरं जावं लागतं ते त्यांना समजलं. विविध थरातल्या स्त्रियांचे प्रश्न समजले आणि त्याच्या चिंतनातून पुढे त्यांचं लेखन घडत गेलं. त्यांच्या लेखनात मराठीचा अस्सल बाज, स्त्रियांची हळुवार मराठी नजाकत यांचं दर्शन होतं.

एक श्वास आणखी..., मावळती, उद्ध्वस्त, बोंच, फिलर, घरगंगेच्या काठी, कल्याणी, निर्णय, पडझड, रमाबाई, समास, सात घरांच्या सीमारेषा, निवान्त, हो नाहीच्या उंबरठ्यावर, सायली, विंझणवारा, याचि जन्मी, मूठभर माणुसकी, दीर्घा, तेजस्विनी, पुतळा, चेहरा आणि चेहरे, कडेलोट, एरियल, उत्तरयोगी, उणे एक आजीची छडी गोड गोड अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

१७ जानेवारी २०१३ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

(ज्योत्स्ना देवधर यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा)
.....................

श्याम मनोहर आफळे

२७ फेब्रुवारी १९४१ रोजी तासगावमध्ये जन्मलेले श्याम मनोहर आफळे हे कथाकार, नाटककार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. सभ्यता, संस्कृती, अज्ञाताचा शोध, साहित्यविषयक चिंतन, व्यक्तिस्वातंत्र्य यांविषयी त्यांनी प्रामुख्यानं लिहिलं आहे. त्यांनी नववीत असतानाच लेखनाला सुरुवात केली होती. 

‘सावळा विनोद’ (हा त्यांनीच ‘ब्लॅक ह्युमर’साठी वापरलेला शब्द) हे त्यांच्या लेखनाचं एक वैशिष्ट्य आहे. मानवी संबंधात निर्माण होणारे सामाजिक व वैयक्तिक पातळ्यांवरचे भौतिक आणि अधिभौतिक प्रश्न हा त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. त्यांच्या कथालेखनामध्ये साठोत्तरी काळातल्या समाजमनात आर्थिक आणि राजकीय कारणांनी झालेल्या बदलांचं चित्रण आढळतं.

दर्शन, दोन्ही : आणि बाकीचे सगळे बिनमौजेच्या गोष्टी, हे ईश्वरराव... हे पुरुषोत्तमराव..,, खूप लोक आहेत, प्रेमाची गोष्ट?, शंभर मी, शीतयुद्ध सदानंद, यकृत, यळकोट, हृदय, कळ, खेकसत म्हणणे, आय लव्ह यू, सन्मान हौस, उत्सुकतेने मी झोपलो, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

त्यांच्या कथा-कादंबऱ्यांचे गुजराती, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी आणि इंग्लिश यासारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. 

त्यांना कुसुमांजली साहित्य सन्मान, गंगाधर गाडगीळ पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार
, राम गणेश गडकरी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार, ह. ना. आपटे असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

(श्याम मनोहर यांची पुस्तकं बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मिळवण्यासाठी येथे क्लिक करा)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link