Next
खोट्या बातम्यांशी ‘लॉजिकली’ लढा!
BOI
Monday, July 23, 2018 | 01:04 PM
15 0 0
Share this story

लिरिक जैन (Image Courtesy : LinkedIn)फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या तयार केल्या जाणे आणि त्या अफवांच्या रूपाने पसरणे ही सध्या जगभर मोठीच समस्या होऊन बसली आहे. या समस्येवर उत्तर काढण्यासाठी २१ वर्षांच्या एका भारतीय इंजिनीअरने पुढाकार घेतला असून, त्यासाठी त्याने काही महिन्यांपूर्वी इंग्लंडमध्ये ‘दी लॉजिक अॅली’ नावाची स्टार्ट-अप फर्म सुरू केली आहे. लिरिक जैन असे त्याचे नाव असून, तो मूळचा म्हैसूरमधील आहे. खऱ्या बातम्या आणि खोट्या बातम्या ओळखण्यासाठी त्याने ‘मशिन लर्निंग’वर आधारित एक तंत्रज्ञान विकसित केले असून, सध्या त्याच्या चाचण्या सुरू आहेत. हे तंत्रज्ञान येत्या सप्टेंबरमध्ये इंग्लंड व अमेरिकेत, तर ऑक्टोबरमध्ये भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. 

‘तब्बल ७० हजार डोमेनवरील (वेबसाइट्स) मोठ्या बातम्या ‘लॉजिक अॅली’द्वारे गोळा केल्या जातात. त्यांची सत्यासत्यता, विश्वासार्हता पडताळली जाते. त्यासाठी मशिन लर्निंगवर आधारित अल्गोरिदम विकसित करण्यात आला आहे. बातम्यांमध्ये तार्किकदृष्ट्या असलेल्या चुका, राजकीय पक्षपातीपणा, चुकीची आकडेवारी आदी गोष्टी या अल्गोरिदममुळे लक्षात येतील, या दृष्टीने त्याची रचना करण्यात आली आहे,’ असे लिरिक जैन याने सांगितले. 

‘त्यामुळे वाचक वाचत असलेल्या बातम्या किती विश्वासार्ह, दर्जेदार आहेत, याबद्दलची माहिती ‘लॉजिक अॅली’द्वारे पारदर्शकपणे वाचकांपर्यंत पोहोचवली जाईल,’ असेही लिरिकने सांगितले. व्हॉट्सअॅपवरून अफवा ‘व्हायरल’ झाल्यामुळे भारतात अलीकडेच अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर, माहितीची सत्यासत्यता अत्यंत वेगाने पडताळण्याची कृत्रिम बुद्धिमत्तेवरील (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) यंत्रणा विकसित करण्यासाठीही आपली फर्म काम करत असल्याचे त्याने सांगितले. 

भारतात वीस कोटींहून अधिक लोक व्हॉट्सअॅप वापरतात. तसेच त्यातील मेसेजेस ‘एनक्रिप्टेड’ म्हणजेच गोपनीयतेचे संरक्षण पुरविलेले असतात. त्यामुळे एखादी बातमी खोटी आहे हे सिद्ध होईपर्यंत तिचा खूप दूरदूरपर्यंत आणि मोठ्या लोकसंख्येपर्यंत प्रसार झालेला असतो. म्हणूनच अशा बातम्यांचा खरेखोटेपणा तातडीने ओळखणारा एखादा चॅटबॉट व्हॉट्सअॅपवर विकसित करण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचे लिरिक याने सांगितले. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत त्याबाबत घोषणा करण्यात येणार असल्याचेही त्याने सांगितले. 

अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठ या नामवंतं संस्थांतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी ‘लॉजिकली’ या स्टार्ट-अप कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. १० लाख पौंडांचा निधी कंपनीने उभारला असून, इंग्लंड, अमेरिका आणि भारतात मिळून ३८ जण या कंपनीसाठी काम करत आहेत. लवकरच कर्मचाऱ्यांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. मानवी बुद्धिमत्ता, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि गुंतागुंतीचे विश्लेषण यांची सांगड घालून विकसित केले जात असलेले हे तंत्रज्ञान म्हणजे ‘इंटेलिजन्ट न्यूज फीड’ असेल. अशा प्रकारचे हे पहिलेच साधन असेल आणि तेच पत्रकारितेचे भविष्य असेल, असा विश्वास लिरिकला वाटतो. 

‘गुंतागुंतीच्या आणि संभ्रमात टाकणाऱ्या माहितीच्या महासागरातून योग्य प्रकारे मार्ग काढून खरी माहिती मिळवण्यासाठी लोकांना आम्ही विकसित करत असलेले तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल; मात्र चुकीच्या माहितीच्या प्रसारामुळे किंवा वापरामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, याबाबत सरकारने व्यापक जनजागृती आणि लोकशिक्षण करणे आवश्यक आहे,’ असेही लिरिकचे म्हणणे आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link