Next
‘संस्कृत ही सर्वसामान्यांची भाषा व्हावी’
मानसी मगरे
Friday, January 25, 2019 | 01:18 PM
15 0 0
Share this article:


आज अभ्यासक्रमापुरतीच मर्यादित राहिलेली ‘संस्कृत’ ही प्राचीन भारतीय भाषा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘संस्कृत भारती’मार्फत देशभर संस्कृतच्या मोफत प्रशिक्षणाचे आणि प्रचाराचे कार्य सुरू आहे. ‘संस्कृत भारती’चे प्रांतस्तरीय कार्यकर्ता संमेलन २६ व २७ जानेवारी २०१९ रोजी चिंचवडला होणार आहे. त्या निमित्ताने, ‘संस्कृत भारती’चे अखिल भारतीय प्रचार प्रमुख शिरीष भेडसगावकर यांच्याशी साधलेला हा संवाद...
.......................................
‘संस्कृत भारती’ची सुरुवात कधी झाली? या संस्थेच्या कार्याबद्दल थोडं सांगा.
- ‘संस्कृत भारती’ ही ना नफा तत्त्वावर चालणारी स्वयंसेवी संस्था आहे. ती प्राचीन भारतीय भाषा असलेल्या संस्कृतच्या प्रचार-प्रसाराचं कार्य करते. १९८१मध्ये बेंगळुरूमध्ये संस्कृत भाषेसंदर्भात संवाद शिबिराचे कार्य सुरू झाले. पुढे बहुसंख्य लोक या कार्यात सहभागी होत गेले आणि आज समाजातील सर्व स्तरापर्यंत संस्कृत पोहोचवण्यासाठी ‘संस्कृत भारती’द्वारे संपूर्ण देशभर कार्य केलं जात आहे.  देशांतर्गत सुरू असलेल्या कार्याबरोबरच सध्या भारताबाहेर एकूण १६ देशांमध्ये ‘संस्कृत भारती’चं कार्य सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी संस्थेमार्फत अमेरिकेत १०८ शिबिरं घेण्यात आली. आमचा अनुभव असा आहे, की भारतापेक्षा भारताबाहेरील इतर देशांमध्ये संस्कृतात संशोधन करणारी मंडळी अधिक आहेत. तिथे काही शाळांमध्ये आज आवर्जून संस्कृत विषय शिकवला जातो. त्यांनी सांगितलेली यामागची कारणं खूप विलक्षण आहेत. लंडनमध्ये ‘सेंट जेम्स इंडिपेंडंट स्कूल’ नावाची शाळा आहे. त्या शाळेतील काही संशोधकांनी १२ वर्षं संस्कृतचा अभ्यास करून त्यावर संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे, की ज्या मुलांना संस्कृत भाषा शिकवली, त्या मुलांना पुढे गणित, विज्ञान आणि इंडो-युरोपियन कुळातल्या इतर सर्व भाषा शिकणं सोपं झालं. ती मुलं सहजगत्या या विषयांत तरबेज होतात. हे समजल्यानंतर त्या शाळेत आज पहिल्या वर्गापासून संस्कृत शिकवलं जातं. त्यानंतर अशा कित्येक शाळांमधून संस्कृत शिकवण्यास सुरुवात झाली आहे.    

‘संस्कृत भारती’मार्फत कोणकोणते उपक्रम राबविले जातात? 
- जास्तीत जास्त लोकांना सामावून घेता येईल अशा हेतूने आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे कार्य करत आहोत. यात १० दिवस, रोज दोन तास असा एक प्रशिक्षण वर्ग असतो. या दहा दिवसांमध्ये रोजच्या व्यवहारात सामान्यतः लागणारी वाक्यं बोलायला शिकवली जातात. दहा दिवस पूर्ण झाल्यानंतर किमान प्राथमिक संस्कृत बोलता आलं पाहिजे हे ध्यानात ठेवून हा उपक्रम चालवला जातो. या १० दिवसांच्या शिबिराला सध्या खूप प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर पत्रद्वारा संस्कृत हादेखील एक महत्त्वाचा उपक्रम राबवला जातो. यामध्ये पुस्तक आणि इतर आवश्यक साहित्य दिलं जातं. त्या पुस्तकाच्या साह्याने घरी अभ्यास करून पत्राद्वारे मिळालेली प्रश्नपत्रिका सोडवून पुन्हा पत्राद्वारेच पाठवून द्यायची असते. याच्या चार परीक्षा असतात. या उपक्रमासाठी आठवड्यातून एक दिवस असा वर्गही घेतला जातो. त्या त्या विभागात काम करणारे कार्यकर्ते हे वर्ग चालवतात. याव्यतिरिक्त लहान मुलांसाठी बालकेंद्रं चालवली जातात. त्यांमधून गाणी, गोष्टी यांच्या माध्यमातून संस्कृत शिकवलं जातं. शालेय मुलांसाठी शालाबाह्य परीक्षा घेतल्या जातात. चार परीक्षांचा हा उपक्रम आहे. याचे वर्गही घेतले जातात. या वर्षी देशभरात जवळपास अडीच लाख विद्यार्थी या परीक्षा देत आहेत. याशिवाय ‘संवादातून संस्कृत’ या संकल्पनेवर आधारित ‘निरंतर संस्कृत प्रशिक्षण – संवादशाला’ नावाचा उपक्रमही चालवला जातो. यामध्ये दर महिन्यात दोन वेळा, म्हणजे एक ते १५ तारीख आणि १६ ते ३० तारीख या कालावधीत प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. हे वर्ग निवासी असतात. अन्य गरजेनुसार वेगवेगळे वर्गही घेतले जातात. काही वर्ग सुट्ट्यांमध्ये घेतले जातात. हे वर्ग घेणारे कार्यकर्तेही यातूनच तयार होतात. समाजातील संस्कृतप्रेमी लोकांच्या बळावर स्वयंसेवी पद्धतीनं सुरू असलेलं हे कार्य आहे. 

समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं जातं?
- संस्कृत भाषा समाजातील कोण्या एका विशिष्ट वर्गापुरती मर्यादित न राहता सर्वांपर्यंत पोहोचावी, हाच आमचा मुख्य उद्देश आहे. विशेष बाब म्हणजे आम्ही हे कार्य निःशुल्क करतो. त्यामुळे समाजातील सर्व घटक यात सहभागी होऊ शकतात. हे उपक्रम आम्ही एखाद्या आयटी कंपनीत राबवतो, एखाद्या सोसायटीत राबवतो, तसंच गावापासून दूर असलेल्या एखाद्या आदिवासी पाड्यावरही राबवतो. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आम्ही हे उपक्रम आयोजित केले आहेत, तसेच अनेक आदिवासी पाड्यांवरही आम्ही हे प्रयोग करून पाहिले आहेत. ते आदिवासी लोकसुद्धा संस्कृत बोलण्याबाबत उत्सुक दिसले आणि आज ते बोलूही शकतात.  

लोकांना संस्कृत भाषेबद्दल आकर्षण आहे का? या कार्याला प्रतिसाद कसा मिळतो? 
- ‘संस्कृत भारती’च्या माध्यमातून आम्ही देशभर हे कार्य सुरू केलं, तेव्हा असं लक्षात आलं, की लोकांमध्ये संस्कृतबद्दल प्रचंड आकर्षण आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे. आपल्या घरात संस्कृत बोललं जावं, हीदेखील काही जणांची मनीषा आहे. कारण संस्कृत कोण्या एका विशिष्ट प्रांतापुरती, समाजापुरती, स्तरापुरती मर्यादित भाषा नसून ती सर्वव्यापी आहे. संपूर्ण देशभरात पूर्वी संस्कृतचा वापर होता. आजही तिचे अस्तित्व सगळीकडे पाहायला मिळते. त्यामुळे ती प्रादेशिक भाषा नसून संपूर्ण देशाची भाषा आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातून मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. याचाच अर्थ लोकांना आकर्षण आहे. केवळ ती भाषा शिकण्याचं माध्यम साध्या-सोप्या-सरळ पद्धतीनं उपलब्ध होत नव्हतं, म्हणून संस्कृतची आवड जोपासणं किंवा शिकणं दुर्लक्षित राहिलं असल्याचं खूप जणांनी सांगितलं. दुसरा मुद्दा असा, की भाषा शिकायची म्हणजे व्याकरण शिकावं लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल, असे काही साहजिक अंदाज लावले जातात. मग त्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ काढणं तर अगदीच अशक्य. अशा वेळी आमच्यामार्फत राबवला जाणारा पत्रद्वारा संस्कृत हा उपक्रम अतिशय पूरक आणि सोयीचा ठरतो. 

लहान मुलांसाठी काही विशेष उपक्रम राबवले जातात का?
- हो. लहान मुलांसाठी विशिष्ट स्वरूपाची शिबिरं घेतली जातात. त्यांच्यासाठी विशेष बालकेंद्रं चालवली जातात. त्यात त्यांना गाण्यातून, गोष्टींमधून संस्कृत शिकवण्याचा आमचा प्रयत्न असतो. या व्यतिरिक्त चार शालाबाह्य परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी वर्ग घेतले जातात. मुळात आपल्याकडे कोणतीही भाषा शास्त्रीय पद्धतीनं शिकवली जात नाही असं मला वाटतं. कारण केवळ अभ्यासाचा भाग म्हणून वेगवेगळ्या भाषा शिकणाऱ्यांना किती भाषा सहजगत्या बोलता येतात? भाषा आहे, तर ती बोलता आलीच पाहिजे ना. तेच आपल्याकडे होत नाही. कोणतीही भाषा श्रवण-भाषण-पठण-लेखन या पद्धतीने शिकवली पाहिजे. म्हणजेच लिखाणापूर्वी ती बोलता आली पाहिजे. याचसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मुलं एखादी भाषा बोलायला लागली, तर त्यातली गोडी वाढत जाते आणि मग त्या गोडीने त्या भाषेचा अभ्यास केला जातो. हा विचार करता आधी भाषा संभाषणात आली पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. 

‘संस्कृत भारती’ कार्यकर्ता संमेलनाची नेमकी संकल्पना काय? 
- ‘संस्कृत भारती’चं काम सुरू केल्यानंतर हळूहळू देशभर पसरत गेलं. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये ते चालू लागलं. मग एकमेकांच्या कार्यपद्धतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याची गरज भासू लागली. त्यातून कार्यकर्ता संमेलन ही संकल्पना समोर आली. दोन वर्षांपूर्वी ‘उडुपी’ या ठिकाणी अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलन घेण्यात आले होते. नंतर प्रदेश पातळीवर अशी संमेलनं घेण्यास सुरुवात झाली. याच धर्तीवर पश्चिम महाराष्ट्राचे हे संमेलन यंदा चिंचवडला आयोजित करण्यात आलं आहे. सगळ्या संस्कृतप्रेमींनी एकत्र यावं आणि संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, हा यामागील उद्देश आहे. प्रत्येक राज्यात एक याप्रमाणे भविष्यात एकूण ३५ ठिकाणी संमेलनं घेण्याचं प्रयोजन आहे. संस्कृतसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीही संमेलनं घेतली जाणार आहेत. 

शिरीष भेडसगावकर (अखिल भारतीय प्रचार प्रमुख - संस्कृत भारती)‘संस्कृत भारती’च्या कार्यामागचा उद्देश...
- मुळात संस्कृत या आपल्याच भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी भारतातच हे काम करावं लागणं हा खूप मोठा दैवदुर्विलास आहे, असं मला वाटतं. हे म्हणजे इंग्लंडमध्ये इंग्रजीच्या प्रसारासाठी काम करावं लागण्यासारखं आहे. आपल्या देशातलं ज्ञान केवळ संस्कृतमधून आहे, म्हणून ते शिकवलं जात नाही. अर्थशास्त्र शिकवताना आपण बाहेरच्या अर्थतज्ज्ञांपासून सुरुवात करतो. कौटिल्य शिकवला जात नाही. कारण कौटिल्याचं अर्थशास्त्र संस्कृतात आहे. म्हणून आमचा हा संस्कृतबद्दलचा अट्टहास आहे. लोकांनी संस्कृत रोजच्या वापरात आणावं, इतकाच आमचा उद्देश आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. संस्कृत ही कोण्या एका वर्गाची, केवळ विद्वानांची भाषा न राहता ती सर्वसामान्यांची भाषा व्हावी, यासाठी आम्ही तळमळीने प्रयत्न करत आहोत आणि करत राहू. 

संपर्क : 
मुख्य कार्यालय : संस्कृत भारती, दीनदयाळ उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली
पुणे कार्यालय : संस्कृत भारती, आमोदबन को-ऑप. हाउसिंग सोसा. मुंजाबा चाळ रोड, नारायण पेठ 
मोबाइल : ९४२१६००१६५
ई-मेल : samskrutbharatipune@gmail.com
वेबसाइट : www.samskritabharati.in
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Pramod Chavan About 5 Days ago
मी मुंबई महापालिकेचा कर्मचारी आहे.स्वयम् अध्ययन द्वारे संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा आहे. पुस्तकं सुचवावे.किंवा मूल्य कळवावे,त्वरित अदा केली जाईल.
0
0
BDGramopadhye About 121 Days ago
What Mr Dalsvi says , is quite true . However , people do not learn a language for these reasons . They learn a language for its use in everyday life .
0
0
BDGramopadhye About 164 Days ago
It will become a language of everyday use only if it helps people meet their everyday needs . That what man -in-the-street cares for .
0
0
Prathamesh Kale About 257 Days ago
धन्यवाद! उपयोगी माहिती!👍
1
0
प्रमोद गं . पाटसकर About 262 Days ago
मी सुद्धा संस्कृत शिकत आहे.
1
0
अनुराधा विठ्ठल नाझरकर About 264 Days ago
उपक्रम खूपच छान आहे , मलाही या उपक्रमात सहभागी व्हायची ईच्छा आहे , आणि मी सहभागी होणार आहे .....
2
0
रवींद्र पतके About 264 Days ago
सुंदर उपक्रम
1
0
Dhananjay D Dalvi About 264 Days ago
The Sanskrit language, whatever be its antiquity, is of a wonderful structure; more perfect than the Greek, more copious than the Latin, and more exquisitely refined than any other language.. Thanks for sharing information about this noble institute working for great cause..
1
0

Select Language
Share Link
 
Search