Next
‘स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाही’
BOI
Thursday, January 04 | 05:35 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
‘स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाही,’ असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. जागतिक धर्मसभेमध्ये त्यांनी फक्त तीन मिनिटे भाषण केले. ‘माझ्या बंधू-भगिनींनो’ हे शब्द आधीच्या वक्त्यांनीही म्हटले होते. परंतु स्वामींनी हे शब्द उच्चारताच भाव पोहोचवणारा अनुभव साऱ्यांनी घेतला व विजेची लाट गेल्यासारखे वाटून सारे थरथरत होते. अनेकांचे डोळे डबडबले. हा सार्वत्रिक अनुभव असल्याने टाळ्यांचा कडकडाट सुरू होता. यामुळेच स्वातंत्र्यपूर्व काळात आध्यात्मिक राष्ट्रभक्त आणि योद्धा संन्याशी असा नावलौकिक विवेकानंदांनी मिळवला,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.

‘कीर्तनसंध्या’तर्फे रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात तीन जानेवारीपासून कीर्तन महोत्सव सुरू झाला आहे. पहिल्या दिवशी आफळेबुवांनी स्वामी विवेकानंदांवर कीर्तन केले. ‘स्वामींनी अमेरिकेत ११ सप्टेंबरला धर्मसभेत जे भाषण दिले, त्यानंतर जगभरातील लोक त्यांच्या प्रेमात पडले. अमेरिकेत हेल्पलाइनचा ९११ हा नंबर त्यावरून दिला गेला. हे खोडून काढण्यासाठी याच तारखेला भ्याड हल्ला करण्यात आला होता. अमेरिकेतून परत येताना बोटीमध्ये हिंदू धर्माची व ग्रंथांची निंदा करणाऱ्या व्यक्तीला स्वामींनी दोन हातांनी उचलले आणि ‘माझ्या हिंदुस्थानची निंदा करणाऱ्याला समुद्रात फेकून देईन,’ असे ताडकन सांगितले. ब्रिटनमध्येही स्वामींनी हिंदू धर्मसंस्कृती कशी श्रेष्ठ आहे याची भाषणे दिली. ‘स्वतःचा धर्म श्रेष्ठ आहे हे सांगण्याकरिता दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाही,’ असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला.यामुळेच स्वामींची सार्धशती जगभरातील ५१ देशांनी विविध कार्यक्रमांनी साजरी केल्याचा दाखला आफळेबुवांनी दिला.

‘गीतारहस्याने देशभक्ती वाढली’
बुवांनी पूर्वरंगात गीतारहस्य या अवघड ग्रंथावर भाष्य केले. गीतारहस्य हा ग्रंथ ६५० पानांचा असून, तो समजण्यास खूप कठीण आहे; मात्र लोकमान्य टिळकांनी तो स्वातंत्र्यपूर्व काळात लिहून देशभक्ती वाढवण्यासाठी व स्वातंत्र्य मिळवण्यासाठी योगदान दिले. मूर्ख, अविचारी व इंग्रजाळलेल्या शिक्षणामुळे हिंदू धर्माला ग्रंथाला नावे ठेवणाऱ्या लोकांवर टीका केली. मुस्लिम, ख्रिस्ती लोकांचा रोजा, फास्ट म्हणजे उपवास कसा कडक असतो, हे हिंदू सांगतात; पण एकादशीचा उपाससुद्धा करता येत नाही, अशा शब्दांत त्यांनी आसूड ओढला. हे सारे इंग्रजी शिक्षण पद्धतीमुळे घडत आहे. हिंदूंनी स्वतःच्या संस्कृतीचा आणि देशाचा आदर केलाच पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

लोकजागरण करणारी गुरु-शिष्याची जोडी
योद्धा संन्याशी स्वामी विवेकानंदांचा जीवनपट छोट्या छोट्या गोष्टी, गीते, पोवाड्यातून आफळेबुवांनी उलगडला. स्वामी लहानपणी जत्रेत गेले असता घोडागाडीखाली येणाऱ्या लहान बालकाला वाचवताना हातातील शंकराची पिंडी त्यांनी फेकली होती. त्यामुळे ते घाबरले. परंतु आईने ‘तू माणसात श्री शंकर पाहिलास’ असे सांगितले. मोठेपणी ते रामकृष्ण परमहंस यांच्याकडे साधना शिकत होते. ‘पाच वर्षांची साधना झाली. आता मला निर्विकल्प समाधी द्या,’ असे स्वामींनी गुरूंना सांगितले. त्या वेळी गुरूंनी त्यांना ‘हिंदुस्थानातील गरिबी, बेकारी आणि भरकटलेली जनता यांना मार्ग दाखव,’ अशी सूचना केली. ‘मी या देहात नसलो तरी तुझ्यासोबत आहे,’ असे सांगितले. ही जोडी सद्गुरू-सत्शिष्याची आणि लोकप्रबोधन करणारी एकमेव जोडी होती.


‘रामकृष्ण परमहंसांच्या आदेशाप्रमाणे स्वामी विवेकानंद भारतभ्रमणास निघाले. महाराष्ट्रात आल्यावर लोकमान्य टिळकांची भेट घेतली. समाजहिताची काळजी करणाऱ्या या दोन सुधारकांमध्ये बहुधा हिंदूंना एकत्रित आणणारा विराट उत्सव सुरू करण्यासंबंधी चर्चा झाली असावी. या भेटीनंतरच टिळकांनी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केला,’ असे आफळेबुवांनी सांगितले.

आरती व राष्ट्रगीताने सांगता
आफळेबुवांच्या कीर्तनाची सांगता सत्राणे उड्डाणे ही मारुतीची आरती व राष्ट्रगीताने झाली. या कीर्तनात बुवांनी कृष्ण माझी माता, विश्‍वनाथ हे नाव पित्याचे, पद्मनाभा नारायणा, अनादि निर्गुण, देव नाही देव्हाऱ्यात, परिषदेचा तो दिन आला आदी पदे सुरेखपणे ऐकवली. त्यांना अजिंक्य पोंक्षे याने संगीतसाथ केली. तालवाद्यसाथ महेश सरदेसाई यांनी केली. तसेच मधुसूदन लेले, हेरंब जोगळेकर, उदय गोखले व प्रथमेश तारळकर यांचीही वाद्यसाथ मिळाली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link