Next
शाळेतील मुले घडवताहेत शाडूच्या गणेशमूर्ती
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे स्वतंत्र प्रशिक्षणवर्ग
BOI
Saturday, August 31, 2019 | 02:07 PM
15 0 0
Share this article:


पुणे/पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रत्येक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या मूर्तीचीच प्राणप्रतिष्ठा घरी केली जावी, असे आवाहन पालिकेतर्फे पालकांना करण्यात येत आहे. यातून पर्यावरणपूरक मूर्ती निर्माण होत असल्याने हा उपक्रम अन्य कोठेही राबविण्यासाठीही पथदर्शी ठरत आहे.

आपल्या घरी सर्वांत सुंदर, मोठा गणपतीबाप्पा असावा, अशी घरातील मुलांची सहजसुलभ भावना असते. मोठ्यांचाही त्यात सहभाग असतो. त्यामुळे आकर्षक दिसणारी आणि प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेली गणपतीची मूर्ती आणण्याकडे अनेकांचा कल असतो. रासायनिक रंग, प्लास्टर ऑफ पॅरिस यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. पर्यायाने निसर्गाची अतोनात हानी होते. यावर उपाय म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर ह्यांनी एक सुंदर उपाय शोधून काढला आहे. शाळेतील मुलांना शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन, मुलांनी तयार केलेली गणेशमूर्तीच पूजेसाठी वापरण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले आहे. 

महापालिकेच्या १०७ शाळांमध्ये विद्यार्थांना हे प्रशिक्षण देणारे स्वतंत्र वर्ग सुरू करण्यात आले असून, मोठ्या संख्येने मुलांनी शाडूच्या गणेशमूर्ती बनवल्या आहेत. एन्व्हायर्नमेंटल कॉन्झर्वेशन असोसिएशन अर्थात ‘ईएसआय’च्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पालकांनीही मोठ्या उत्साहाने याच मूर्ती गणेशोत्सवासाठी वापरण्याची तयारी केली आहे. या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद बघून सर्व स्तरांतून याचे कौतुक होत आहे. 

या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षिका मनीषा शिंदे म्हणाल्या, ‘स्वतःच्या हाताने गणपतीची मूर्ती घडवता यावी, अशी खूप इच्छा होती. ती या वेळी पूर्ण झाली, याचा खूप आनंद झाला आहे. पर्यावरणरक्षणासाठी शाडू मातीची मूर्ती असणे आवश्यक आहे. मूर्ती बनवण्याची कृती खूप सोपी असून, मुलांना पालकांनी मदत केली तर मुले आणखी सुंदर मूर्ती घडवू शकतील. आम्ही आता मुलांना मूर्ती बनविण्यासाठी अधिक प्रोत्साहन देऊ.’  

‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शासकीय पातळीवरील प्रयत्नांबरोबर जनतेचाही पुढाकार असणे अत्यावश्यक आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या माध्यमातून पालकांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत ही मोहीम पोहोचवता येईल. या कामात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने दिलेल्या पाठबळाच्या जोरावर आम्ही गेल्या वर्षी चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो होतो. यंदा आणखी जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत,’ असे पर्यावरणतज्ज्ञ आणि ‘ईएसआय’चे अध्यक्ष विकास पाटील यांनी सांगितले.  

श्रावण हर्डीकर
‘श्रद्धा महत्त्वाची आहेच; पण आपल्या श्रद्धेचा निसर्गावर विपरीत परिणाम होऊ नये हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी आपल्या मुलांनी बनवलेली छोटी मूर्ती वापरावी, असे आवाहन सर्वांना करत आहोत,’ असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.  

‘प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आठ ते दहा लाख गणेशमूर्ती विकल्या जातात, त्यापैकी चार लाख मूर्तींचे विसर्जन नदीत, तळ्यात केले जाते. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी आपण शाडू मातीपासून आणि नैसर्गिक रंगांचा वापर केलेली छोटी मूर्ती वापरली आणि तिचे घरीच विसर्जन केले, तर हे प्रदूषण कमी करू शकतो. मुलांना शाडू मातीपासून गणपती बनवायला शिकवले, तर त्यांनी बनवलेली मूर्ती गणेशोत्सवासाठी वापरण्यासाठी पालकही आनंदाने तयार होतील. या उद्देशाने आम्ही शाळांमध्ये मुलांना गणपतीची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. मुलांना हळूहळू सुबक मूर्ती बनवता येतील. त्यामुळे त्यांच्यातील कलाकौशल्यालाही प्रोत्साहन मिळेल. पर्यावरणरक्षणासाठी आपण आपल्या परीने छोट्या छोट्या गोष्टींतून हातभार लावू शकतो. त्यासाठीच हा प्रयत्न करत आहोत. पालकांचाही त्याला चांगला पाठिंबा मिळत आहे,’ असेही हर्डीकर यांनी नमूद केले.

(शाडूच्या मातीपासून घरच्या घरी आणि झटपट गणेशमूर्ती कशी तयार करता येईल, हे पाहा सोबतच्या व्हिडिओत... ) 
BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 21 Days ago
It might be a good idea to get in touch with Dr Amol Kulkarni , Nashik . He is trying to replace ' Shadu ' with local material , helping local environment .
0
0

Select Language
Share Link
 
Search