Next
‘दीक्षित डाएट प्लॅन’ लावणार राज्याला शिस्त
राज्याच्या स्थूलता नियंत्रण मोहिमेच्या ब्रँड ॲम्बेसेडरपदी डॉ. जगन्नाथ दीक्षित
BOI
Tuesday, November 20, 2018 | 03:46 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : दिवसाला किमान ४५ मिनिटे वेगाने चालण्याचा व्यायाम, दिवसातून फक्त दोन वेळा जेवण आणि प्रत्येक जेवणाचा कालावधी जास्तीत जास्त ५५ मिनिटे... वजन कमी करणे आणि मधुमेह प्रतिबंधासाठीची ही ‘दीक्षित डाएट प्लॅन’ची प्रमुख सूत्रे गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली आहेत. या लोकमान्यतेनंतर या प्लॅनला आता जणू राजमान्यताच मिळाली आहे. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या संशोधनावर आधारित असलेल्या या सूत्रांचा ज्यांनी प्रभावी प्रसार केला, त्या डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची राज्य शासनाने स्थूलता नियंत्रण मोहिमेसाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नियुक्तीबद्दलचे पत्र १९ नोव्हेंबर २०१८ रोजी डॉ. दीक्षित यांना दिले आहे. वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत स्थूलता नियंत्रण मोहीम राबविण्यात येत आहे. या विषयातील अनुभव आणि ज्ञान यामुळे डॉ. जगन्नाथ दीक्षित यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे. डॉ. दीक्षित यांच्या या आहार पद्धतीमुळे देशा-विदेशातील रुग्णांना फायदा झाला आहे. स्थूलतेमुळे होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर झाल्यामुळे डॉ. दीक्षित यांच्या ज्ञानाचा उपयोग सामान्य जनतेला होईल, असेही या पत्रात म्हटले आहे. 

डॉ. जगन्नाथ दीक्षित हे लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक व सामाजिक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख व प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. श्रीकांत जिचकार यांनी विकसित केलेल्या आहार पद्धतीच्या तत्त्वांवर अधिक संशोधन करून त्यांचा प्रभावी प्रसार करण्यात डॉ. दीक्षित यांची मोलाची भूमिका आहे. यू-ट्यूबवर त्यांची व्याख्याने लाखो जणांनी पाहिली असून, त्यांनी लिहिलेले ‘विनासायास वेटलॉस’ हे पुस्तकही लोकप्रिय ठरले आहे. 

सध्याच्या जीवनशैलीमुळे नागरिकांमधील स्थूलतेचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे मधुमेहासह अन्य विकारांनाही निमंत्रण मिळते. पुरेसा व्यायाम आणि ठरलेल्या वेळेत आहार या प्रमुख सूत्रांच्या आधारे स्थूलता आश्चर्यकारकरीत्या कमी करण्यात यश मिळते, असा डॉ. दीक्षित यांचा अनुभव आहे. त्यांची सूत्रे अगदी काटेकोरपणे पाळलेल्या सर्वांनाच हा अनुभव आला आहे. स्थूलता नियंत्रण मोहिमेचे ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांची नियुक्ती केल्यामुळे राज्यातील नागरिकांना ‘विनासायास वेटलॉस’चे महत्त्व प्रभावीपणे समजू शकेल.

(डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून विनासायास घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anand Parade About 184 Days ago
खुप चागलि कल्पना आहे
0
0

Select Language
Share Link
 
Search