Next
कथक नृत्यामधून अवतरणार ‘नृत्य धारा’
तीन पिढ्यांचा नृत्यसंगम अनुभवण्याची संधी
BOI
Tuesday, November 20, 2018 | 05:11 PM
15 0 0
Share this story

कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे, शांभवी दांडेकर, तेजस्विनी साठे आणि सर्वेश्वरी साठे.

पुणे : परंपरा आणि वारसा यामधून आपली कथक नृत्यपरंपरा खऱ्या अर्थाने समृद्ध झाली आहे. या समृद्ध कथक नृत्यकलेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने येत्या शनिवारी दि. २४ नोव्हेंबर व रविवारी, दि. २५ नोव्हेंबर, रोजी प्रसिद्ध कथक नृत्यांगना पंडिता मनीषा साठे यांच्या संकल्पनेतून ‘नृत्य धारा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी,  दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार असून, तोच कार्यक्रम रविवारी,दि. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता टिळक स्मारक मंदिर येथे सादर होणार आहे.


कार्यक्रमाची माहिती देताना पंडिता मनीषा साठे म्हणाल्या, ‘कथक नृत्यातील परंपरा आणि वारसा हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतो. गुरु शिष्याचे हे नाते अवर्णनीय असेच असते. आमच्या नृत्यप्रवासामध्ये गुरु शिष्य आणि रक्ताचे नाते या दोन्हीचा अंतर्भाव असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारची अनुभूती प्रेक्षकांना मिळते. हेच नाते अधोरेखित करण्याबरोबरच तो वारसा, परंपरा प्रेक्षकांसमोर यावा या उद्देशाने आम्ही ‘नृत्य धारा’ची प्रस्तुती करीत आहोत. यामध्ये तीन पिढ्यांमधील चार कथक नृत्यांगना अर्थात मी स्वत:, कन्या शांभवी दांडेकर, सून तेजस्विनी साठे आणि नात सर्वेश्वरी साठे कथक प्रस्तुती करणार आहोत. आमच्या प्रस्तुतीचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक कथक मधील सर्व अंगांचे सादरीकरण आम्ही करणार असून, यामध्ये गणपती, शिव आणि कृष्ण यांची त्रिदेवता स्तुती, ताल पंचम सवारी, सरगम, होरी, मल्हार, नायिका भेद, तराणा, जुगलबंदी यांचा समावेश असणार आहे.’

या कार्यक्रमांची तिकीटविक्री बुधवार,२१ नोव्हेंबरपासून दोन्ही सभागृहांवर होणार आहे. यासाठी ५००, ३०० आणि २०० रुपये इतके प्रवेशमूल्य आहे.                
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link