Next
पुण्यात ‘विमेन रायटर्स फेस्टिव्हल’चे आयोजन
‘शी द पीपल’ संस्थेतर्फे लेखिकांसाठी विशेष व्यासपीठ
प्रेस रिलीज
Friday, August 31 | 06:24 PM
15 0 0
Share this story

पुणे : आपली अभिव्यक्ती पुस्तके, लेख आणि ब्लॉग्जसारख्या विविध माध्यमातून समर्थपणे जगासमोर ठेवणाऱ्या  महिला लेखकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि अधिकाधिक महिलांनी लिहिते व्हावे म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ‘शी द पीपल टीव्ही’ संस्थेतर्फे पुण्यात शनिवारी, आठ सप्टेंबर रोजी ‘विमेन रायटर्स फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे. एकबोटे कॉलनी येथील ‘कला कलेक्टिव्ह’ येथे सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत हा कार्यक्रम होणार असून, तो सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे, मात्र सहभागासाठी ‘शी द पीपल’च्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका उमा कुलकर्णी यांच्यासह लेखिका लीना सोहोनी, तनुश्री पोदार, किरण मनराल, सुधा मेनन, सौम्या राजेंद्रन, परविन साकेत, स्वाती शोम, ललिथा सुहासिनी, सुचरिता दत्ता-असाने, स्वाती राजे, अर्चना पै कुलकर्णी आणि अंजली शेट्टी या लेखिका संमेलनात सहभागी होणार आहेत;तसेच प्रसिद्ध अभिनेत्री, नाट्यलेखिका विभावरी देशपांडे ‘रायटिंग थ्रू द जेंडर लेन्स’ या विषयावर आपली मते मांडणार आहेत. पुस्तकांच्या दुकानांचे वाचकस्नेही सांस्कृतिक कट्ट्यात रुपांतर करण्याच्या अनुभवाबद्दल ‘पगदंडी बुकस्टोअर’चे नेहा आणि विशाल पिपरिया आणि ‘अक्षरधारा’चे रसिका व रमेश राठिवडेकर सांगणार आहेत. याशिवाय निवेदनाच्या क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आरजे शुभ्रा, आरजे शोनाली, आरजे स्मिता, एमजे टिया यांचा लेखिका सुधा मेनन यांच्याबरोबरच्या मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. 

‘स्टँडअप कॉमेडी’ कलाप्रकारातील पुण्यातील प्रसिद्ध कलाकार आयुषी जागड, निकी रे, स्वाती मंत्री यांच्यासह काकोली बागची आणि सीमा गौरव या प्रसिद्ध ‘स्टोरीटेलर्स’चे सादरीकरणही पाहायला मिळणार आहे.

प्रादेशिक साहित्यातील बदलते प्रवाह, समर्थ स्त्री व्यक्तिरेखा, स्त्री आणि पुरूषांच्या साचेबद्ध भूमिकांमधून बाहेर येऊ पाहणारे आणि परिस्थितीचे मूल्यमापन करणारे साहित्य, लैंगिक व्यवहार, लालसा, विनोद, भीती अशा अनेकविध विषयांवर लिहिणाऱ्या स्त्री लेखिका याविषयी संमेलनात सखोल चर्चा होणार आहे.
या संमेलनाचे हे दुसरे वर्ष असून, यंदा फेब्रुवारीमध्ये मुंबईत आणि मार्चमध्ये दिल्लीत हे संमेलन भरवण्यात आले होते. 

शैली चोप्रा
‘शी द पीपल टीव्ही’ हे महिलांना विचारविनिमय, अभिव्यक्ती आणि विकासासाठी प्रोत्साहन देणारे विशेष व्यासपीठ आहे. संस्थेच्या संस्थापिका शैली चोप्रा म्हणाल्या,  ‘पटकथालेखन, लघुकथालेखन, काल्पनिका आणि स्तंभलेखनाबरोबरच पर्यावरण, उद्योग-व्यवसाय आणि इतरही क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली आहे. वेगवेगळ्या विषयांवर होणाऱ्या लेखनाचे स्वागत करणे आणि नवीन लेखिकांना प्रोत्साहन देण्यासाठी हे संमेलन महत्त्वाचे आहे.’

सुधा मेनन
‘मी गेली २५ वर्षे पुण्यातील लेखिकांचे काम पाहात असून, त्यांची प्रतिभा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. लेखिकांबरोबरच स्टँडअप कॉमेडियन, स्टोरीटेलर आणि रेडिओ जॉकी असलेल्या महिलांची संख्याही पुण्यात वाढते आहे’, असे मत संमेलनाच्या समन्वयक व लेखिका सुधा मेनन यांनी व्यक्त केले.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link