Next
मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव १४ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीत
BOI
Friday, April 12, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this article:

मठ येथील श्री लक्ष्मीपल्लीनाथ मंदिर

रत्नागिरी :
मठ (ता. लांजा, जि. रत्नागिरी) येथील श्री देव लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव यंदा रविवार, १४ एप्रिल ते शुक्रवार १९ एप्रिल या कालावधीत होणार आहे.

लक्ष्मीपल्लीनाथाचा हा शतकोत्तर तृतीय चैत्रोत्सव असून, मुंबई-गोवा महामार्गावर पालीजवळ मठ गावात (ता. लांजा) कुलोपासकांनी उभारलेल्या नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा सातवा उत्सव आहे. या मंदिराचा चौथा वर्धापनदिन यंदा आहे. लक्ष्मीपल्लीनाथ हे चाळीस कुळांचे कुलदैवत आहे. लक्ष्मीपल्लीनाथाचा चैत्रोत्सव दर वर्षी चैत्र शुद्ध दशमी ते चैत्र पौर्णिमा या कालावधीत होतो. परंपरा जपणारे कार्यक्रम, तरुणांचा मोठा सहभाग आणि नेटके नियोजन ही या उत्सवाची वैशिष्ट्ये असतात. 

यंदाच्या उत्सवात दर वर्षीप्रमाणेच श्रींची पूजा, अभिषेक, लघुरुद्रादी धार्मिक विधी आणि कीर्तन, प्रवचन, नामजप इत्यादी कार्यक्रम होणार आहेत. सामान्यतः विष्णू याग किंवा रुद्र याग केला जातो. पल्लीनाथाच्या उत्सवात यंदा दोन्ही दैवतांचा एकत्रित म्हणजेच हरिहर याग केला जाणार असून, ते या वेळच्या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. 

उत्सवाच्या काळात दररोज सकाळपासून दुपारपर्यंत धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद व रात्री भोजन, सायंकाळी आरत्या व नामजप, रात्री कीर्तन आणि मध्यरात्री पारंपरिक पद्धतीनुसार छबिना आणि भोवत्या अशी कार्यक्रमांची सर्वसाधारण रूपरेषा आहे. 

उत्सवात पहिल्या दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. रात्री भाट्ये बंधूंचे मंगलाचरण आणि चांदोरकर बंधूंच्या सोमेश्वर मंडळाचे भजन होईल. उत्सवाच्या काळात म्हणजेच १४ ते १९ एप्रिल या कालावधीत रात्री नऊ ते १२ या वेळेत ह. भ. प. विनोदबुवा खोंड (नागपूर) यांची कीर्तने होणार आहेत. त्यांना राजू जोशी (तबला), सुशील गद्रे (हार्मोनियम) संगीतसाथ करणार आहेत. अखेरच्या दिवशी रात्री १० वाजता अजिंक्य पोंक्षे यांचा ‘भक्तिसंगीत रजनी’ हा कार्यक्रम होईल. त्यानंतर पहाटे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल, असे संस्थानाच्या कार्यकारिणीतर्फे कळविण्यात आले आहे. या सोहळ्यात आवर्जून सहभागी होण्याचे आमंत्रण संस्थानातर्फे देण्यात आले आहे.

संपर्क : सुधाकर चांदोरकर : ९४२२६ ४६७६५

(आधीच्या चैत्रोत्सवातील भोवत्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search