Next
‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा’
BOI
Wednesday, September 13, 2017 | 02:11 PM
15 0 0
Share this article:

भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रावर अर्जुनाला गीता सांगत असतानाच्या चित्राव्यतिरिक्त कोणती चित्रं, आकृत्या किंवा फ्लो चार्ट हे घटक तुम्ही कधी भगवद्गीतेच्या किंवा त्याबद्दलच्या पुस्तकात पाहिले आहेत का? पण विज्ञान आणि कलेची पार्श्वभूमी असलेल्या माणसानं गीतेचा अभ्यास करून त्यावरचं निरूपण लिहिलं, तर त्यात मात्र हे घटक नक्कीच असू शकतात. ‘आयटी’सह महत्त्वाच्या क्षेत्रांतल्या कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम करून निवृत्त झालेल्या उदय करंजकरांनी लिहिलेल्या ‘गीता बोध’ या इंग्लिश पुस्तकावरून तुम्हाला याची जरूर कल्पना येईल. अनेक वर्षं गीतेचा अभ्यास करून त्यांनी त्यातील संकल्पनांनुसार वर्गीकरण करून त्यांचं सहज कळेल असं स्पष्टीकरण या पुस्तकात लिहिलं आहे. ‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा’ असं जेव्हा अर्जुन गीतेच्या शेवटी म्हणतो, तेव्हा त्याला गीतोपदेशाबद्दल जे काही आकलन झालं असेल, ते करंजकर यांनी या पुस्तकात दिलं आहे. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी करंजकर यांच्याशी साधलेल्या संवादातून उलगडलेलं हे त्या पुस्तकाचं मर्म...
........................
- आपण अनेक प्रकारची पुस्तकं वाचत असतो. फिक्शन, नॉन फिक्शन, मराठी, इंग्लिश वगैरे; पण तुम्हाला वयाच्या तिशीत एकदम भगवद्गीतेकडे का वळावंसं वाटलं?
- अगदी लहानपणापासून मला काही ना काही प्रश्न पडत राहिलेत. हे जीवन म्हणजे काय आहे सगळं, देव खरोखर आहे का, मग तो असेल तर मग हे जे काय घडतंय आजूबाजूला ते तसंच का आहे सगळं, देव सगळं नीट का करत नाही, आपल्याला हे जे काही आयुष्य दिलंय, त्यामागचं कारण काय असेल? मी काय करणं अपेक्षित असेल, जेणेकरून मला दिलेलं आयुष्य सार्थकी लागलं असं म्हणता येईल? आणि हे मला आताच कळायला हवं. आयुष्याच्या शेवटी कळून काय फायदा? उदाहरणार्थ, पैसा नेमका कसा खर्च करायचा हे मला सर्व संपत्ती उधळून झाल्यावर कळून काय फायदा? विश्व हे इतकं अथांग आणि अनंत पसरलेलं आहे. त्यात आपली आकाशगंगा एखाद्या ठिपक्यासारखी. त्यात आपली सूर्यमाला. त्यातली आपली पृथ्वी. त्यावरचा मी एक छोटा जीव. मग या विश्वाच्या अवाढव्य पसाऱ्यात मी इतका नगण्य आहे का? आणि मी इतका नगण्य आणि क्षुद्र असेन तर मी आयुष्यात काही केलं काय किंवा नाही केलं काय, त्यानं काय फरक पडणार आहे? असे अनेक मूलभूत, पण हैराण करणारे प्रश्न मला पडत गेले. त्यात पुन्हा जे करणं चांगलं नाही नेमकं तेच करूनही काही माणसं यशस्वी कशी काय होतात, असे प्रश्न मला पुढे तर चांगलेच बोचायला लागले. दरम्यान माझं शिक्षण संपलं होतं. मग सायकॉलॉजीसंबंधातली काही पुस्तकं वाचली. ‘बॉर्न टू विन’सारखी. त्यातून काही हाती लागतंय असं वाटलं; पण त्यातल्या थिअरीला जास्त खोलातले प्रश्न विचारले तर मात्र उत्तर मिळत नव्हतं. आणि मग अशाच एका क्षणी मला वाटलं, की गीता वाचून बघावी. आणि तिथं मात्र मला जाणवलं, की माझ्या बहुतेक प्रश्नांना गीतेत उत्तरं मिळतायत. मग सर्व प्रश्नांची उकल व्हावी, या हेतूनं मी माझ्या परीनं गीतेचा अभ्यास सुरू केला. त्याच दरम्यान स्वामी चिन्मयानंदजी पुण्यात येत असत. त्यांची काही प्रवचनं ऐकली. कधी सहावा अध्याय, तर कधी १३वा अध्याय.

- त्यांची विशिष्ट विषयांवरची प्रवचनं ऐकून तुम्हाला वाटलं, की सर्व उत्तरं गीतेत आहेत?
- ते जेव्हा पुण्यात येत, तेव्हा त्यांच्या बहुतेक व्याख्यानांना मी जात असे. कारण गीता या विषयावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि त्यांचं निरूपण ऐकताना खात्री पटत गेली, की हो, गीतेतून आपल्या शंकांचं निरसन होतंय...मग त्यांनी केलेल्या निरुपणावर मी विचार करायला सुरुवात केली. मग श्लोक वाचून नोट्स काढत गेलो; पण जाणवलं, की या विषयातला तज्ज्ञ गुरू कायमस्वरूपी समोर असल्याशिवाय आपल्याला हवं ते संपूर्ण ज्ञान मिळणार नाही. मग मी गुरूचा शोध घेतला. आपण एरव्ही कॉलेज शिक्षणावेळी इतकं वाचतो, इतका अभ्यास करतो. मग हे जे आयुष्यभराचं महत्त्वाचं शिक्षण आहे, त्यासाठी एखादी चांगली शिकवणी लावायला काय हरकत आहे?

- तुमच्या आजूबाजूला तुमच्यासारखे गीता सीरियसली शिकणारे कुणी होते?
- खरं तर लोकं उत्सुकता म्हणून या विषयाकडे बघत असत. आयुष्याचं मर्म यात आहे आणि इतर विषयांसारखा हा अगदी पद्धतशीरपणे अभ्यास करण्याचा विषय आहे, हे बहुतेक जण सीरियसली घेत नसावेत; पण मला मात्र एक दिवसभर पावसात शोधाशोध केल्यावर स्वामी सत्स्वरूपानंद यांचा पत्ता पुण्यातच गोपीनाथ नगरमध्ये मिळाला. त्यांना बघितलं आणि मला मनोमन जाणवलं, की ‘होय, हेच माझे गुरू.’ त्यांनी पहिल्या भेटीत मला सांगितलं, की ‘गीता व्यवस्थित शिकायची असेल, तर आयुष्यातली तीन वर्षं द्यावी लागतील.’ खरं तर मी त्या वेळी गल्फमध्ये जाऊन जॉब करण्याच्या विचारात होतो; पण त्यांचे शब्द ऐकले आणि तत्क्षणी तो विचार मनातून काढून टाकला. ते अतिशय सुंदर शिकवत असत. अगदी बारीकसारीक गोष्टी कळेपर्यंत. तो काळ १९९०चा. त्या दिवसापासून आजतागायत मी त्यांचा एकही क्लास बुडवला नाही. त्यांनी गीतेबरोबरच आम्हाला उपनिषदं, ब्रह्मसूत्र असं बरंच काही शिकवलं.

- शिकण्याची पद्धत काय असायची?
- अतिशय सूत्रबद्ध. आधी तत्त्वबोध, मग गीता. त्यातही एकेक श्लोक दोन-तीन सेशन्समध्ये.

- पण तुम्हाला त्या संपूर्ण कालावधीत इतर काहीही वाचावंसं नाही वाटलं? फिक्शन, नॉन फिक्शनसारखं?
- नाही वाटलं. कारण बाकीच्या विषयांत मला फार इंटरेस्ट नाही वाटला. सुरुवात केल्यावर पटकन ‘बस्स झालं एवढं’ असं काहीसं फीलिंग यायचं. गीता वाचताना मात्र मी रंगून जाई. पुढे असं झालं, की गीतेतल्या श्लोकांवर बोलू शकायचो. अगदी सर्व अर्थ वगैरे सांगायचो. अशाच काळात माझ्या मित्रानं मला एकदा विचारलं, ‘तू एवढा गीतेचा अभ्यास करतो आहेस, तर मला अगदी थोडक्यात संपूर्ण गीतेचं सार सांगू शकशील?’ मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवलं आणि असे मुद्दे काढले, की अगदी एका पानात गीतेचं सर्व महत्त्वाचं सार येईल. आणि मग तेच सर्व अधिक सोपं आणि स्पष्ट करून मांडण्यासाठी ‘गीता बोध’ हे पुस्तक लिहिलं.

- ‘भगवान कृष्णानं जो प्रश्न अर्जुनाला विचारला नाही, त्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे हे पुस्तक,’ असं मला हे पुस्तक पाहिल्यावर वाटलं. तुमची पुस्तक लिहिण्यामागची भूमिका तशीच आहे का?
- होय. कारण तेव्हाच लोकांनाही कळेल, की नक्की गीता म्हणजे काय ते! कारण कृष्णाला सर्व प्रकारचे उलटसुलट प्रश्न विचारून शंकानिरसन झाल्यावर शेवटी अर्जुनानं सांगितलं होतं, की ‘कृष्णा, माझ्या सर्व शंका आता दूर झाल्या आहेत. यापुढे तू दाखवलेल्या मार्गानं जाण्यास मी तयार आहे.’ एवढं बोलून अर्जुन थांबतो आणि कृष्ण-अर्जुन संवाद संपतो. त्या वेळी कृष्णानं त्याला विचारलं असतं, की, ‘अर्जुना, तू  म्हणतोयस ना, की तुला सर्व समजलंय, तर मग सांग पाहू तुला नक्की काय समजलंय ते अचूक शब्दांत?’ आणि मग त्यावर उत्तर म्हणून आपल्याला समजलेलं अर्जुनानं जे सांगितलं असतं, ते म्हणजेच हे पुस्तक आहे! मी तेच उद्दिष्ट ठेवून हे पुस्तक लिहिलंय.

- ती प्रक्रिया कशी होती?
- मी नोट्स काढायचो. गुरूंशी बोलायचो. विश्लेषण करायचो. हे असं काही वर्षं चाललं. मी सातशे श्लोकांच्या सातशे चिठ्ठ्या तयार केल्या आणि त्या घरभर पसरल्या. आणि त्यांच्याकडे लक्षपूर्वक बघताना एक दिवस माझ्या लक्षात आलं, की त्यामध्ये ढोबळमानानं दोन प्रकार आहेत. एका प्रकारच्या चिठ्ठ्या आपल्याला काही माहिती देतात, वर्णन करतात. ‘मी कोण आहे, सृष्टी काय आहे?’...वगैरे आणि दुसऱ्या प्रकारच्या चिठ्ठ्या काही सूचना देतात, दिशा दाखवतात. म्हणजे ‘असं करावं...तसं करू नये’ अशा प्रकारच्या. मग मी पहिल्या प्रकारच्या चिठ्ठ्या उचलल्या. मग लक्षात आलं, की त्यातही ढोबळमानानं तीन भाग आहेत. ‘जीव’, ‘जगत (निर्मिती)’ आणि ‘जगदीश (ईश्वर).’ आणि मग त्या तीन भागांच्या अगदी छोट्या गोष्टीपासून ते सर्वांत उच्चतम टप्पा म्हणजे अंतिम सत्याचा, अशा तऱ्हेने तीन सेट्स बनले. आणि मग त्यातही काही टप्पे सापडत गेले. एका न्यूनतम पातळीवरून वर जात जात सर्वोच्च पातळी अंतिम सत्याची! आणि अशा तऱ्हेने एक विषय किंवा संकल्पना आणि तो विशद करणारे विविध श्लोक अशी मांडणी आपसूकच होत गेली. उदाहरणार्थ, कुणी विचारलं ‘ईश्वर’ म्हणजे नक्की काय? तर कुणी एकेक श्लोक सांगत बसेल पण त्यातून ईश्वराविषयीचं संपूर्ण ज्ञान ऐकणाऱ्याला नाही मिळू शकणार; पण ते ज्या ‘कॉन्सेप्ट’ पद्धतीनं या पुस्तकात आलं आहे, त्यावरून ‘ईश्वर’ ही संकल्पना सांगोपांग समजून घेता येऊ शकते.

- राहुल देशपांडे यांची या पुस्तकातली इलस्ट्रेशन्स फारच नेमकी आणि नेटकी आहेत. त्याविषयी काय सांगाल?
- आधी मी बसून ठरवलं, की नक्की कुठे कुठे इलस्ट्रेशन्स (चित्रं, आकृत्या, तक्ते, प्रोसेस चार्ट इ.) हवी आहेत! कारण एखादा विषय समजून घेण्यासाठी व्हिज्युअल मेमरी नेहमीच फायद्याची ठरते. एखादी संकल्पना नुसत्या शब्दांऐवजी उत्कृष्ट इलस्ट्रेशन्सची जोड मिळाली तर अधिक लक्षात राहते. सुदैवानं मला वडिलांकडून चित्रकलेचा वारसा मिळाला असल्यानं माझीही चित्रकला बऱ्यापैकी आहे. त्यामुळे मी आधी प्रत्येक इलस्ट्रेशन कसं असावं याचं एक रफ चित्रच बनवलं आणि मग राहुल देशपांडे या चित्रकारानं ते सर्व समजून घेऊन त्यात स्वतःची भर टाकून ही देखणी इलस्ट्रेशन्स बनवली. सांगायला आनंद वाटतो, की गुणवत्तेबाबत अजिबात तडजोड होऊ न देता या सर्व इलस्ट्रेशन्सच्या साह्यानं हे पुस्तक सजलं.  

- हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिण्यामागचं कारण?
- गीतेबद्दलचे हे विचार विविध भाषा आणि कॉर्पोरेट्सपर्यंत सहज पोहोचावेत, म्हणून हे पुस्तक इंग्लिशमध्ये लिहिलं.

 - पुस्तकाच्या रचनेविषयी थोडक्यात सांगा.
- संपूर्ण गीतेमध्ये अत्यंत महत्त्वाचे असे दोन भाग आहेत. ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र! ज्ञान (knowledge) म्हणजे ब्रह्मविद्या (जीव, जगत, जगदीश आणि त्यांचं परस्पर नातं) आणि त्यायोगे मोक्षाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे योगशास्त्र (what to do?). तेच सूत्र या पुस्तकाच्या निर्मितीत वापरलं आहे. आपल्या जीवनात किती प्रकारचं अज्ञान आहे? तर तीन विषयांचं - जीव, जगत, जगदीश. मी कोण? ईश्वर म्हणजे काय? आणि हे विश्व म्हणजे काय? संपूर्ण मानव जात जग समजून घेऊन जगावर नियंत्रण करण्याच्या प्रयत्नात आपलं आयुष्य खर्ची घालते; पण मग बाकीच्या दोन गोष्टींचं काय? मी कोण आणि देव म्हणजे काय हे समजल्याशिवाय पूर्ण ज्ञान कसं मिळणार? किंबहुना त्या दोन गोष्टी अभ्यासण्याजोग्या आहेत हेच माहीत नसतं. आपला ज्ञानाचा प्रवास हा बीजापासून, मूळ, खोड, झाडं, पानं, फुलं याकडे नसावा, तर फांद्या, खोड, मुळाकडून बीज समजून घेण्याकडे हवा...आणि म्हणून त्यासाठीच हे पुस्तक! आणि हे समजून घेताना सोपं जावं यासाठी हे लिहून झाल्यावर मी ते वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या जवळजवळ साठ माणसांना वाचायला दिलं आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आणि मग सुधारणा करत करत हे प्रत्यक्षात आणलं. गीता का वाचायची? बाकी सर्व ज्ञान एका ठिकाणी आणि गीतेमधलं ज्ञान एका ठिकाणी असं का? तर होतंय असं, की जगातलं बाकी सर्व ज्ञान आपण मर्त्य आहोत आणि आपल्याला जी दु:खं आहेत, जे अज्ञान आहे, जे मृत्यूचं भय आहे त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. याउलट गीता आपल्याला त्याहीपलीकडचं ज्ञान देते. जे सर्व अज्ञान आहे, दु:ख आहे, मृत्यू आहे तो या शरीराला आहे; पण हे शरीर म्हणजे आपण नाही, शरीराचं दु:ख म्हणजे आपण नाही. शरीराच्या भावना म्हणजे आपण नाही. आपण त्या पलीकडे आहोत आणि म्हणजे नक्की काय आहोत, याचं ज्ञान गीता देते. एकदा ते कळलं की मोक्षाची वाटचाल सोपी होते हेच गीतेचं महत्त्व आहे.

उदय करंजकर यांच्याविषयी :
नागपूरमध्ये १९५५ साली उदय करंजकर यांचा जन्म झाला. ‘विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स’ची पदवी प्राप्त केल्यावर पुढे त्यांनी मुंबईतून इंडस्ट्रिअल इंजिनीअरिंगची पदव्युत्तर पदवी मिळवली. इंजिनीअरिंगकडे कल असला, तरी त्यांनी आपली वॉटरकलर पेंटिंग्ज आणि शिल्पकलेची आवडही जोपासली आहे. त्यांनी काढलेली चित्रे आणि घडवलेल्या मूर्ती त्यांच्या त्या कलांवरच्या प्रभुत्वाची साक्ष देतात.

भारत बिजली, फिलिप्स, टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, जॉमेट्रिक सॉफ्टवेअर यांसारख्या इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल आणि आयटी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये त्यांनी उच्च व्यवस्थापकीय पदांवर जबाबदाऱ्या निभावल्या. पर्सिस्टंट सिस्टम्स या ख्यातनाम कंपनीतून असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट या पदावरून निवृत्त झाल्यावर आता त्यांनी भगवद्गीतेवर व्याख्यानं देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात यामागे त्यांचा तब्बल ३९ वर्षांचा गाढा अभ्यास आहेच.

संपर्क : udaykaranjkar@yahoo.com
वेबसाइट : http://gitabodh.org/

(‘गीता बोध’ हे उदय करंजकर यांनी लिहिलेलं आणि स्वतःच प्रकाशित केलेलं ५४३ पानांचं, आर्टपेपरचा वापर केलेलं हार्डबाउंड पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागवण्यासाठी http://www.bookganga.com/R/7MR50 या लिंकवर क्लिक करा. किंमत : १५९९ रुपये)

(उदय करंजकर यांनी गीतेसंदर्भातील काही विचार सोबतच्या व्हिडिओत व्यक्त केले आहेत.)(गीता बोध या पुस्तकाबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Karkare About
This is a wonderful, must read book specially for people with science background who may have hundreds of questions about the creator and his creations.
0
0
Kiran About
Mala Marathit Milu Shakeel Ka,my WhatsApp 8788513447, mob.9422040381
0
0

Select Language
Share Link
 
Search