Next
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग दोन
BOI
Wednesday, April 10, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘करू या देशाटन’ सदराच्या गेल्या भागात आपण सातारा शहराची माहिती घेतली. आजच्या भागात जाऊ या साताऱ्याच्या पश्चिमेला, कास पठार आणि वासोटा, नागेश्वरकडे.
........
सातारा शहर हे तसे डोंगरातच वसले आहे. सातारा सोडून घाटाची दोन-तीन वळणे घेतली, की डावीकडेच जुने पॉवरहाउस आहे. कासवरून आलेले पाणी तेथे येते व छोटी विद्युतनिर्मिती करून साताऱ्याकडे जाते. घाटातूनच थोडे पुढे गेल्यावर येवतेश्वरच्या अगोदर डावीकडे सांबरवाडी फाटा आहे. कासचे पाणी या ठिकाणी आल्यावर मोठ्या साठवण टाकीत साठविले जाते. तेथे जलशुद्धीकरण केंद्रही आहे. सातारा ते सांबरवाडीदरम्यान सन १८९५मध्ये बांधलेले चुन्यातील पाइपचे चेंबर आजही दिसून येतात. 

येवतेश्वर घाट

यवतेश्वर :
साडेचार किलोमीटरचा यवतेश्वरचा छोटा घाट चढून गेल्यावर येवतेश्वराचे मंदिर आहे. येथे आल्यावर पाचगणीसारखे आल्हाददायक वातावरण अनुभवता येते. ही जागा सातारा शहरापासून साडेचार किलोमीटर अंतरावर आणि समुद्रपातळीपासून साधारण २५०० फूट उंचीवर आहे. येथे जवळजवळ ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे शिवमंदिर आहे. ते हेमाडपंती शैलीत बांधलेले आहे. येथे एक आम्रवृक्ष आहे. या झाडाला श्रावण महिन्यात मोहोर येतो. तो पहिल्यांदा पाहतो त्याची त्या मोहोरासह वाजतगाजत मिरवणूक काढून येवतेश्वरास हा मोहोर अर्पण केला जातो. श्रावणातील सोमवारी भाविकांची येथे गर्दी होते. येथून कासकडे जाताना एका बाजूला दक्षिणेला उरमोडी खोरे, तर उत्तरेस वेण्णा खोरे असे विहंगम दृश्य बघण्यास मिळते. गणेशखिंड परिसरात एका उंच टेकडीवरून कण्हेर व उरमोडी ही दोन्ही धरणे जलाशयासह दिसतात. काही अंतर गेल्यावर पेट्री गाव लागते. या गावाजवळच एक नैसर्गिक गुंफाही आहे. कास तलाव बांधताना ब्रिटिशांनी येथे छोटे विश्रामगृहही बांधले. हा पेट्री बंगला म्हणून ओळखला जातो. पेट्रीतून कासकडे जाताना उजवीकडे पठाराच्या अलीकडेच ‘एकीव फॉल’ आहे. पुढे दाट झाडीतून वळणावळणाने आपण पोहोचतो जगप्रसिद्ध अशा कासच्या पुष्प पठारावर. 

कासचे पठार

कासचे पठार :
सातारा-महाबळेश्वर या इतिहासकालीन राजमार्गावर हे पठार आहे. येथून आता महाबळेश्वरकडे पक्क्या रस्त्याचे कामही चालू आहे. त्यामुळे भविष्यात पर्यटकांना महाबळेश्वरहून येणे शक्य होणार आहे. रानफुलांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा सन २०१२मध्ये ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे. रहिमतपूर येथील पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी हे ठिकाण जागतिक स्तरावर पोहोचवले. जागतिक वारसास्थळांमध्ये कास पुष्पपठार समाविष्ट होण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केले. कास पठार हे आता एक जागतिक पर्यटनस्थळ झाले आहे. कास पठारावर साधारण ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुलांचा हंगाम असतो. ही फुले एकाच वेळी उमलत नाहीत. तसेच हवामान व पाऊस उशिरा येणे किंवा त्याचे प्रमाण कमी-अधिक होणे, या गोष्टींचाही त्यांच्या उमलण्यावर परिणाम होत असतो. याच परिसरात कुमुदिनी तलाव असून, त्याचे क्षेत्र साधारण दोन एकर एवढे आहे. तेथे दुर्मीळ पाणवनस्पती आढळून येतात. 

येथे चौकशी करून फुले उमलल्याची खात्री करून घ्यावी आणि मगच यावे. गर्दीच्या वेळी आता सात दिवस अगोदर ऑनलाइन बुकिंग होते. (बुकिंगसाठी वेबसाइट : https://kas.ind.in/) शनिवार, रविवार व सुट्टीच्या दिवशी खूपच गर्दी होते. १० चौरस किलोमीटर क्षेत्रावर विस्तारलेल्या या पठारावर रानफुलांच्या २८० प्रजाती आणि वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर काँझर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस’ने नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या म्हणून घोषित केलेल्या २८० पुष्पप्रजातींपैकी ३९ प्रजाती येथे आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरपटणारे प्राणीही आढळतात. गवे व बिबट्यांचेही हे वसतिस्थान आहे. दुर्मीळ असे काळ्या रंगाचे बिबटे साताऱ्यापासून बामणोलीपर्यंत दिसण्याची शक्यता असते. (कास पठाराबद्दल दुसरा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कास तलाव

कास तलाव :
हा ब्रिटिशांच्या राजवटीत १८९५मध्ये कार्यान्वित झाला. याचे काम १८८९मध्ये सुरू करण्यात आले होते. साधारण २८ किलोमीटरचा छोटा कालवा येवतेश्वरपर्यंत आणून पुढे बंदिस्त पाइपद्वारे हे पाणी सातारा शहरासाठी सायफन पद्धतीने आणण्यात आले. मध्यंतरी या कालव्याने पाणी आणणे बंद करून बंदिस्त पाइपद्वारे पाणी योजना कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पाणी झिरपणे, गळणे, बाष्पीभवन होणे बंद झाल्याने शहराचा पाणीपुरवठा वाढला आहे. कालव्याच्या काठावरील गावांनाही यातून पाणीपुरवठा केला जातो. हे सातारकारांचे एक सहलीचे आवडते ठिकाण आहे. गर्द सदाहरित वनराईने वेढलेला हा तलाव पठारावरून खूपच आकर्षक दिसतो. येथे चित्रपटांचे चित्रीकरणही चालू असते. आता या तलावाची क्षमता वाढविण्यासाठी धरणाची उंची वाढविण्यात येत आहे. त्यामुळे हा तलाव विस्तीर्ण होऊन त्याचे सौंदर्य अधिकच खुलणार आहे. तसेच सातारा शहराची पाण्याची अधिक गरज भागविणे शक्य होणार आहे. या तलावापासून साताऱ्यापर्यंत कोठेही नागरी वस्ती नाही, कारखानदारी नाही. पाणी बंद पाइपमधून येत असल्याने प्रदूषणविरहित पाणी सातारकरांना भरपूर प्रमाणात मिळेल. 

वजराई फॉल : कास तलावाच्या खालच्या बाजूस पश्चिमेला बामणोली घाट सुरू होण्याच्या अगोदर डावीकडे भांबवली फाटा आहे. येथून दोन-तीन किलोमीटर गेल्यावर भांबवली गावातून वजराई फॉल दिसतो. हा धबधबा ८५० फूट उंचीवरून दोन टप्प्यांत कोसळतो. आता हा भारतातील प्रथम क्रमांकाचा धबधबा समजला जातो. येथून पुढे केळवडेमार्गे उरमोडी धरणाच्या मागील बाजूकडून परळी येथे जाता येते. केळवडे येथून चालत ठोसेघरपर्यंत जाता येते किंवा परळीमार्गे सज्जनगड व ठोसेघरकडे जाता येते. 

जुना वासोटा बाबू कड्यावरून

बामणोली बोट क्लब :
कास पठारापासून १२ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पूर्व बाजूला कास ते बामणोली घाट उतरल्याबरोबर हे ठिकाण आहे. येथे नौकाविहाराची मजा घेता येते. पर्यटकांसाठी बोट क्लब आणि वॉटर स्पोर्टस् सुविधा उपलब्ध आहे. कोयना धरणाच्या जलाशयाच्या काठावर उंच डोंगररांगांमध्ये हे ठिकाण आहे. कासवरून खाली येताना शिवसागराचे (कोयना जलाशय) विहंगम दृश्य दिसते. या भागात अनेक अॅग्रो टुरिझम केंद्रे चालविली जातात. जवळच्या मुनवाळे गावाजवळ जलाशयाच्या काठावर नारायण महाराज यांनी एक मठ स्थापन केला आहे. बोटीने येथे जाता येते. बामणोलीहून बोटीने तापोळा येथे जाऊन महाबळेश्वरलाही जाता येते. बामणोली-तापोळा हा रस्ताही लवकरच पूर्ण होईल. रघुवीर घाट पूर्णत्वाच्या मार्गावर असून, खेडचे अंतरही कमी होऊन कोकणात जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. 

शिवसागरातून वासोटा दर्शन

वासोटा आणि नागेश्वर :
ज्याला आपण दुर्गम भाग म्हणतो, तो अनुभवायचा असेल, तर सुमारे ३६०० फूट उंचीवरच्या वासोट्याला भेट द्यावी. येथे जाताना वनखात्याची परवानगी आवश्यक असते. ही दोन्ही ठिकाणे बघण्यासाठी सोबत वाटाड्या महत्त्वाचा. येथे राहण्याची सोय नाही. तसेच मुक्कामही करता येत नाही. जाताना पाणी आणि खाण्याचे पदार्थ जवळ ठेवावेत. येथे जाण्यासाठी सर्वांत जास्त सोयीचा मार्ग म्हणजे बामणोली येथून बोटीने जाणे. प्रत्येक मराठी माणसाने हे थ्रिल अनुभवावे. मी तर वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झालो, तेव्हा हा किल्ला दोन तासांमध्ये भर उन्हात चढून गेलो होतो. 

वासोट्यावरून नागेश्वर

साधारण ३० ते ३५ मिनिटांत बोटीने आपण वासोट्याच्या पायथ्याशी पोहोचतो. साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कमी चालावे लागते. तसेच चढणही कमी असते. जसजसे शिवसागरातील पाणी कमी होईल, तसे चालण्याचे अंतर व चढणही वाढत जाते. अगोदरच दुर्गम व आता कोयना जलाशयाच्या (शिवसागर) पाण्याने वेढलेला हा किल्ला अधिक दुर्गम झाला आहे. हा किल्ला कोयना व्याघ्र प्रकल्पाच्या ‘कोअर झोन’मध्ये आहे. ज्याला पदभ्रमणाची, निसर्गाची आवड आहे, त्याची पावले येथे नक्कीच वळतील. पौराणिक सूत्रानुसार, वासोटा ज्या डोंगरावर आहे, तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता. म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ‘वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाले असावे. साधारण इ. स. ११००ते १२०० या कालावधीत शिलाहार राजांनी हा किल्ला बांधला असावा. या किल्ल्याची मूळ बांधणी शिलाहारवंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो. वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईतसुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत. 

वासोट्याची बिकट वाट

शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ला सहा जून १६६० रोजी घेतला. अफझलखानाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही, म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकाऱ्याला अटक केली व वासोट्यावर ठेवले होते. सन १६६१मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. १६७९मध्ये वासोटा किल्ल्यावर २६ हजार रुपये सापडले. सन १८०६मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठ-दहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १८३०मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला. एका कवीने त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे. 

‘तेलीण मारी सोटा!! बापू गोखल्या सांभाळ कासोटा!!
श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा!!’

नागेश्वर गुंफा

येथे जाण्यासाठी वेळेचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. वासोट्याला जाणारा दुसरा मार्ग चिपळूणकडून आहे. वासोट्याच्या पश्चिम पायथ्याच्या चोरवणे या गावापर्यंत गाडीमार्ग असून, चोरवण्यापासून नागेश्वराच्या सुळक्याकडून वासोट्याकडे येता येते. गडावर पूर्वेकडून पोहोचल्यावर मागे वळून पाहिल्यावर समोर सह्याद्रीची उत्तर-दक्षिण पसरलेली पूर्व रांग, त्यावर दिसणाऱ्या पवनचक्क्या, मध्ये शिवसागर व जंगलात बुडालेली वासोट्याच्या बाजूची उतरण हा देखावा नजरेत आणि मोबाइलमध्ये टिपल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. येथे एक पाण्याचे टाके आहे. पाणी असते; पण ते पिण्यायोग्य आहे याची खात्री देता येत नाही. दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच बाबू कडा व जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. येथून चिपळूणपर्यंतचा भाग दिसतो. गडावरील बहुतेक इमारतींची फक्त जोती दिसतात. 

वासोट्यावरून नागेश्वर

मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष, तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन होते. तसेच नागेश्वराचे शिखरही दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे. त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे म्हणतात. नागेश्वर पाहून येथे येणे जास्त चांगले. नागेश्वरसाठी दोन तास अधिक वाढतात. संध्याकाळी पाचच्या आत पायथ्याशी येणे बंधनकारक आहे. सकाळी आठच्या सुमारास बोट चालू होते. एका बोटीत १२ ते १४ माणसे बसू शकतात. वेळेत निघा, लवकर किल्ला चढा आणि लवकर निघा, दुपारी ३.३०ला परत निघावे, हे पथ्य पाळा. (वासोटा सफरीबद्दलचा दुसरा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नागेश्वर

कसे जाल कास पठाराकडे?
जवळचे रेल्वे स्टेशन सातारा. कास-बामणोलीपर्यंत गाडी रस्ता आहे. यवतेश्वरपासून वाटेत बामणोलीपर्यंत जेवणाची व राहण्याची सोय आहे. पावसाळ्यात धबधबे, पुष्पपठार, थंडीत वासोटा ट्रेक आणि उन्हाळ्यात हिलस्टेशनवर अशी एकूण वर्षभर येथे वर्दळ असते. साताऱ्याहून भाडेतत्त्वावर जीप, कार मिळू शकतात. पुणे कोल्हापूरहून तीन तासांत कासपर्यंत पोहोचता येते. 

(लेखाच्या या भागासाठी साताऱ्याचे इतिहासप्रेमी, पर्यटनप्रेमी, अभ्यासक छायाचित्रकार नरेंद्र जाधव, सातारा न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक कैलास बागल, तसेच दुर्गभरारी ग्रुप यांनी छायाचित्रे उपलब्ध करून दिली.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

(वासोटा सफरीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Sameer About 188 Days ago
मस्त
1
0
जयश्री चारेकर About 191 Days ago
अतिशय सविस्तर व उपयुक्त माहिती🙏
1
0

Select Language
Share Link
 
Search