Next
‘‘कानसेन’ची सांगीतिक चळवळ राज्यभर पोहोचावी’
BOI
Thursday, October 04, 2018 | 05:19 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
‘सोशल मीडियाच्या गैरवापराचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत; मात्र त्याच वेळी व्हॉट्सअॅपचा वापर चांगल्या कामासाठीही करता येतो, त्यातून राज्यभरातील माणसे एकत्र जोडली जाऊन एक चळवळ उभी राहते, हे नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे. ‘कानसेन’ची सांगीतिक चळवळ रत्नागिरीपुरती मर्यादित न राहता महाराष्ट्रभर पोहोचावी,’ अशी अपेक्षा रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केली. ‘कानसेन’ या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या रत्नागिरीत झालेल्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.३० सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी नऊ वाजता संमेलनाचे उद्घाटन झाले. ‘कानसेन’ ग्रुपचे राज्यातील विविध ठिकाणांहून आलेले, तसेच रत्नागिरीकर सदस्य या वेळी उपस्थित होते. सुरुवातीला ज्येष्ठ संवादिनी-ऑर्गनवादक तुळशीदास बोरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुरेल नांदीने संमेलनाचे प्रथम सत्र सुरू झाले. मग दिवसभरात विविध व्यावसायिक कलाकारांसह हौशी सदस्यांनी आपली कला पेश केली. ‘बाथरूम सिंगर’ ते शास्त्रीय गायक या सर्वांसाठी सादरीकरणाची समान संधी हे संमेलनाचे वैशिष्ट्य ठरले.

संगीतशिक्षक विजय रानडे आणि तबलावादक हेरंब जोगळेकर यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. ‘सलग तीन वर्षे हे संमेलन रत्नागिरीत उत्कृष्टपणे घेतले गेले. पुढील संमेलनाची जबाबदारी अन्य शहरातील सदस्यांनी घ्यावी,’ असे सुधीर मोघे यांनी सुचविले. लहान मुलांचे सांगीतिक कार्यक्रम, विविध गुणदर्शन, कराओके शो, सुगम संगीत मैफल अशा विविध सत्रांमध्ये संमेलन पार पडले. संगीतकार अवधूत बाम आणि गझलकार सुरेश दंडे यांनी अभंग आणि गझल सादर करून संमेलनाची सांगता केली.

वेगवेगळ्या सत्रांतील कार्यक्रमांचे नियोजन, तालीम आदी जबाबदारी तेजस्विनी गाडगीळ, आशिष खेर, अदिती जोशी, रुद्र गाडगीळ, संजय पाटणकर, प्रवीण डोंगरे, पिंट्या चव्हाण, मंगेश मोरे, महेंद्र पाटणकर, पांडुरंग बर्वे, सोनाली कानिटकर यांनी पार पाडली. सांगीतिक कार्यक्रमांसाठी हेरंब जोगळेकर, विजय रानडे, राजेंद्र भडसावळे, पांडुरंग बर्वे, मंगेश मोरे, मंगेश चव्हाण, गणेश घाणेकर, मंदार जोशी, उदय गोखले, विजय रानडे, राजू धाक्रस, अमेय भडसावळे, मंदार घैसास, वरद सोहनी यांनी साथसंगत केली. सहभोजनानंतर पुढच्या वर्षी पुन्हा प्रत्यक्ष भेटण्याचे आश्वासन एकमेकांना देऊन साऱ्यांनी निरोप घेतला.रांगोळी, सजावट, हिशेब, चहा-नाश्ता, भोजन आदी व्यवस्था स्वाती रानडे, तेजस्विनी गाडगीळ, विश्वास जोगळेकर, प्रसाद गाडगीळ, किरण जोशी, अंबर हॉलचे मालक आणि ‘कानसेन’ समूहाचे अॅडमिन संजीव वेलणकर, सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत आणि त्यांचे कर्मचारी यांनी चोख बजावली. फोटो आणि शूटिंग व्यवस्था संजय शिंदे आणि ओम पाडळकर यांनी, तर ध्वनिव्यवस्था राजू बर्वे यांनी पाहिली.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search