Next
‘सामाजिक जबाबदारी ओळखून काम करणे आवश्यक’
‘एफटीआयआय’चे अध्यक्ष ब्रिजेंद्रपाल सिंग यांचे मत
BOI
Wednesday, March 20, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:

‘एफटीआयआय’च्या टीव्ही विभागाच्या विद्यार्थ्यांना  ब्रिजेंद्रपाल सिंग यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, वरूण भारद्वाज, राजेंद्र पाठक आणि धीरज मेश्राम उपस्थित होते.

पुणे : ‘एक उत्तम लेखक होण्याकरिता चांगला माणूस बनले पाहिजे. लेखक हा असा घटक आहे, ज्यामुळे समाजात बदल घडतो. प्रत्येकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून काम केले पाहिजे,’ असे मत भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष आणि प्रसिद्ध दिग्दर्शक ब्रिजेंद्रपाल सिंग यांनी व्यक्त केले. 

‘एफटीआयआय’च्या टीव्ही विभागाचा पदवीप्रदान समारंभ मंगळवारी, १९ मार्च २०१९ रोजी ब्रिजेंद्रपाल सिंग यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे संचालक भूपेंद्र कँथोला, कुलसचिव वरुण भारद्वाज, दूरचित्रवाणी विभागाचे अधिष्ठाता राजेंद्र पाठक आणि चित्रपट विभागाचे अधिष्ठाता धीरज मेश्राम उपस्थित होते. 


ब्रिजेंद्रपाल सिंग पुढे म्हणाले, ‘आताचे चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्र खूप बदलले आहे. व्यावसायिक आणि प्रायोगिक असा फरक उरलेला नाही. त्याचे श्रेय लेखकांना जाते. लोकांचे मनोरंजन करणे, त्यांच्यापर्यंत अनुभव पोहोचवणे हेच आपले काम आहे. कोणत्याही काळात मनोरंजनाला मागणी असेल, त्यामुळे मनोरंजन क्षेत्रातील लोक आपल्या कौशल्याच्या बळावर कायम टिकून राहतील. ते बेरोजगार होणार नाहीत.’

‘चित्रपट क्षेत्रातील आशयघन निर्मितीत एफटीआयआय’चे योगदान मोठे आहे. या संस्थेतून अनेक चांगले दिग्दर्शक, कलाकार बाहेर पडले आहेत. चित्रपट असो वा टीव्ही मालिका यामध्ये दिग्दर्शकाची भूमिका महत्त्वाची असते. त्याला आर्थिक गोष्टींपासून जाहिरातीपर्यंत सर्व गोष्टी पाहाव्या लागतात. त्याला अडचण येते. यासाठी फिल्म इंडस्ट्रीद्वारे एक वेगळा कार्पोरेट निधी उभा करण्यात येत आहे. ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांसाठी यातून मदत केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात चांगल्या संहितेला तीस ते चाळीस लाख रुपये, माहितीपटांसाठी आठ ते दहा लाख रुपये दिले जातील. त्यामुळे एखादा चांगला विषय घ्या; समाजासमोर त्याची चांगली मांडणी करा. यासाठी तुम्हाला संस्था नेहमीच मदतीचा हात देईल,’ असेही सिंग यांनी सांगितले.

तब्बल २२ वर्षांनंतर पदवीदान सोहळा
तब्बल २२ वर्षांनंतर झालेल्या या पदवीदान सोहळ्यात १४८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यापूर्वी १९९७ मध्ये पदवीदान सोहळा झाला होता. त्या वेळी अभिनेते दिलीपकुमार उपस्थित होते, तर संस्थेचे अध्यक्ष महेश भट होते. त्या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी काळ्या फिती लावून आणि फलक घेऊन निषेध व्यक्त केला होता. 

(ब्रिजेंद्रपाल सिंग यांच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search