Next
गौरी देशपांडे, प्रज्ञा दया पवार
BOI
Sunday, February 11 | 03:45 AM
15 0 0
Share this story

स्त्री-पुरुष नात्यांमधले पदर कधी हळुवारपणे, तर कधी धिटाईने मांडत, क्वचित भल्याभल्यांना नवल वाटणारं बोल्ड लेखनही करणाऱ्या सर्जनशील लेखिका गौरी देशपांडे आणि ‘भारीच नाद मला शब्द कुटायचा! तशी नादानच आहे म्हणा ना, रोज ढीगभर शब्द गोळा करायचे न् एक एक कुटत बसायचे’ असं म्हणणाऱ्या प्रज्ञा दया पवार यांचा अकरा फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
.......
गौरी देशपांडे 

११ फेब्रुवारी १९४२ रोजी पुण्यामध्ये जन्मलेल्या गौरी देशपांडे या स्त्री स्वातंत्र्याचा आणि एकूणच व्यक्तिस्वातंत्र्याचा खंदा पुरस्कार करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या अफाट वाचनाचा, वैचारिक जडणघडणीचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार त्यांच्या कथा, कादंबरी, कविता, अनुवाद, स्फुट अशा विविध प्रकारच्या लेखनांतून पाहायला मिळतो. 
  
पुरुषसत्ताक किंवा पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला दुबळी मानून, तिला माणूस म्हणून जगणं नाकारणाऱ्या प्रवृत्तींवर त्यांनी आपल्या लेखनातून सणसणीत प्रहार केले. त्यांच्या कादंबऱ्यांमधून त्यांनी स्त्री मुक्तीचा, मुक्त आयुष्य जगण्यासंबंधीचा शोध घेतलेला जाणवतो. स्त्रीच्या देहाला आणि मनाला बांधून ठेवणारे नैतिकतेचे निकष त्यांनी आपल्या लेखनातून तोडायला सुरुवात केली होती. 

स्त्री पुरुष नात्यांमधले पदर कधी हळुवारपणे, तर कधी धिटाईने मांडत त्यांचं लिखाण क्वचित बोल्डही होत असे आणि भल्याभल्यांना त्याचं नवल वाटे. उदाहरणार्थ, सत्तरच्या दशकात त्यांनी रिचर्ड बर्टनच्या अश्लील म्हणून गणल्या गेलेल्या ‘अरेबियन नाइट्स’चं अगदी तळटीपांसकट केलेलं सहीसही भाषांतर! 

एकेक पान गळावया, निरगाठी आणि चंद्रिके ग, सारिके ग, तटबंदी, विंचुर्णीचे धडे, आहे हे असं आहे, गोफ, मुक्काम, तेरुओ आणि काही दूरपर्यंत, उत्खनन, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

एक मार्च २००३ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.
...............

प्रज्ञा दया पवार 

११ फेब्रुवारी १९६६ रोजी जन्मलेल्या प्रज्ञा पवार-लोखंडे या कवयित्री आणि कथाकार म्हणून प्रसिद्ध आहेत.

अफवा खरी ठरावी म्हणून..., आरपार लयीत प्राणांतिक, दृश्यांचा ढोबळ समुद्र, टेहलटिकोरी, विमुक्तांचे स्वातंत्र्य असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link