Next
पत्रकारितेचे स्वरूप बदलले; मात्र जबाबदारी वाढली
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, January 05, 2019 | 02:49 PM
15 0 0
Share this article:

पुरस्कार विजेत्यांसह रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर

रत्नागिरी :
‘आज काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे. पत्रकारांसमोरची आव्हाने बदलली आहेत; मात्र पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. काही ठिकाणी केवळ उपद्रवमूल्य दाखवण्यासाठी पत्रकारिता केली जाते; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात चांगली आणि जबाबदार पत्रकारिता पाहायला मिळते, असा माझा अनुभव आहे. अन्य काही जणांनीही मला हा अनुभव सांगितला आहे,’ असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकारांची जबाबदारी वाढल्याची भावना या वेळी अन्य मान्यवरांनीही व्यक्त केली.

सतीश कामत यांना गौरविताना डॉ. प्रवीण मुंढे. शेजारी अमित शेडगे

रत्नागिरी जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे सहा जानेवारीच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा पाच जानेवारी २०१९ रोजी गौरव करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीण मुंढे, तसेच प्रांताधिकारी अमित शेडगे उपस्थित होते. जिल्हा शासकीय विश्रामगृहात दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम झाला. 

सचिन देसाई यांचा गौरव

या वेळी ‘लोकसत्ता’चे ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना पत्रकार सन्मान पुरस्कार, ‘एबीपी माझा’चे सचिन देसाई यांना पत्रकार गौरव पुरस्कार, ‘एबीपी माझा’चे व्हिडिओ जर्नालिस्ट उमेश सावंत यांना व्हिडिओ जर्नालिस्ट गौरव पुरस्कार आणि ‘लोकमत’च्या मेहरून नाकाडे यांना पत्रकार भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांना पत्रकार मित्र सन्मान पुरस्कार देण्यात आला. मूकबधिर विद्यालयातील मुलांनी तयार केलेली फुले, श्रीफळ आणि पुस्तके देऊन या सर्वांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.

मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रवीण मुंढे

डॉ. मुंढे म्हणाले, ‘एखाद्या गुन्ह्याचा ‘एफआयआर’ दाखल करण्याबाबत लोकांच्या मनात भीती बसली आहे. कारण एफआयआर दाखल झाला, की त्याचे वार्तांकन माध्यमांत येते. त्यातून ‘मीडिया ट्रायल्स’च्या प्रकाराला सुरुवात होते; एखाद्याला दोषी समजून लेखन केले जाते; पण एफआयआर दाखल झाला, यावरून गुन्हा झालाच आहे किंवा अमुकच एका व्यक्तीने केला आहे, असे सांगता येत नाही. त्यामुळे सर्व बाजू तपासून वार्तांकन झाल्यास लोकांच्या मनातील अनावश्यक भीती नाहीशी होऊ शकेल.’ 

उमेश सावंत यांचा गौरव

‘लोकशाहीच्या अन्य दोन स्तंभांबद्दल बऱ्यापैकी बोलले जाते; मात्र न्यायव्यवस्था या तिसऱ्या स्तंभाबद्दलही मोकळेपणाने बोलले गेले पाहिजे,’ असेही ते म्हणाले. ‘आपल्या क्षेत्रातील चांगल्या व्यक्तींचा सत्कार करणे ही आपली जबाबदारी असते. त्यामुळे त्या व्यक्तींना प्रोत्साहन मिळते. अनेकदा समाजात निराशावाद दिसतो; मात्र मृगजळासारखी दिसणारी चांगली उदाहरणे शोधून ती जपली पाहिजेत, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आदर्श पत्रकारिता कशी असावी, याचे धडे ज्येष्ठ पत्रकारांनी नव्या पिढीतील पत्रकारांना द्यावेत,’ असे आवाहनही डॉ. मुंढे यांनी केले. 

मनोगत व्यक्त करताना अमित शेडगे

‘मी कामाच्या निमित्ताने पाच जिल्हे पाहिले आहेत; मात्र त्या सर्वांत रत्नागिरीतील पत्रकारिता जबाबदार असल्याचे मला जाणवले. गेल्या काही वर्षांत अनेक संवेदनशील विषय रत्नागिरीत घडले; मात्र कधीही आततायी वार्तांकन कधीही दिसले नाही,’ असे कौतुक प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी केले. 

मेहरून नाकाडे यांचा गौरव

ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी आपल्या मनोगतात आपल्या कारकिर्दीतील काही किस्से, आठवणी सांगितल्या आणि काही अपेक्षाही व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘अगदी काही वर्षांपूर्वी म्हणजे १९९०मध्ये दिल्लीतून पुण्यात फॅक्स पाठवायचा झाला, तरी ते एक मोठे दिव्य असायचे. आता पत्रकारांना व्हॉट्सअॅपवर बातम्या कळतात. अगदी प्रवासात असतानाही ते बातम्या सहजपणे पाठवू शकतात. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे हे साध्य झाले आहे; मात्र ‘व्हॉट्सअॅप जर्नालिझम’ कमी झाले पाहिजे. पत्रकारांनी प्रत्यक्ष फिरायला पाहिजे, समाजात वावरायला पाहिजे, अधिकारी-नेते मंडळींना भेटले पाहिजे, त्यांचे काम पाहिले पाहिजे. अपघात झाला असेल, तर घटनास्थळी जायला पाहिजे. त्यातून वेगळी माहिती, प्रत्यक्ष स्थिती आणि समाजाचे चित्र कळते. वेगळ्या शहरात किंवा निवडणुकांसारखे मोठे उपक्रम कव्हर करण्याची संधी मिळाली तर पत्रकारांनी जायला पाहिजे. तरच मोठ्या क्षितिजाला गवसणी घालता येईल.’ 

‘इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तिमत्त्वांना प्रत्यक्ष भेटायला मिळाल्यामुळे, तसेच निवडणुकांच्या निमित्ताने बिहार, उत्तर प्रदेश आणि दंगल कव्हर करण्यासाठी हैदराबाद अशा विविध ठिकाणी फिरायला मिळाल्यामुळे खूप काही पाहता आणि शिकता आले, वेगवेगळे अनुभव घेता आले,’ असे त्यांनी सांगितले. 

डॉ. संघमित्रा फुले यांचा गौरव

कामत यांनी अनेक वर्षे पुण्यात पत्रकारिता केली आणि काही वर्षांपूर्वी ते रत्नागिरीत परतले. पत्रकारितेच्या बरोबरच रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी या आपल्या गावात लोकसक्षमीकरण चळवळ ही संस्था उभारून त्यांनी महिलांचे बचत गट उभारून त्या माध्यमातून सामाजिक कार्यही सुरू केले आहे. (‘राजवाडी पॅटर्न’बद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) ‘पुण्या-मुंबईत अनेक पुरस्कार मिळाले असले, तरी जन्मभूमीतील पहिलाच पुरस्कार असल्याने, तसेच मित्रमंडळींकडून पुरस्कार मिळत असल्याने, या पुरस्काराचा विशेष आनंद आहे,’ अशी भावना कामत यांनी व्यक्त केली. 

अभिजित हेगशेट्येज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्माण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘सध्याच्या पत्रकारांपुढे कोणाचा आदर्श घ्यायचा असे आव्हान आहे. सोशल मीडियामुळे प्रत्येक जण पत्रकार झाला आहे; पण विश्लेषण करणारे कोणी नाही, अशी स्थिती आहे. प्रश्न विचारण्याची तयारी दिसत नाही आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे न देणारे राजकीय नेतेही आता दिसतात. पूर्वी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळण्याचे प्रकार राजकीय नेत्यांकडून होत नसत. सध्याची पत्रकारिता तांत्रिकदृष्ट्या प्रगत असली, तरी गाभा कमी झाला आहे,’ असे ते म्हणाले.  

‘कॉर्पोरेट क्षेत्राचा प्रभाव वाढल्यामुळे पत्रकारितेची तत्त्वे घुसमटली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना काम करणे आव्हानात्मक झाले आहे; मात्र तरीही ते जबाबदारीने आणि चांगले काम करत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे,’ असेही हेगशेट्ये म्हणाले. 

पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रेय महाडिक, उपाध्यक्ष नीलेश जगताप, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, अरविंद कोकजे, प्रमोद कोनकर, अलिमियाँ काझी, नारळ संशोधन केंद्राचे माजी अधिकारी डॉ. दिलीप नागवेकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि पत्रकार उपस्थित होते. डॉ. संघमित्रा फुले यांनी या पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याचे प्रोत्साहन मिळाल्याची भावना व्यक्त केली. 

माजी सैनिक संघटनेतर्फे गौरव

या वेळी माजी सैनिक संघटनेचे शंकरराव मिल्के आणि सुभाष सावंत यांनीही पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला. पत्रकार अनघा निकम-मगदूम यांनी पुरस्कारांच्या मानपत्रांचे लेखन केले होते. विजय पाडावे, राकेश गुडेकर, मेहरून नाकाडे यांनी मानपत्रांचे वाचन केले. मीरा शेलार यांनी सूत्रसंचालन, तर राकेश गुडेकर यांनी आभारप्रदर्शन केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
निलेश About 170 Days ago
मस्त सविस्तर बातमी ...
0
0

Select Language
Share Link
 
Search