Next
पुण्याच्या प्राजक्ता काळे यांचे गिनीज रेकॉर्ड
तीन हजार ३३३ बोन्सायचा सर्वांत मोठा संग्रह
प्रेस रिलीज
Friday, November 16, 2018 | 01:23 PM
15 0 0
Share this story

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे प्राजक्ता काळे यांना प्रमाणपत्र प्रदान करताना रिशी नाथ. शेजारी डावीकडून विठ्ठल मणियार, डॉ. के. एच. संचेती, सुधीर मुनगंटीवार, गिरीधारी काळे, विकास खर्गे.

पुणे : एकाच ठिकाणी बोन्साय झाडांचा जगातील सर्वात मोठा संग्रह करून तो प्रदर्शित करण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पुण्यातील बोन्साय मास्टर प्राजक्ता गिरीधारी काळे यांनी पुण्यामध्ये प्रस्थापित केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील परीनिरीक्षक (अॅडज्यूडीकेटर) रिशी नाथ यांनी या विषयीची अधिकृत घोषणा करीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र १५ नोव्हेंबरला पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांना प्रदान केले.

या वेळी राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन खात्याचे सचिव विकास खर्गे, राज्याच्या उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे, उद्योजक प्रतापराव पवार, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, गिरीधारी काळे व्यासपीठावर उपस्थित होते.

प्राजक्ता यांनी पुण्यात तीन जजर ३३३ बोन्साय झाडांचा जगातील सर्वांत मोठा संग्रह करून तो एकाच ठिकाणी प्रदर्शित केला आहे. यामध्ये देशविदेशातील १५० हून अधिक झाडांच्या जातींचा समावेश आहे. यापूर्वी म्हैसूर येथील गणपती सच्चिदानंद यांचा २१ डिसेंबर २०१६ मध्ये दोन हजार ६४९ बोन्साय झाडांच्या प्रदर्शनाचे रेकॉर्ड केले होते. ते रेकॉर्ड प्राजक्ता यांनी पुण्यात मोडले. जगामध्ये बोन्साय या क्षेत्रामध्ये बहुतांशी पुरुष काम करतात आणि अनेक पुरुषच तज्ज्ञ आहेत. त्यामुळे बोन्सायमधील एवढा मोठा संग्रह असणारी पहिली महिला तज्ज्ञ हा मानही मिळवत प्राजक्ता यांनी पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

पुणे जिल्ह्यातील परंदवडी येथे प्राजक्ता यांनी विविध जातीच्या आणि विविध प्रकारच्या बोन्साय झाडांचा हा संग्रह केला आहे. त्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या समितीने १५ नोव्हेंबरला पाहणी केली आणि त्यानंतर पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राजक्ता यांना प्रदान केले. प्रमाणपत्र मिळाल्यावर प्राजक्ता भावूक झाल्या होत्या. त्यांनी ३५ वर्षांपूर्वी पुण्यात बोन्साय या कलेमध्ये काम करायला सुरुवात केली होती.

प्रातिनिधिक फोटोया वेळी बोलताना प्राजक्ता म्हणाल्या, ‘ज्यामध्ये मी मनापासून काम केले, त्यामध्ये आज जागतिक दर्जाचे अव्वल स्थान मिळाल्याचा खूप आनंद आहे. आजपर्यंत मी एकही बोन्साय विकलेले नाही; पण या कलेतून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी, यापुढेही काम करणार असून, विशेषत: ग्रामीण भागातील अनेक महिलांना प्रशिक्षण देणार आहे.’

मुनगंटीवार म्हणाले, ‘बोन्सायचा समावेश महाराष्ट्र शासन कौशल्य विकास योजनेमध्ये करणार असून, त्यामध्ये अभ्यासक्रम तयार करण्यात येतील, तसेच रोजगार निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला जाईल. साऱ्याच गोष्टी भारतामधून निर्माण झाल्या आणि त्या जगामध्ये गेल्या. जगभरात भारतीय गोष्टींमध्ये संशोधन सुरू आहे. प्राजक्ता काळे यांनी अशाच एका कलेला भारतामध्ये पुन्हा आणून देशाचे, राज्याचे आणि पुण्याचे स्थान जगामध्ये बोन्सायच्या माध्यमातून उंचावले आहे. येत्या काळात भारताला मोठ्या प्रमाणावर निर्यात करायची आहे. बोन्सायची निर्यात देखील यामध्ये महत्त्वाचा वाटा उचलू शकते.’

पर्यावरण आपल्या पुढच्या पिढीसाठीच नव्हे, तर आपल्यासाठीही महत्त्वाचे असून, वन ही संपत्ती आहे, हे आज प्रत्येकाच्या मनात ठसविले पाहिजे. त्यासाठी बोन्सायचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

खर्गे म्हणाले, ‘हे रेकॉर्ड ही महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. ही पूर्वी भारताची कला होती, पण अनेकांना माहित नव्हती. प्राजक्ता यांनी ती पुन्हा भारतात आणली आहे. महाराष्ट्र राज्याचे वनखाते यावर गंभीरपणे विचार करीत असून, प्राजक्ता काळे यांच्या मदतीने मुंबई आणि महाराष्ट्र राज्यामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी काम करणार आहोत.’

भारतीय पारंपरिक कलेला, भारतामध्येच मोठे केले असल्याचे संचेती रुग्णालयाचे प्रमुख आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती यांनी नमूद केले.

मणियार म्हणाले, ‘अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काळे कुटुंबियांनी काम केले. प्राजक्ता यांनी प्रतिकूल परिस्थिती असताना, कुटुंब सांभाळता सांभाळता, आपली कला जोपासली आणि त्या कलेलाच आपले ध्येय बनविले. हे त्यांचे ध्येय आज जागतिक स्तरावर गेले आहे.’

राज्याच्या उद्योग विभागाचे उपसचिव संजय इंगळे म्हणाले, ‘आपल्या देशाच्या पारंपरिक कलेची, प्राजक्ता काळे यांनी आम्हालाच नव्याने ओळख करून दिली. त्या कलेला रोजगारक्षम बनविले.’

प्रास्ताविक करताना गिरिधारी काळे म्हणाले, ‘भारताची कला भारतामधून लुप्त झाली होती आणि ती कला जपान-चीनमधील असल्याचे मानले जात होते; पण भारतामध्ये ही ‘वामनवृक्ष कला’ या नावाने प्रसिद्ध होती. आज जागतिक स्तरावर रेकॉर्ड झाल्यामुळे या कलेत पुन्हा भारताचे नाव पुढे आले आहे. जगाच्या नजरेमध्ये बोन्सायमध्ये भारताचे स्थान पुढे यावे, या उद्देशानेच याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात जागतिक दर्जाचे बोन्सायचे प्रदर्शन भरविण्यात आले होते आणि गिनीज रेकॉर्डचा प्रयत्न करण्यात आला. भारतामध्ये १५ हजार वृक्ष जाती असून, त्याचे मोठ्या प्रमाणावर बोन्साय करून रोजगार आणि निर्यात होऊ शकते.’

या वेळी प्राजक्ता काळे यांचे गुरू इंडोनेशिया येथील बोन्साय मास्टर रुडी नजाओ आणि अनेक देशांमधील बोन्सायचे तज्ज्ञ उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link