Next
मुंबईच...पण दक्षिणेच्या नजरेतून!
BOI
Monday, June 18, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this storyतमिळ आणि अन्य दक्षिण भारतीय भाषांच्या चित्रपटांमधून होणारे मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राचे दर्शन वेगळे असते. त्यात मुंबई किंवा महाराष्ट्राची ओळख असलेला गणेशोत्सवासारखा उत्सव दिसतो क्वचित; पण दिसेलच असे नाही; मात्र मायानगरी मुंबईच्या अनेक वेगळ्या पैलूंवर त्यातून प्रकाश पडतो. जी गोष्ट आपल्यासाठी सर्रास असते, ती इतरांच्या दृष्टीने अनोखी वाटू शकते. केशवसुतांच्या भाषेत सांगायचे, तर ‘साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे’ अशी ही अवस्था असते. 
.......
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘काला’ चित्रपट प्रदर्शित झाला तो नेहमीप्रमाणे थाटामाटात, जल्लोषात आणि उत्साहात! रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशाची किनार या चित्रपटाला लाभलेली असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांचा उत्साह कांकणभर जास्तच होता. त्याशिवाय या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे या चित्रपटाच्या कथेला असलेली मुंबईची पार्श्वभूमी. रजनीकांत यांनी या चित्रपटात धारावीच्या झोपडपट्टीचा अनभिषिक्त बादशहा असलेल्या काला करक्कालन या डॉनची भूमिका केली आहे, हे तर आता सर्वांनाच माहीत झाले आहे. 

आपल्याकडे तमिळ, तेलुगू, मराठी, मल्याळम अशा सर्व भाषांना प्रादेशिक भाषा नावाच्या एका माळेत ओवण्यात येते. तमिळ तमिळनाडूची, तेलुगू आंध्र आणि आता तेलंगणची, मल्याळम केरळची असे भाषांचे कप्पे आपण पाडले आहेत. भाषावार प्रांतरचना ही आपण कारभाराच्या सोयीसाठी स्वीकारलेली व्यवस्था. परंतु आपण तिचा अर्थ एका राज्यापुरती मर्यादित झालेली भाषा असा घेतला आहे. त्यामुळेच एखाद्या तमिळ चित्रपटात तमिळनाडूतील संस्कृती दिसावी, अशी आपली  स्वाभाविक अपेक्षा असते. ‘काला’सारखे पिक्चर ही संकल्पना मोडून काढतात. अर्थात रजनीकांत यांच्या याआधीच्या ‘कबाली’ या चित्रपटात तर कथा मलेशियात घडते. त्यामुळे मुंबई ही त्या मानाने किस झाड की पत्ती! चित्रपट रसिकांमध्ये रजनीकांत यांची असलेली प्रतिमा आणि दक्षिणेच्या चित्रपटांबद्दल निर्माण झालेली भावना, यामुळे प्रेक्षकांनाही अतिशयोक्तीचेही काही वाटत नाही.

...पण तमिळ आणि अन्य दक्षिण भारतीय भाषांच्या चित्रपटांमध्ये मुंबई, पुणे किंवा महाराष्ट्राचे दर्शन ही फारशी नवलाची बाब नाही. खुद्द रजनीच्या चित्रपटातच मुंबईचे यथेच्छ दर्शन घडलेले आहे आणि वर चाहत्यांचा विशेष उत्साह असे जे म्हटले आहे, त्याचा संदर्भ त्या मुंबईवाल्या चित्रपटाशीच आहे. ‘बाशा’ हा रजनीकांत यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड मानला जाणारा चित्रपट. तेवीस वर्षांपूर्वी, १९९५ साली ‘बाशा’ चित्रपटगृहांमध्ये झळकला आणि त्याने तिकीटबारीवर विक्रम रचले. या चित्रपटात रजनीकांत यांनी मुंबईतील डॉनची भूमिका केली होती. त्याची मोहिनी एवढी, की गेल्या वर्षी त्याचे पुन्हा प्रदर्शन करण्यात आले आणि पहिल्या रिलीजएवढेच त्याचे स्वागत झाले. त्यामुळे मुंबई आणि रजनीकांत हे एक विशेष समीकरण तयार झाले. 

चंदेरी दुनियेतील तब्बल ४२ वर्षांची कारकीर्द गाजविणाऱ्या रजनीकांत यांची सातत्याने तुलना झाली ती कमल हासन यांच्याशी. आता या दोघांनीही आपापले राजकीय पक्ष काढून ती, तुलना म्हणा वा स्पर्धा म्हणा, पुढे नेली आहे. रजनीच्या कारकिर्दीत जसा एक मुंबईचा चित्रपट मानाचे स्थान पटकावून आहे, तसेच कमल हासन यांचाही मुंबईच्या पार्श्वभूमीवरील एक चित्रपट महत्त्वाचा ठरला आहे. मणिरत्नम यांनी दिग्दर्शित केलेला ‘नायगन’ चित्रपट १९८६ साली प्रदर्शित झाला होता. ‘नायगन’ने कमल हासन यांना प्रसिद्धी आणि मान्यता मिळवून दिली. ‘टाइम’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने केलेल्या जगातील सर्वकालीन शंभर श्रेष्ठ चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाला जागा मिळाली आहे. मुंबईचीच पार्श्वभूमी असल्यामुळे ‘नायगन’मध्ये या शहराचे सांगोपांग दर्शन घडते. याही चित्रपटात धारावीची झोपडपट्टी आहे. परंतु त्याची गंमत अशी, की ही झोपडपट्टी मुंबईतील झोपडपट्टी नव्हती. मणिरत्नम यांनी चेन्नईत उभारलेल्या सेटची ती कमाल होती. हिंदीत हा चित्रपट ‘दयावान’ नावाने आला होता, त्यात विनोद खन्नांची भूमिका होती. मणिरत्नम यांच्याच ‘बॉम्बे’बद्दल तर बोलायलाच नको. 

याव्यतिरिक्त विजय, अजित आणि सूर्या या नव्या पिढीतील सुपरस्टारच्या चित्रपटांमध्येही मुंबईची रंगत दिसून आली आहे. गेल्या वर्षी ‘मेर्सल’ चित्रपटावरून वादात सापडलेल्या विजय याच्या ‘नेंजिनीले’, ‘तुप्पाकी’ या चित्रपटांमध्ये मुंबईची पार्श्वभूमी आहे. यातील ‘तुप्पाकी’चा रिमेक हिंदीमध्ये ‘हॉलिडे’ या नावाने झाला होता आणि त्यात अक्षय कुमार होता. मुंबईच कशाला, १९९९मध्ये आलेल्या विजयच्या ‘तुळ्लाद मनमुम तुळ्ळुम’ या चित्रपटाची सुरुवात पुणे रेल्वे स्टेशनवरून होते. अर्थात चित्रपटात दिसलेले पुणे स्थानक हे खरे नव्हते, तर तो सेटच होता.

अजित याने काम केलेल्या ‘मांगाता’ या चित्रपटाची कथा मुंबईत घडते, तर सूर्याचा अंजान हा चित्रपट ८० टक्के मुंबईतच घडतो. याशिवाय अॅक्शन किंग अर्जुनची भूमिका असलेला ‘ऱ्हिदम’ हाही संपूर्ण मुंबईत घडणारा चित्रपट. दिग्दर्शक कदिर याने दिग्दर्शित केलेल्या या आणि ‘कादलर दिनम’ (दिल ही दिल में) या चित्रपटाला मुंबईची पार्श्वभूमी लाभली आहे. कादल देसम (हिंदीत दुनिया दिलवालों की) या चित्रपटात मुंबईचे वेगळे, सुंदर चित्रण पाहायला मिळाले होते. जीवा याची मुख्य भूमिका असलेल्या ‘यान’ चित्रपटातही आपली मुंबई दिसली होती.

तमिळशिवाय तेलुगू आणि मल्याळम, तसेच कन्नड चित्रपटांमध्येही मुंबई नगरी झळकली आहे. दोन वर्षांपूर्वी आलेल्या ज्युनिअर एनटीआरच्या ‘जनता गॅरेज’ या चित्रपटात १५ ते २० टक्के कथा मुंबईत घडते. अगदी या महिन्यात रामगोपाल वर्माने दिग्दर्शित केलेल्या आणि नागार्जुनची भूमिका असलेल्या ‘ऑफिसर’ या तेलुगू चित्रपटातही मुंबईची प्रमुख भूमिका आहे. प्रियदर्शन याने दिग्दर्शित केलेल्या आणि मल्याळम सुपरस्टार मोहनलाल याची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अभिमन्यू’मध्ये (वर्ष १९९१) मुंबई दिसलीच होती. मुंबईतील मल्याळी भाषक स्थलांतरितांचे जीवन त्यात दिसले होते. 

या चित्रपटांमध्ये मुंबई कशी दिसते? ‘काला’मध्ये मराठीमिश्रित तमिळ ऐकू येते. त्यामुळे ‘मचमच वेण्डाम’ (मचमच करू नको) असे उद्गार ऐकायला मिळतात. एरव्ही या चित्रपटांमध्ये मुंबईतील भाषा मराठी नसून हिंदी असते. (दाक्षिणात्यांना बहुधा मराठीपेक्षा हिंदी जवळची वाटत असावी!) त्यात मुंबई किंवा महाराष्ट्राची ओळख असलेला गणेशोत्सवासारखा उत्सव (बाशा) दिसतो क्वचित; पण दिसेलच असे नाही; मात्र मायानगरी मुंबईच्या अनेक वेगळ्या पैलूंवर त्यातून प्रकाश पडतो. जी गोष्ट आपल्यासाठी सर्रास असते, ती इतरांच्या दृष्टीने अनोखी वाटू शकते. केशवसुतांच्या भाषेत सांगायचे, तर ‘साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे’ अशी ही अवस्था असते. त्यामुळे ते बघायला मजा येते, आपल्यालाही काही वेगळे सांगून जाते. 

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link