Next
राजगुरूंच्या पुतळ्याचे १४ वर्षे रोज पूजन; गिलबिले गुरुजींचा उपक्रम
BOI
Friday, March 23, 2018 | 02:31 PM
15 0 0
Share this story

राजगुरुनगर (पुणे) : आज २३ मार्च अर्थात शहीद दिन. १९३१मध्ये याच दिवशी ब्रिटिश सरकारने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिले होते. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी विविध कार्यक्रमांसह ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्यांची सफाई आणि पूजनही केले जाते. या पार्श्वभूमीवर, हुतात्मा राजगुरू यांचे जन्मगाव असलेल्या राजगुरुनगर येथील मधुकर गिलबिले गुरुजींचा उपक्रम उल्लेखनीय आहे. 

हे गिलबिले गुरुजी राजगुरुनगर बसस्थानकाशेजारी असलेल्या हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्याची सफाई गेली सलग १४ वर्षे दररोज न चुकता करत आहेत. स्वखर्चाने ताजा पुष्पहार घालण्याचे कामही ते करत आहेत. देशासाठी प्राण दिलेल्या राजगुरू यांचा त्याग स्मरणात राहावा, या उद्देशाने हे कार्य आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

गिलबिले गुरुजी २००४मध्ये राजगुरुनगरला वास्तव्यास आले. तेथे असलेल्या हुतात्मा राजगुरू पुतळ्याची अस्वच्छता पाहून ते व्यथित झाले. त्या परिस्थिती सुधारणा होण्यासाठी त्यांनी दररोज स्वतःच त्याची स्वच्छता करण्याचे काम हाती घेतले. आता तो गुरुजींच्या दिनक्रमातला अविभाज्य भागच बनला आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न करता गुरुजी हे काम रोज सकाळी शाळेत जाण्यापूर्वी करतात.

पंजाबमधील फिरोजपूर येथे राजगुरू यांची समाधी आहे. तेथे दोन वेळा भेट दिल्यामुळे प्रेरणा मिळाली, अशी त्यांची भावना आहे. हुतात्मा राजगुरू यांच्या चरित्राचा अभ्यास करून अनेक व्याख्यानेही देण्याचे काम गुरुजी करत आहेत. त्यांच्या स्मारकाचे बांधकाम होण्यासाठीच्या स्मारक समितीत सचिव पदावरही काही वर्षे त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन गुरुजींना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री गिरीश बापट यांनी विशेष सत्कार केला आहे. चित्रपट अभिनेते विक्रम गोखले यांनीही या कामाचे कौतुक केले आहे.

आजच्या गतिमान जीवनात प्रत्येकाला वेळेची खूप कमतरता असताना एखादा असा उपक्रम सुरू करणे व चौदा वर्षे अखंडपणे चालवणे खूपच अवघड आहे. परंतु हुतात्मा राजगुरूंनाच आपले प्रेरणास्थान मानून गुरुजी हे सेवाकार्य करतात. या कार्याची प्रेरणा घेऊन युवकांनी महापुरुषांच्या पुतळ्यांचे पावित्र्य जपण्यासाठी पुढे यावे, अशी गुरुजींची भावना आहे. कारण महापुरुष हेच आपले प्रेरणास्रोत असतात. म्हणूनच आपण त्यांची स्मारके, पुतळे उभे करत असतो, असे त्यांना वाटते. शहीद दिन पाळत असताना अशा काही कामाचा संकल्प करणे हीच हुतात्मा राजगुरू, भगतसिंग व सुखदेवांना खरी श्रद्धांजली ठरेल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link