Next
‘लोकप्रियता आणि बहुसंख्यकवाद देशासाठी घातक’
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, July 04, 2019 | 06:00 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘देशात २०१४-१५ वर्षांत झालेल्या एका सर्व्हेक्षणामध्ये तब्बल १६ टक्के नागरिकांनी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे बोलून दाखविले होते. २०१९ च्या दरम्यान याच सर्व्हेक्षणात तब्बल ४० टक्के नागरिकांनी आपली पसंती सक्षम नेतृत्वाला दर्शविली. यावरून देशात ‘पॉप्युलॅरिझम अर्थात लोकप्रियता वाढत आहे. याबरोबरच वाढत असलेला मेजॉरिटेरिएनिझम अर्थात बहुसंख्यकवाद हे देशासमोर अनेक प्रश्न उपस्थित करीत आहे. या परिस्थितीत वाढत असलेली लोकप्रियता आणि बहुसंख्यकवाद देशासाठी घातक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले. 

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘२०१९ इलेक्शन – कंटिन्यूटी फ्रॉम २०१४; डिपार्चर फ्रॉम पास्ट’ याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी पुणे इंटरनॅशनल सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, कार्यक्रम समितीचे प्रमुख अमिताव मलिक, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी उपस्थित होते.      

प्रा. पळशीकर म्हणाले, ‘नुकत्याच देशात झालेल्या निवडणुकांचा निकाल हा धक्कादायक मानला जात आहे; मात्र तसे म्हणणे चुकीचे आहे, कारण २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे बहुमताने आलेले सरकार ही या सर्वांची नांदी होती. हा निकाल धक्कादायक नसून स्वीकारण्याजोगा आहे. कारण भाजपचा पक्ष आणि नेतृत्व करणारा पक्ष इथपर्यंत झालेला प्रवास मोठा आहे; मात्र हे होत असताना त्यांना नरेंद्र मोदी या नावाचा फायदा झालेला आहे. असे असले, तरी लोकप्रियतेचा तोटा हा लोकशाहीलादेखील आहे, कारण बहुमताने निवडून दिलेले नेतृत्व बहुमत आले, तर मी काहीही करू शकेल अशा मार्गावर जाण्याची शक्यता असते. जिचा भविष्यात लोकशाहीला तोटा होऊ शकतो.’

‘आज देशात ४० वर्षांपर्यंतच्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच मतदार मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयाचा वापर करीत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचे मत हे पुढील काही निवडणुकांमध्ये सारखेच राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणी भाजपला आशा ठेवायला हरकत नाही. याबरोबरच देशाच्या राज्याराज्यात समाज, धर्म, भाषा यांवर आधारित समाज एकत्र येऊन बहुसंख्यकवादाची उदाहरणे आपण पाहिली आहेत; मात्र हा बहुसंख्यकवाद आता देशासारख्या मोठ्या स्तरावर वाढू लागला आहे आणि याचा देखील देशाच्या लोकशाहीला फटका बसू शकतो,’ असेही प्रा. पळशीकर यांनी नमूद केले.

या बरोबरच उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, अनुसूचित जाती जमाती यांच्या वाढलेल्या मतांचा फायदा हा भाजपला झाला असून, केवळ महिलांच्या मतांमध्ये तीन टक्क्यांनी घसरण झाली आहे. याबरोबरच हिंदू वगळता मुस्लीम, शीख, ख्रिस्ती धर्मीयांची मतेदेखील २०१४च्या मतांपेक्षा कमी झाली; मात्र २०१४ साली ३१ टक्के असलेला भाजपचा एकूण वोट शेअर हा २०१९ ला ३७ टक्क्यांवर आला ही बाबदेखील महत्त्वाची आहे,’ असेही प्रा. पळशीकर यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search