Next
मुलांच्या मनातील अस्वस्थता जाणा...
BOI
Saturday, April 21 | 06:45 AM
15 0 0
Share this story


सीमाला लहानपणापासून सतत आईबरोबर असण्याची सवय होती; पण आईने सुरू केलेल्या नव्या व्यवसायामुळे त्याच्यात बदल झाला. हा बदल स्वीकारणं सीमाला अवघड जात होतं. त्यातही ती वयाने लहान असल्याने या बदलांमुळे जाणवणारी अस्वस्थता तिच्या वर्तनातून व्यक्त होत होती... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मनातील अस्वस्थतेबद्दल... 
.............................................
सीमा हल्ली मित्र-मैत्रिणींशी नीट खेळत नव्हती. आधी सगळ्या गोष्टींमध्ये ती पुढे असायची, आता मात्र ती जबरदस्तीने खेळतीये असं वाटत होतं. तिच्या शाळेतून, आत्ता नव्याने घातलेल्या पाळणाघरातून, संस्कारवर्गातून अशा सर्व ठिकाणांहून तिच्या तक्रारी येऊ लागल्या. यामुळे तिची आई वैतागून गेली होती. गेल्या सहा महिन्यांत तिच्या तक्रारी खूपच वाढल्या होत्या. गटातल्या मुलांना मारणं, ढकलणं, चावणं, वस्तू फेकणं, अॅक्टिव्हिटीजला अजिबात न बसणं, हट्टीपणा करणं अशा अनेक तक्रारींची यादीच आईला रोज सगळीकडे ऐकून घ्यावी लागत होती. या तक्रारी ऐकून आई काळजीत पडायची. सीमाला समजवायची. ऐकताना सीमा सगळं नीट ऐकायची. शहाण्यासारखं वागेन, असंही सांगायची; पण परत काही दिवसांनी तिच्याबद्दलच्या तक्रारी सुरू व्हायच्या. 

रागाच्या भरात आईने तिला तीन-चार वेळा मारलंही; पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. शेवटी शाळेतल्या बाईंनी सुचवलं म्हणून सीमाची आई भेटायला आली. भेटायला आल्यावर आईने स्वतःची ओळख करून दिली आणि सीमाची समस्या सांगितली. काय करावं, तिच्या समस्या कशा सोडवाव्यात आईला समजत नव्हतं. त्यामुळे हे सारं सांगताना तिच्या डोळ्यात पाणी येत होतं. तिचं बोलून झाल्यावर आणि ती थोडी शांत झाल्यावर त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल अधिक सविस्तर माहिती घेतली. 

त्यातून लक्षात आलेली समस्या अशी, की सीमा साडे तीन वगैरे वर्षांची होईपर्यंत सीमाची आई घरीच होती. ती पूर्ण वेळ सीमाबरोबर असायची. त्यामुळे मग रोज संध्याकाळी फिरणं, बागेत जाणं, आईशी खूप गप्पा मारणं, तिला वेगवेगळे प्रश्न विचारणं असा सगळा सीमाचा दिवस छान जायचा. शिवाय संध्याकाळी बाबा आल्यानंतर ती त्यांचाशी खेळायची. त्यामुळे तिला या सगळ्याची खूप सवय झाली होती. 

आता ती थोडी मोठी झाल्यावर तिचा सर्वांगीण विकास व्हावा आणि ती काही अंशी धीट व्हावी, सर्वांमध्ये मिसळावी असा विचार करून आईने तिला थोडा थोडा वेळ पाळणाघरात पाठवायला सुरुवात केली. काही दिवसांनी शाळेतही घातलं. ती दोन्हीकडे छान रुळल्यानंतर आईने स्वतःचं ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेतला. सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करून आईने पार्लर सुरू केलं. सीमाच्या बाबांनीही आईला खूप उत्तम साथ दिली. पार्लर छान सुरू झालं. आई आपला नवीन व्यवसाय आणि सीमा अशी तारेवरची कसरत आनंदाने पार पाडत होती. परंतु सगळं छान सुरू असताना मधेच सीमा अशी वागायला लागल्याने आई पुरती गोंधळून गेली. 

तिला काहीच कळेना, असं का होतंय ते. आपण पार्लर सुरू करून काही चुकीचा निर्णय घेतला का, असं सीमाच्या आईला वाटू लागलं. याबाबत बोलताना आईच्या बोलण्यातून सीमामध्ये निर्माण झालेल्या वर्तन समस्यांची कारणं उलगडत गेली. त्यामुळे पुढच्या काही सत्रांत सीमाच्या आई-वडिलांना सांगून तिच्या पाळणाघरातील आणि शाळेतील तिची काही निरीक्षणे मागवली. सीमाला लहानपणापासून सतत आईबरोबर असण्याची सवय होती; पण आईने सुरू केलेल्या नव्या व्यवसायामुळे त्याच्यात बदल झाला. हा बदल स्वीकारणं सीमाला अवघड जात होतं. त्यातही ती वयाने लहान असल्याने या बदलांमुळे जाणवणारी अस्वस्थता तिच्या या अशा वर्तनातून व्यक्त होत होती. 

हे सगळं ऐकल्यावर आईचा व्यवसाय बंद न करता काय करता येईल यावर विचार केला गेला. त्यात आपण सीमाला हा बदल स्वीकारायला कशा पद्धतीने मदत करू शकतो, कोणते छोटे परंतु महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत, आई-बाबांसाठी आपण आधीसारखेच कसे महत्त्वाचे आहोत, असं तिला वाटावं यासाठी काय केलं पाहिजे, याबद्दल त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. त्याप्रमाणे आई-वडिलांनी अपेक्षित सहकार्य केल्याने सीमाच्या समस्या हळूहळू सुटत गेल्या.

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link