Next
‘आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला हवे’
‘सातचा चहा’ उपक्रमात लेखक अनिल अवचट यांचे मत
BOI
Thursday, September 27, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this storyनाशिक :
‘सध्याच्या व्हर्च्युअल जगातून पुन्हा ग्रामीण संस्कृतीकडे वळायला पाहिजे. आजच्या युवा पिढीने आवड असणाऱ्या क्षेत्रात आपले करिअर करायला हवे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट यांनी केले. नाशिक रोड येथील ‘सातचा चहा’ या सामाजिक उपक्रमात नुकतेच त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली आणि ‘फेसबुक लाइव्ह’द्वारेही ती प्रसारित करण्यात आली.

ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अरुण ठाकूर, अमोल पाध्ये, अमोल भुट्टे, प्लास्टिक मुक्ती तज्ज्ञ मिलिंद पगारे, आम आदमी पक्षाचे प्रवक्ते जितेंद्र भावे, सचिन मालेगावकर आदी या वेळी उपस्थित होते. या सर्वांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अनिल अवचट यांनी विविध विषयांवर भाष्य केले. 

‘आजकालची पिढी व्यसनाधीन होत चालली असून, भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव पडत आहे. महिलांचे व्यसनाधीन होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.

‘मराठी साहित्यात होणारे बदल आणि भविष्यात येणारी आव्हाने यांचा विचार करून स्वतःचे उपजीविकेचे साधन सांभाळून सर्व गोष्टी करायला हव्यात,’ असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘समाजात श्रीमंत आणि गरीब वर्गाची दरी आहे, ती दूर झाली पाहिजे आणि समानता आली पाहिजे. समाजात बदल घडवणे ही आपली जबाबदारी आहे,’ असे ते म्हणाले. 

अवचट यांनी आपले लेखन आणि आपले वैद्यकीय शिक्षण यांच्याशी कशी सांगड घातली, हे उलगडून दाखवले. ‘आवडीची गोष्ट व्यक्तीचे करिअर बनू शकते. यांत्रिकीकरण होत असल्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे स्वतःमधील कलाकौशल्य स्वतः विकसित केले पाहिजे. येणारी आव्हाने ओळखून समजूतदारपणे पावले पुढे टाकली पाहिजेत,’ असा सल्ला त्यांनी दिला.

(#सातचा_चहा या उपक्रमाबद्दल सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. अनिल अवचट यांच्याबद्दल आणि त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांच्या पुस्तकांसाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link