Next
लोटस पब्लिकेशन्सच्या दोन पुस्तकांचे अभिनेते सचिन खेडेकरांच्या हस्ते प्रकाशन
प्रेस रिलीज
Friday, June 30, 2017 | 05:58 PM
15 0 0
Share this article:

लोटस पब्लिकेशन्सच्या दोन पुस्तकांचे अभिनेते सचिन खेडेकरांच्या हस्ते प्रकाशन
 कोल्हापूर : ‘लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ची निर्मिती असलेल्या ‘गर्द सभोवती’ आणि ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ : न्यायवैद्यक शास्त्र’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन अभिनेते सचिन खेडेकर हस्ते करण्यात आले. या वेळी ‘गर्द सभोवती’च्या लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ - न्यायवैद्यक शास्त्र’च्या लेखिका डॉ. वसुधा आपटे, निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, लोटस पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे समीरसिंह दत्तोपाध्याय उपस्थित होते.

या वेळी सचिन खेडेकर म्हणाले, ‘आशालताताईंनी जीवनातील ६० वर्षे रसिकांची सेवा केली आहे. त्यांनी केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी भाषेतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशा ज्येष्ठ अभिनेत्रींच्या कारकिर्दीतील अनमोल आठवणी एका पुस्तकात बंदिस्त करून सादर करणे ही वाचकांसाठी मोठी पर्वणीच आहे. त्याचप्रमाणे डॉ. वसुधा आपटे यांचे ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ : न्यायवैद्यक शास्त्र’ हे पुस्तक पोलिसांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. न्यायवैद्यकशास्त्र गुन्हेगारांचा माग घेण्यात कशा प्रकारे सहायक ठरतं, त्याची विस्तृत माहिती या पुस्तकात आहे. ही दोन्ही पुस्तकं वाचनाबाबत रुची निर्माण करणारी आहेत. आजही वाचनसंस्कृती आहे. परंतु आता ती जोपासण्याची गरज आहे. पाहता येत असेल, तर वाचायची काय गरज, ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. वाचनसंस्कृती टिकावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.’

माफक आणि सर्वंकष यांतील फरक सांगत या पुस्तकांचं प्रकाशन हे केवळ अनुभवांची शिदोरी इतकेच मर्यादित नसल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालक विनोद सातव यांच्या आग्रहाखातर खेडेकर यांनी ‘विंदां’च्या लेखणीतून आकाराला आलेल्या ‘... त्याला तयारी पाहिजे’ या कवितेचे आपल्या खुमासदार शैलीत वाचन करून उपस्थितांची दाद मिळवली.

आशालता वाबगावकर आणि डॉ. वसुधा आपटे या दोन्ही लेखिकांनी आपल्या लेखनाचे श्रेय डॉ. अनिरुद्धबापू जोशी यांना देऊन त्यांच्या प्रेरणेनेच लेखिका बनल्याचे मत व्यक्त केले. आशालताताई म्हणाल्या, ‘‘गर्द सभोवती’ हे पुस्तक म्हणजे आजवरच्या प्रवासात आलेल्या आठवणींचा अल्बम आहे. आयुष्यातील जुन्या आठवणी कागदावर उतरवत गेले आणि त्या लेख स्वरूपात प्रकाशित होत गेल्या. आज त्या पुस्तक रूपाने वाचकांच्या समोर येत असल्याचा अत्यानंद होत आहे. अजून खूप आठवणी शिल्लक आहेत. त्या यापुढेही लिहीत राहीन.’

प्रवीण दीक्षित यांनी न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे काय, याची थोडक्यात माहिती देऊन पोलिस तपास यंत्रणेत सहभागी असणाऱ्या नवनवीन यंत्रणांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचीही निर्मिती करण्याचे आवाहन ‘लोटस पब्लिकेशन्स’ला केले.

३५ वर्षे न्यायवैद्यक शास्त्रामध्ये सेवा देणाऱ्या डॉ. वसुधा आपटे यांनी २००६नंतर ‘प्रत्यक्ष’च्या माध्यमातून लेखमालेला सुरुवात केली. ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ : न्यायवैद्यकशास्त्र’ या पुस्तकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या, ‘आपल्या समाजात न्यायवैद्यक शास्त्राबाबत माहिती फार कमी आहे. समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत. मृत्यू हा जिथे केंद्रस्थानी असतो अशा कार्यक्षेत्रामध्ये काम केल्यानंतर मृत्यूबद्दलची भीती खूपच कमी झाली. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घ्यावे आणि जीवनाची आनंदयात्रा व्हावी, असे वाटायचं. हे पुस्तक म्हणजे याच आनंदयात्रेचा एक भाग आहे.’

आपटे यांच्या पुस्तकाची प्रस्तावना प्रवीण दीक्षित यांनी लिहिली असून, आशालता वाबगावकर यांच्या ‘गर्द सभोवती’ या पुस्तकाला अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांची प्रस्तावना लाभली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search