Next
महारेराचा तक्रार निवारण मंच
प्रेस रिलीज
Wednesday, January 31, 2018 | 11:57 AM
15 0 0
Share this article:

रणजित नाइकनवरे, शिरीष मुळेकर, सुहास मर्चंट, शांतीलाल कटारिया, श्रीकांत परांजपे, ललिता कुलकर्णी, ज्ञानेश्वर हडदरे व रोशन यादव

पुणे : ‘महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण’ अर्थात् ‘महारेरा’कडे दाखल होणाऱ्या ग्राहक आणि विकासक यांच्यातील तक्रारींची संख्या कमी व्हावी व कायदेशीर प्रक्रियेआधी योग्य संवादाद्वारे त्यांचे निराकरण व्हावे, या उद्देशाने राज्यात प्रथमच एका तक्रार निवारण मंचाची स्थापना करण्यात आली आहे. येत्या एक फेब्रुवारी पासून सदर मंचाच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती, पुण्यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत देण्यात आली. 
 
या वेळी ‘कॉन्फिडरेशन ऑफ रियल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ अर्थात क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, उपाध्यक्ष सुहास मर्चंट, सचिव रणजीत नाईकनवरे, मुंबई ग्राहक पंचायतीचे पुण्यातील प्रतिनिधी शिरीष मुळेकर, विश्वस्त ललिता कुलकर्णी, महारेराचे तांत्रिक प्रमुख ज्ञानेश्वर हडदरे, केपीएमजी या संस्थेचे रोशन यादव यांच्यासह क्रेडाई आणि ग्राहक पंचायतीच्या तक्रार निवारण मंचाचे सदस्य उपस्थित होते.

या मंचाविषयी अधिक माहिती देताना सुहास मर्चंट म्हणाले, ‘बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यामध्ये अनेकदा वाद होत असतात. हे वाद आता तक्रारींच्या स्वरूपात महारेराकडे निवारणासाठी जातात. मात्र याआधी हे वाद सोडविण्याचा एक सकारात्मक प्रयत्न म्हणून या मंचाची स्थापना होत आहे.’ 

‘महारेराकडे रोज अनेक तक्रारी दाखल होत असतात. रेरा कायद्याच्या कलम ३२(जी)नुसार, अशा स्वरूपाचा मंच किंवा व्यासपीठ असण्याची गरज सर्वच स्तरांतून व्यक्त होत होती आणि या मागणीचा सकारात्मक विचार करीत महारेराचे प्रमुख गौतम चॅटर्जी यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘महारेरा’च्या माध्यमातून मुंबईत दहा, तर पुण्यात पाच केंद्रे स्थापन करण्यात आली असून; सुरुवातीला पुण्यातील केंद्रे औंध येथील महारेरा कार्यालय व कॅम्प परिसरातील क्रेडाई पुणे मेट्रोचे कार्यालय येथून कार्यरत असतील,’ अशी माहिती क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांनी दिली.

‘क्रेडाई, पुणे तर्फे रोहित गेरा, अनिल फरांदे, मनीष जैन, अमर मांजरेकर, आय. पी. इनामदार हे सदस्य या मंचाचे सदस्य असतील, तर मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागातर्फे ललिता कुलकर्णी, शिरीष मुळेकर, केशव बर्वे, तनुजा राहणे, कल्पिता रानडे आणि संजीव कुलकर्णी हे सदस्य असतील,’ असे शांतीलाल कटारिया यांनी जाहीर केले.

बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहक यांच्यातील वाद; त्या दोघांच्या संमतीने तक्रार निवारण मंचाच्या माध्यमातून सामोपचाराने मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येईल. परंतु यासाठी दोघांनीही या मंचासमोर येण्याची तयारी दर्शविणे आवश्यक आहे. यामुळे ग्राहक व बांधकाम व्यावसायिक यांच्यामध्ये सुसंवाद तर वाढेलच, त्याबरोबरच ‘महारेरा’कडे जाणाऱ्या तक्रारींच्या संख्येत लक्षणीय घट होईल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक फोरममध्ये क्रेडाई पुणे व मुंबई ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश असणार असल्याची माहिती शिरीष मुळेकर यांनी दिली. विशेष म्हणजे फक्त महारेरा अंतर्गत नोंदणी झालेल्या प्रकल्पांसंदर्भातच तक्रारी सदर मंचाअंतर्गत घेतल्या जाणार असून, येत्या १ फेब्रुवारी पासून ‘महारेरा’ च्या संकेतस्थळावर त्या नोंदविता येणे शक्य होणार आहे. ४५ दिवसात समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर तक्रारदाराला ‘महारेरा’ पुढे अपील करता येणे शक्य असल्याचा खुलासा, या वेळी मर्चंट यांनी केला. ‘एक फेब्रुवारीपासून दाखल झालेल्या तक्रारीच या मंचासमोर येतील आणि ग्राहक पंचायतीमध्ये याआधी दाखल झालेली प्रकारणे त्यांच्या परवानगी शिवाय तक्रार निवारण मंचाकडे वळविता येणार नाहीत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search