Next
‘कचरा व्यवस्थापनामध्ये पुणे सर्वोत्तम’
प्रेस रिलीज
Wednesday, February 14, 2018 | 02:28 PM
15 0 0
Share this story

सिंबायोसिसमध्ये आयोजित ‘कचरा व्यवस्थापन’ विषयावरील चर्चासत्रात मार्गदर्शन करताना अर्थशास्त्रज्ञ डॉ. इशेर जज अहलुवालिया
पुणे : ‘कचरा व्यवस्थापनामध्ये पुणे हे सर्वोत्तम शहर आहे. येथे घरोघरी कचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरणाचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे; तसेच ‘स्वच्छ’ संस्थेचा उपक्रमही फायदेशीर ठरत आहे. कचरा व्यवस्थापन ही व्यापक समस्या असून सर्व ठिकाणी ते एकच व्यवस्थापन प्रणाली कार्यरत नसते. सार्वजनिक खासगी भागिदारीत (पीपीपी) व काही खासगी संस्थांकडून कचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प राबविले जात आहेत; मात्र त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे’, असे मत अर्थशास्त्रज्ञ डॉ. इशेर जज अहलुवालिया यांनी व्यक्त केले. 

सिंबायोसिस विश्वविद्यालय (अभिमत विद्यापीठ)आणि  सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सतर्फे ‘कचरा व्यवस्थापन’ या विषयावरील चर्चासत्राचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या. या चर्चासत्रात प्रा. शरद काळे हेदेखील  प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. डॉ. अहलुवालिया या नामांकित अर्थशास्त्रज्ञ असून, त्या इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशनच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षही आहेत. प्रा. काळे हे सिम्बायोसिस सेंटर फॉर वेस्ट रिसोर्स मॅनेजमेंटचे संचालक आहेत. या  चर्चासत्रासाठी सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि सिम्बायोसिस विश्वविद्यालयाच्या कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते,  सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या संचालक डॉ.ज्योती चंडीरमानी उपस्थित होत्या.

‘आरोग्य मंत्रालयाकडून इ-कचऱ्यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचा काही प्रमाणात आभाव आहे. मंत्रालयाकडून याबाबत जागरूकता निर्माण करणे अपेक्षित असून, नेमका इ-कचरा कशाला म्हणायचा याचे धोरण ठरविले पाहिजे. बायो मेडिकल कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास त्यापासून रोगराई पसरू शकते. अशा कचऱ्याचे व्यवस्थापन काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने करणे गरजेचे आहे, असेही डॉ. अहलुवालिया म्हणाल्या.

सिंबायोसिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांसाठी यंदा कचरा व्यवस्थापन या विषयावरील प्राथमिक आणि दुय्यम संशोधन प्रकल्प ही संकल्पना देण्यात आली होती. त्याअंतर्गत घरात निर्माण होणारा कचरा, उरलेले अन्न, इलेक्ट्रॉनिक कचरा, बायो मेडिकल कचरा आदीचे व्यवस्थापन याबाबत विद्यार्थ्यांनी संशोधन केले. निवडक गटामधील विद्यार्थ्यांनी प्रमुख वक्त्यांसमोर संशोधनाचे सादरीकरण केले. 

विद्यार्थ्यांचा प्रकल्प पाहताना डॉ. अहलुवालिया यांनी, कचरा डंपिंग केल्या जाणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांच्या आरोग्याचे परीक्षण करण्याची गरज व्यक्त केली. ‘कचरा व्यवस्थापनामध्ये निर्माण होणारा कचरा, कचऱ्याचे वर्गीकरण किंवा विल्हेवाट याबाबत खात्रीलायक आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण हे अंदाजे निश्चित केले जाते. सर्व नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या कायद्यांबाबत जागरूकता आणण्याची गरज आहे.कचरा कशाला म्हणावे, कचऱ्यापासून होणारी खत निर्मिती याची माहिती दिली पाहिजे. नागरिकांना ओला व सुका कचरा एकत्र न करण्याबाबत उद्युक्त केले पाहिजे’, असेही डॉ. अहलुवालिया यांनी सांगितले.

‘इ-कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात नाही. तसेच, यासंबंधीच्या कायद्याचेही पालन होताना दिसत नाही. इ-कचरा ट्रकमधून गोळा करणे आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी जीपीएस यंत्रणेचा वापर करणे, त्याद्वारे काही प्रमाणात कचरा निर्मितीचा डेटा गोळा करणे शक्य होईल. महापालिकांना ही यंत्रणा वापरणे शक्य आहे. मुंबई महापालिका याचा वापर करीत असून त्यांना काही प्रमाणात डेटा प्राप्त झाला आहे’, असे प्रा. काळे यांनी सांगितले.

 ‘कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांची वृत्ती बदलण्याची गरज आहे. पाश्चात्य देशांमध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती आणि पूनर्वापरावर भर दिला जातो. त्याचे अनुकरण आपल्याकडे केले गेले पाहिजे’, असेही ते  म्हणाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link