मुंबई : ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’नंतर आता धमाल सिरीजमधला तिसरा ‘टोटल धमाल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी यांच्यासह अनिल कपूर, माधुरी दिक्षित आणि जॉनी लिव्हर अशी सगळी तगडी कलाकार मंडळी चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत. या ट्रेलरवरून, हा चित्रपटही पुन्हा धमाल करणार असे वाटत आहे.

चित्रपटातील काही कलाकार यापूर्वीच्या ‘धमाल’ आणि ‘डबल धमाल’मधून झळकले आहेत. विशेष बाब म्हणजे ‘टोटल धमाल’मध्ये माधुरी दिक्षित आणि अनिल कपूर दिसणार आहेत. माधुरी आणि अनिल कपूर या चित्रपटाच्या निमित्ताने तब्बल १७ वर्षांनंतर एकमेकांसोबत स्क्रीन शेअर करणार आहेत.
५० कोटी रुपयांचे गुप्तधन आणि ते मिळवण्यासाठी या सगळ्या धमाल गँगने केलेले अनेक कारनामे, याची छोटीशी झलक ट्रेलरमधून पाहायला मिळते. यावरून हा चित्रपटही विनोदाने परीपूर्ण असाच असेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. येत्या २२ फेब्रुवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
अभिनेता अजय देवगणची निर्मिती असलेला हा चित्रपट इंद्र कुमार यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा ‘सुरूर’फेम संगीतकार हिमेश रेशमीयाला ऐकायला मिळणार आहे. अभिनेता अजय देवगणने चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत, चित्रपटाची टॅगलाईन असलेले वाक्य ‘दि वाईल्डेस्ट अॅडव्हेंचर हॅज बिगन’, असे म्हटले आहे.