Next
'मला केवळ कथा सांगायच्या होत्या, त्या मी सांगत गेलो...'
BOI
Tuesday, April 10, 2018 | 12:46 PM
15 0 0
Share this story

‘झिवा स्टुडियो स्पेस’चे उद्घाटन करताना नागराज मंजुळे

पुणे : ‘मला कलाकार म्हणून जगण्याऐवजी माणूस म्हणून जगण्यात अधिक रस आहे. जात, धर्म याहीपलीकडे जाऊन आपण आधी माणूस आहोत’, असे मत चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. येथील ‘झिवा स्टुडियो स्पेस’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

झिवा स्टुडियो स्पेसविश्रांतवाडी येथे ‘झिवा स्टुडियो स्पेस’ ही कलाप्रेमींसाठी असलेली एक हक्काची जागा तयार करण्यात आली आहे. या स्टुडिओचे उद्घाटन नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले. विविध प्रदर्शने, प्रात्यक्षिके, सिनेमा प्रदर्शन, विविध प्रकारचे कार्यक्रम, कवी संमेलन, कथा वाचन, फोटो शूट इत्यादी गोष्टींसाठी हा स्टुडिओ उभारण्यात आला आहे. ‘ही एक कलाकारांच्या हक्काची जागा असून, इथे कलाकारांच्या विविध गुणांना वाव दिला जाईल’, असे झिवाचे सर्जनशील दिग्दर्शक (क्रिएटीव्ह डायरेक्टर) प्रज्ञेश मोळक यांनी सांगितले. प्रत्येकाने रवींद्रनाथ टागोर यांचा आदर्श समोर ठेऊन, कला क्षेत्रात सर्जनशील कार्य करून ते जगासमोर ठेवावे, असेही ते म्हणाले.

या प्रसंगी रोहितदादा पवार यांच्या हस्ते झिवाच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. ‘राजकारणापलीकडे जाऊन कलाकारांच्या कलागुणांना वाव देता आला, तर नक्कीच देऊ. आजकालचे तरुण कल्पक आहेत. ग्रामीण भागातील तरुणही यात मागे नाहीत. अशा तरुणांसाठी ‘झिवा’ हा नक्कीच एक चांगला प्लॅटफॉर्म ठरेल. हे करत असताना पारंपरिकता जपून आपण मॉर्डन गोष्टी आत्मसात करून त्यांची सांगड घातली पाहिजे’, असे मत पवार यांनी व्यक्त केले. या वेळी प्रविण गायकवाड यांनी ‘जेंबे’ हे आफ्रिकन वाद्य वाजवून उपस्थितांची मने जिंकली. ‘दुर्दैवाने भारतात कलेची जाण कमी लोकांना आहे. कला आणि व्यावहारिकता यातला फरक कलाकाराला समजला, तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. कलाकारांचे समाजाप्रती योगदान हे मोठेच असते’, असे गायकवाड म्हणाले. 

झिवाच्या उद्घाटनप्रसंगी सुमित देशमुख, ईशा कारभारी, नकुल सांगेकर, मेघाल खरात, रोहित पवार व पूर्वल खरात यांनी विविध कलागुण दर्शवणारा कार्यक्रम सादर केला. या वेळी प्रज्ञेश मोळक यांनी नागराज मंजुळे यांची प्रकट मुलाखत घेतली. ‘माझ्या आयुष्यात आजवर काहीच ठरवून घडलेले नाही, घडत नाही. मी पिस्तुल्या, फँड्री व सैराट हे चित्रपट केले. यात मला केवळ कथा सांगायच्या होत्या. त्या जमेल तशा मी सांगत गेलो. लोकांना त्या आवडल्या की नाही माहित नाही; पण मला कथा सांगायला आवडतात आणि त्या सिनेमाच्या माध्यमातून मी सांगतो, मांडतो. सध्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक चित्रपट करत आहे. आगामी काळात आणखी काही विषय डोक्यात आहेत’, असे नागराज मंजुळे यांनी सांगितले. ‘नव्या उमेदीचे तरुण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात, हे बघून आनंद होतो. झिवा स्टुडियो स्पेस हे असेच एक आहे जिथे वेगळे काहीतरी नक्कीच निर्माण होत राहील’, असेही मत मंजुळे यांनी मांडले. त्यांनी स्वतःच्या काही कविताही सदर केल्या. 

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहितदादा पवार, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व पुणे मनपाचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रज्ञेश मोळक यांनी केले, तर स्वप्नील चौधरी यांनी अतिशय साध्या परंतु वेगळ्या शैलीत सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link