Next
पर्यटनाशी जुळले नाते...
BOI
Friday, May 18 | 09:45 AM
15 0 0
Share this story

सरिता नेने यांचा क्लायंटशी बोलतानाचा जुना फोटोमूळच्या मुंबईच्या असलेल्या सरिता नेने गेली ३४ वर्षे कॅलिफोर्नियातील ओकलंड येथे स्थायिक आहेत. पर्यटन या विशेष आवडीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवरील नामवंत कंपन्यांमध्ये करिअर घडवून अलीकडेच त्या निवृत्त झाल्या आहेत. सर्व खंडांतली मिळून १४०हून अधिक ठिकाणं पालथी घालणाऱ्या ‘ग्लोबट्रॉटर’ सरिता नेनेंची मुलाखत ‘विश्वगामिनी सरिता’ या शीर्षकाने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर महिला दिनी प्रसिद्ध झाली होती. आता त्याच नावाचे त्यांचे पाक्षिक सदर सुरू करत आहोत. त्यांचे पर्यटन क्षेत्रातील अनुभव आणि त्यांनी पाहिलेल्या ठिकाणांची रोमांचक सफर या सदरातून त्या घडवणार आहेत.
...............
मला कधीकधी वाटतं, की मागच्या जन्मी मी बहुधा ‘जिप्सी’ असेन. फार दिवस प्रवास केला नाही, की मला अस्वस्थ होतं. वेगवेगळे देश, तिथली माणसं, संस्कृती, कला, खाद्यप्रकार हे अनुभवायला मला मनापासून आवडतं. प्रवासाला जाण्याआधी मी त्या ठिकाणाचा अभ्यास करते आणि प्रवासानंतर त्या ठिकाणचे फोटो व लेख लिहून सगळा प्रवास पुन्हा जगते.

मोरोक्कोचे नारंगी रंगाचे सहारा वाळवंट... सूर्यास्ताच्या वेळी.

माझी ही प्रवासाची आवड मला माझ्या व्यवसायात समावून घेता आली, हे माझं केवढं भाग्य. खरं म्हणजे इतिहास आणि भारतीय शिल्पकला या विषयात मला करिअर करायचं होतं; पण नियतीनं वेगळंच ठरवलं. मी मुंबईच्या सेट झेवियर्स कॉलेजमधून बीए आणि काही वर्षांनी ‘अँशन्ट इंडियन कल्चर’ (प्राचीन भारतीय संस्कृती) या विषयात एमए केलं होतं. तेव्हा मी अधूनमधून परदेशी पर्यटकांना म्युझियम आणि आपल्या पुरातन वास्तूक्षेत्रांची सफर घडवत असे. ही माझी पर्यटन क्षेत्राशी पहिली ओळख. अमेरिकेत आल्यावर मग त्याच क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं. 

मराक्केशमधल्या ‘बेन युसेफ मद्रासा’वरील सुबक कोरीव काम.

मी अमेरिकेत तीस वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली. तेव्हाच्या आणि आताच्या पर्यटन व्यवसायात खूप बदल झाला आहे. कामामुळे वेगवेगळ्या लोकांशी संबंध आला. त्याना नक्की काय हवंय, हे जाणून घ्यावं लागे. काहींना कुठेतरी झटपट सुट्टीसाठी जायचं असे, तर काही जण खूप अभ्यास करून प्रवासाला जात. मला कला व इतिहासाची आवड असल्याने अशा जिज्ञासू क्लायंटना माहिती द्यायला हुरूप येई. मी टूर आणि क्रूझ स्पेशालिस्ट विभागात होते. जगभरच्या बऱ्याच देशांचा आपसूक अभ्यास झाला. त्यामुळे क्लायंटना पसंत पडतील अशी प्रवासाची ठिकाणं सुचवता आली. इथे लोक सुट्टीची खूप आतुरतेने वाट बघतात, प्रवासासाठी पैसे बाजूला ठेवतात आणि ती सुट्टी पुरेपूर उपभोगतात. मलाही त्यांच्या आवडीला आणि पाकिटाला फिट्ट बसेल अशी ट्रिप आखायला उत्साह येत असे. क्लायंट आणि त्याच्या प्रवासाचं ठिकाण यांचा योग्य मेळ झाल्याचा आनंद मिळे.    

टहिटीचा निळाशार समुद्र.

काम करताना जाणवलं, की मी किती लोकांचं आयुष्य त्यांच्याबरोबर जगत होते. त्यांचे सुख-दुःखाचे क्षण अनुभवले. पूर्वी लोक ऑफिसमध्ये येऊन मला प्रत्यक्ष भेटत; पण आता संवाद जास्तकरून फोन, ई-मेलद्वारे होतो. मी ‘अमेरिकन एक्स्प्रेस’मध्ये काम करताना देशभरचे क्लायंट होते. लोकांना प्रत्यक्ष न भेटता त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवावा, यासाठी विशेष कला आत्मसात करावी लागली. नेहमीच्या क्लायंटना काय आवडेल ते माहीत असल्याने कुठे काही खास सवलतीच्या किमतीत दिसलं, तर ते त्यांना कळवत असे आणि ते ‘डिस्काउंट मिळाला’ या खुशीत प्रवासाचा आनंद घेत. लोक त्यांच्या कुटुंबाबद्दल व त्यांच्या आवडी-निवडींबद्दल बोलत. कुणी सहजच, तर कुणी काही कारणास्तव प्रवास करत. कुणाचा मधुचंद्र, तर आई-वडिलांना मुलांकडून भेट, कुणाचे ग्रॅज्युएशन, कुणाचा खास वाढदिवस, तर कुणाचा खूप आजारी असल्याने मनात असलेला शेवटचा प्रवास, बऱ्याच जणांचे कुटुंबांबरोबरचे प्रवास, मग पुढे त्यांच्या मुलांच्या कुटुंबाचे आणि नंतर नातवंडांचे प्रवास अशा तीन पिढ्यांशी तीस वर्षांचे माझे नाते जुळले. कधी एखादी खूप वर्षं माहिती असलेली व्यक्ती गेली, की आपल्या घरचंच कोणी गेल्यासारखं वाटे.

रामबाग पॅलेस, जयपूर.

या कामामुळे अनेक गमतीदार, तसेच मनाला चटका लावणारेही खूप अनुभव आले. एकदा माझ्या क्लायंटबाईचा फोन आला. तिला लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवसासाठी नवऱ्याला सरप्राइझ ट्रिप घडवायची होती. नवऱ्याला निळा समुद्र आणि ड्रिंक पीत वाळूवर लोळायला आवडे. ‘हवाई, मेक्सिको, कॅरीबियन, बर्म्युडा बघितलाय. काही तरी नवीन सांग’ म्हणाली. तिला टहिटीबद्दल सांगितलं. तिथे बरीच बेटं आहेत. तेव्हा त्यातले फरक, सुविधा वगैरे सांगितल्या आणि तिने टहिटीला जायचं ठरवलं. चार दिवसांनी तिच्या नवऱ्याचा फोन. तो म्हणाला, ‘बायकोला लग्नाच्या वाढदिवसाचं सरप्राइझ म्हणून मोरोक्कोला नेणार आहे. तिला खूप वर्षांपासून जायचं आहे. मस्त एक्झॉटिक ट्रिप प्लॅन कर.’ डोक्याला हात लावला. एकाच वेळी दोन वेगळ्या दिशा! दोघांना एकमेकांना सरप्राइझ द्यायचे आहे. आता हे कसे जमायचे? खूप विचार केला. शेवटी ठरवले, की बायकोचा फोन आधी आला होता, तर तिला नवऱ्याचे गुपित सांगावे. तो आपल्यासाठी प्लॅनिंग करतोय, म्हणून ती जाम खूश झाली. ती म्हणाली, ‘मी आश्चर्याचं मस्त नाटक करीन. आता मोरोक्कोच ठरव.’ फेझमधले गल्लीबोळ असलेले सुक, माराक्केशचा धुंद करणारा मेदिना, सहारा वाळवंटाचे सूर्यास्ताच्या वेळचे भडक नारंगी ड्यून्स, ‘कॅसाब्लांका’ सिनेमात दिसतो तसा रिक्स कॅफे व पियानोवरील गाणे, सुंदर जाळीचे कोरीव काम असलेल्या मशिदी, मातीच्या तजीनमध्ये शिजवलेल्या चविष्ट मोरोक्कन जेवणाची खासियत असलेली उपहारगृहं, बेली डान्स आणि मादक संगीताची रात्र, असं बरंच काही त्यांच्यासाठी प्लॅन केलं. खूप मजा केली त्यांनी. येणेकरून त्यांची ‘सरप्राइझ ट्रिप’ सुफळ संपूर्ण झाली.

उदयपूरच्या लेक पॅलेस हॉटेलचा लिली पूल. तिथे उभा असलेला माणूस पक्षांना हाकलवायचे काम करतो.

एकदा एक ब्रिटिश बाई भारताची ट्रिप बुक करायला आली. राजस्थान, दिल्ली, आग्रा या ठिकाणी तिला जायचं होतं. तिला सगळं ‘टूर प्लॅनिंग’ करून दिलं. मग म्हणाली, ‘माझे आजोबा पूर्वी ब्रिटिशांच्या राजवटीत राजस्थानच्या एका छोट्या गावात राहत असत. तिथे त्यांची ‘ग्रेव्ह’ (दफनस्थळ) आहे. ती मला बघायला आवडेल.’ त्या गावाचं नावसुद्धा मी ऐकलं नव्हतं. बरं, गावात ग्रेव्ह कुठे आहे वगैरेही तिला काहीच माहिती नव्हतं. मी माझ्या माहितीच्या एका भारतीय एजन्सीशी संपर्क केला. काही दिवसांनी त्यांचा ‘गुड न्यूज’ म्हणून निरोप आला. एका लहानशा गावात एका मोडकळीला आलेल्या चर्चमागे त्यांना ही ग्रेव्ह वाढलेल्या झुडपात दडलेली मिळाली. आम्ही ठरवलं, की माझ्या क्लायंटला आधी न सांगता एकदम तिथे गेल्यावर सरप्राइझ द्यायचं. बाई जेव्हा परत आली, तेव्हा मला फोन करून आनंदाश्रू ढाळत होती. इतर लोक भारतात जाऊन आले, की आग्र्याच्या ताजमहालाचं वर्णन करतात. परंतु तिला ती ‘ग्रेव्ह’ बघायला मिळाली, याची केवढी अपूर्वाई वाटली. तिचा तो ताजमहाल होता. मलाही खूप समाधान मिळालं.

जहाज मॉन्टे कार्लोच्या धक्क्याला.

फिलीसला मी २५ वर्षं तरी ओळखत होते. तिच्या नवऱ्याबरोबर अनेक ठिकाणचे प्रवास मी प्लॅन केले होते. पुढे तो गेला. नंतर तिच्यातर्फे तिच्या मुलांचे, नातवंडांचे प्रवास बुक केले. त्यामुळे तिच्या सगळ्या कुटुंबाशी ओळख झाली. एक दिवस फिलीसचा फोन आला. काही दिवस बरं वाटत नव्हतं, म्हणून डॉक्टरकडे गेली, तर कळलं, की तिला कॅन्सर असून, तिच्याकडे थोडेच महिने आहेत. मी ऐकून हादरलेच. नुकतंच कळल्याने ती खूप भावनाविवश झाली होती. माझ्याशी तिचं मन मोकळं करून खूप बोलली. पूर्वी नवऱ्याबरोबर केलेल्या प्रवासाच्या सुंदर आठवणी, तिची मुलं, नातवंडांच्या गमतीजमती, असं बरंच काही आम्ही दोघी हसतरडत बोललो. ती म्हणाली, ‘मी इतक्यात कुणाला माझ्या आजाराबद्दल सांगणार नाही. सगळ्या कुटुंबाला आधी क्रूझला नेऊन त्यांच्याबरोबर खूप आनंदात आठवडा घालवीन आणि नंतर सांगीन. आमच्यासाठी मेडीट्रेनियन क्रूझ बुक कर.’ एवढ्या अल्पावधीत इतक्या केबिन मिळणं कठीण होतं; पण ओळखीनं मिळवल्या. एका रात्री क्रुझलाइनला सांगून तिच्या कुटुंबासाठी मी कॉम्प्लिमेंटरी कॉकटेल पार्टी आयोजित केली. सगळ्यांना खूप मजा आली. तिलाही कुटुंबाबरोबर मौल्यवान वेळ मिळाला. फिलीस गेल्याचं कळल्यावर तिला व तिच्या कुटुंबियांना शेवटच्या कालावधीत एकमेकांबरोबर क्रुझवर आनंदाचे क्षण घालवता आले, याचं मला समाधान वाटतं. अजूनही मला फिलीसची आठवण येते आणि तिच्या कुटुंबीयांचा फोन आला, की आम्ही तिच्या आठवणी काढतो. 

मुंबईतील ताजमहाल हॉटेलची बाग.

डॉक्टर बिनॉय हा एक तरुण नामवंत सर्जन. प्रेमात मात्र अयशस्वी. एका अमेरिकन तरुणीच्या प्रेमात पडला. मला तिच्याशी बोलून जाणवलं, की बुद्धी, समंजसपणा यांत ती त्याच्यापेक्षा फिकी; पण प्रेम आंधळं असतं. लग्न झालं. मुलगी झाली. तो अमेरिकेत वाढला होता; पण त्याला आई-वडिलांना व बायकोला अगदी खास अशी भारतसफर घडवायची होती. मुंबईच्या ताज हॉटेलचे स्वीट, जयपूरचे रामबाग, उदयपूरचे लेक पॅलेस, जोधपूरचे उमेदभवन अशी बरीच उच्च दर्जाची हॉटेल्स, गाडी- ड्रायव्हर, साइटसीइग वगैरे मी मस्त प्लॅन केले. सगळे जण मजा करून परत आले. परंतु काही महिन्यांनी बायकोबरोबर पटेनासे झाले. घटस्फोट झाला. मग त्याच्या सिंगल ट्रिप्स बुक केल्या. काही काळानं त्याचं एका नर्सबरोबर प्रेम जमलं. तिला आधीच्या दोन मुली होत्या. मला पुन्हा वाटलं, बिनॉय अयोग्य व्यक्तीच्या प्रेमात पडतो आहे. मला म्हणाला, ‘तिला तिच्या मुलींना घेऊन प्रवासाला जायचंय; पण तिला परवडणार नाही. तिच्या प्रवासाचा अर्धा खर्च मी देईन. तिला कळू देऊ नकोस.’ अशा प्रकारे नर्सीणबाईच्या तिच्या मुलींबरोबर तीन-चार छान सुट्ट्या झाल्या. एकदा तिचा मला फोन, की ‘तुझ्याकडचे दर किती छान आहेत. बाहेरच्यापेक्षा खूप स्वस्त आहेत. माझा टोनी म्हणून नवा बॉयफ्रेंड आहे. आमच्यासाठी हवाईमधलं सुंदर रिसॉर्ट बुक कर.’ मी मनातून खूप रागावले. माझ्याच्यानं ते करवेना. काहीतरी कारण सांगून त्यातून बाहेर पडले. पुढे बिनॉयचे डोळे उघडले. रूप, शिक्षण, हुशारी सगळं असून, बिचारा अजून योग्य सहचारिणी शोधतोय.

अशा बऱ्याच कथांचा साठा आहे. हे सगळे क्लायंट कितीतरी वर्षं माहिती असून, मी त्यांना कधी प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. हे अमेरिकाभर कुठे कुठे राहतात; पण त्यांच्या आयुष्याची इतकी ओळख झाली होती, की ते जणू काही घरचेच आहेत, असं वाटायचं.   

(लेखिका हौशी आणि अभ्यासू पर्यटक असून, अमेरिकेतील पर्यटन क्षेत्रातील नामवंत कंपन्यांमधील दीर्घ अनुभवानंतर अलीकडेच निवृत्त झाल्या आहेत. या लेखातील फोटो त्यांनी स्वतः काढलेले आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘विश्वगामिनी सरिता’ या पाक्षिक सदरातील त्यांचे लेख https://goo.gl/TjepRF या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

जयपूरच्या रामबाग पॅलेस हॉटेलची खोली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yekkundi Sandeep About 239 Days ago
Sarita, your write-up of the subject is simply beautiful. Some incidences are really heart touching, especially about Philis. If possible please send me your book Paryatangamini, I would love to have in my library. Thanks. God bless you & your future ventures. My next trip to US will definitely try to see you.
0
0
Vishwas Deshpande About 239 Days ago
Really Wonderful ....
0
0
Vasant Baviskar About 239 Days ago
Great experience
0
0
sunil parchure About 240 Days ago
really great....
0
0
Shashi Apte About 240 Days ago
Congratulations Sarita .
0
0
Krantikumar R Kantak About 241 Days ago
Yes, you are a born Traveller. Your soothing and comforting personality is best asset for tourism business which you proved beyond doubt. Great is Taj of a lady who was able to visit grave in remote place. Sedondly relations you maintained on gebearation basis with families. Yes I know a Dr. Who did much but no returns deceit. But yeah that's may be what is called praktan. Aroused my interest in Morrocco, n last few days read a lot about. Style of writing is great briefly you said much. Vishwagamini Sarita us much awaited now. Congratulations and best of luck. Carry on Sarita Nene . ..
1
0
Sharad Borgikar About 241 Days ago
Nice articles
1
0
Madhav Vidwans About 242 Days ago
खुप छान
2
0

Select Language
Share Link