Next
‘भारतीय रागसंगीतामध्ये मनःशांती देण्याची ताकद’
प्रसन्न पेठे
Tuesday, August 07, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

‘त्यांना’ शास्त्रीय संगीताचा वारसा वडिलांकडूनच मिळाला; पण पुढे जाऊन गायिका बनण्याबरोबरच संगीतकार आणि संगीत नाटकाच्या लेखिका अशी ओळख निर्माण करणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे मधुवंती पेठे. त्यांनी स्वतः चार वर्षं जापनीज भाषा शिकून जपानमधील विद्यार्थ्यांना त्या भाषेत भारतीय शास्त्रीय संगीताचं शिक्षण त्या देत आहेत. ‘भारतीय रागसंगीतामध्ये मनःशांती देण्याची ताकद आहे,’ असं त्या म्हणतात. ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत...
.............
- शास्त्रीय संगीताचा वारसा कुठून मिळाला? ही आवड तुम्ही जोपासली आणि वाढवली कशी?
- माझे वडील म्हणजे पंडित ए. पी. नारायणगावकर हे स्वतः ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि भास्करबुवा बखले यांचे शिष्य! १९४२ ते १९९२ अशी जवळपास ५० वर्षे ते गायन करत होते. मुंबई आकाशवाणीवर गात होते. तसेच ‘एचएमव्ही’च्या रेकॉर्ड सेक्शनमध्ये संगीत दिग्दर्शक म्हणूनही काम करत होते. त्यामुळे गाणं माझ्या जन्मापासून घरातच होतं. तशात तिसरी-चौथीपासूनच आम्ही दर शनिवारी गाण्याचे कार्यक्रम, मोठमोठ्या कलाकारांच्या मैफली ऐकायला जात असू. तो माहौल, रसिकांची भरभरून दाद आणि त्यामुळे गायकाने आणखी खुलून गाणं हे मनावर कोरलं गेलं होतं. आपणही शास्त्रीय संगीत शिकून अशाच मैफली कराव्यात ही ऊर्मी तेव्हापासूनच होती मनात. त्यामुळे वडिलांकडून शिकणं होत गेलं. त्यामुळे विविध राग, बंदिशी त्यांच्याकडूनच शिकत गेले. पुढे नाट्यसंगीत शिकताना मला गोविंदराव पटवर्धनांचं मार्गदर्शन लाभलं.
 
- नाट्यसंगीताकडे आणि संगीत नाटकं करण्याकडे ओढा कसा निर्माण झाला?
- माझ्यासमोर पहिल्यापासून जयमालाबाई शिलेदार यांचा आदर्श होता. त्यांची खूप नाटकं पाहिली होती. संगीत नाटक हा खूप आनंददायी प्रकार आहे हे जाणवत होतं. ‘पुलं’च्या भगिनी मीराताई दाभोळकर या आमच्या चेंबूरच्याच. त्यांनी मला संगीत नाटकात काम करण्याची संधी दिली. पुढे वांद्र्याच्या शारदा संगीत विद्यालयात संगीत नाटकांच्या प्रवेशाची स्पर्धा होती. त्यात मी स्वयंवर नाटकाचा प्रवेश दोन नाट्यगीतांसह सादर केला आणि त्यात मला पहिलं बक्षीस मिळालं. त्यामुळे पुढे मला दोन संगीत नाटकांत काम मिळालं. ‘मानापमान’मध्ये भामिनी आणि ‘सौभद्र’मध्ये मी सुभद्रा साकारली. अशा जाणीव प्रगल्भ होत असतानाच बोरिवलीत ‘संगीत ओंकार’ या एका संगीत नाटकाला संगीत देण्याची संधी मिळाली. त्यासाठी मला राज्य नाट्यस्पर्धेत संगीत दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस मिळालं. यातूनच मी पुढे ‘सूर माझे सोबती’ हे संगीत नाटक लिहिलं. त्याची निर्मिती, संगीत दिग्दर्शनही मी केलं होतं आणि त्यात भूमिकाही केली. 
 
- वडिलांमुळे तुमच्या घरी मोठमोठे गायक येत असतील. अशा मोठ्या गायकांच्या काय खास आठवणी आहेत?
- हो. एक तर वडिलांमुळे पंडित रविशंकर, अलारखाँ, थिरकवाँसाहेब, सितारादेवी यांसारख्या जगप्रसिद्ध मंडळींचे कार्यक्रम समोर बसून जवळून अनुभवायला मिळाले. वडिलांच्या खास आपुलकीच्या मैत्रीतले असणारे वसंतराव देशपांडे, अभिषेकीबुवा, राम मराठे, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, मालिनीताई राजूरकर यांचा अगदी घरात सहवास मिळाला. त्यामुळे संगीतविषयक समृद्धी आली. ही सगळी मंडळी इतकी मोठी कलावंत असूनही किती साधी राहतात, नम्र असतात याचं मला भयंकर अप्रूप असायचं.
 
- तुम्हाला शास्त्रीय, सुगम संगीत यांपैकी कुठल्या प्रकारचं गायला जास्त आवडतं? 
- शास्त्रीय संगीतात छोटा ख्याल, बडा ख्याल, तराणे गात असते. तसंच सुगम संगीतात भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत हे प्रकार येतात. मला कोणताही प्रकार गाताना शब्दप्रधान गायकी विशेष आवडते. कारण सुरांचा परिणाम तर होतोच, पण सर्वसामान्य रसिकांपर्यंत राग चांगला पोहोचण्यासाठी बंदिशीचे शब्द चांगले असायला हवेत. 
 
- तुम्ही स्वतः मराठीत बंदिशी रचल्या आहेत. त्याविषयी सांगा.
- मी म्हटलं तसं, शब्दांना फार महत्त्व असतं. आणि म्हणून श्रोत्यांपर्यंत रागाचा रसपरिपोष व्यवस्थित होण्यासाठी मी स्वतः काही मराठी बंदिशी रचल्या आहेत. मुख्य म्हणजे मी जेव्हा संगीत विद्यालय सुरू केलं, तेव्हा लहान मुलांना जड वाटतील अशा हिंदी शब्दांऐवजी मराठी, सोपे, अर्थपूर्ण शब्द असावेत, म्हणजे त्यांना गाणं शिकणं सोपं जाईल, या भावनेतून मी मराठी बंदिशी रचल्या. 
 
- तुम्ही संगीत नाटक लिहिलं, बंदिशी रचल्या. संगीतविषयक जवळपास आठ पुस्तकं तुम्ही लिहिली आहेत. या लेखन प्रवासाची सुरुवात कधी झाली? 
- साधारणपणे मी पंचविशीत असताना ‘संगीत सौभद्र’ केलं होतं. तेव्हा मुंबईतल्या लोकप्रभा मासिकाने मला ‘मराठी नाट्यसंगीतामध्ये किंवा संगीत नाटकांमध्ये नाट्य आणि संगीत यांचा परस्परसंबंध कसा असावा’ याबाबत लेख मागितला होता. संगीत आणि नाट्याचा समतोल कसा असावा या संदर्भातलं ते माझं पहिलं लेखन. पुढे मी डीटीपी शिकून घेतलं आणि माझी सर्व पुस्तकं मीच डीटीपी संस्करण करून लिहिली. 
 
- एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे तुम्ही जपानी भाषा शिकून त्या भाषेत पुस्तक लिहिताय. त्याबद्दल आम्हाला सांगा.
- एखादी परदेशी भाषा शिकावी असं मला नेहमी वाटायचं. मी इंटरनेटवरून अमेरिका, स्कॉटलंड, टोकियोतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवत असते. मी स्वतः चार वर्षं शास्त्रशुद्ध पद्धतीने लिपीसकट जपानी भाषा शिकले आहे. माझ्याकडे शिकणाऱ्या जपानी विद्यार्थ्यांच्या बोलण्यातून मला जाणवलं, की तिथे अजून हिंदुस्तानी संगीताचा प्रभाव नाहीये. त्यांच्या शाळेत, कॉयरमध्ये गाताना वेस्टर्न पद्धतीचाच प्रभाव त्यांच्यावर आहे. तेव्हा मी ठरवलं, की त्यांना त्यांच्या भाषेतून हिंदुस्तानी संगीताची ओळख करून द्यायची आणि आपल्या संगीताचा प्रसार करायचा. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत इंडो-जापनीज असोसिएशनच्या वार्षिकोत्सवात मी दोन वर्षं, भारतीय संगीतावर आधारित एकांकिका जपानी भाषेत लिहून सादर केल्या. त्या जापनीज कौन्सुलेटच्या अधिकाऱ्यांना, जापनीजच्या शिक्षकांना आवडल्या. त्यातून स्फूर्ती घेऊन मी आता भारतीय संगीताची ओळख करून देणारं पुस्तक आणि डेमॉन्स्ट्रेशन सीडी तयार करते आहे.
 
- विशेष लक्षात राहिलेल्या एखाद्या मैफलीबद्दल सांगा.
- मी तशी लहान असताना म्हणजे १८-२० वर्षांची असेन, तेव्हाची ही आठवण. मालिनी राजूरकर जेव्हा जेव्हा मुंबईत कार्यक्रमाला यायच्या, तेव्हा त्यांच्याबरोबर तानपुरा साथ करायला मी असायचे. त्या इतक्या महान गायिका असूनही अत्यंत साध्या, निगर्वी आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. एकदा दादरला भवानीशंकर रोडजवळ गणेशोत्सवाचा कार्यक्रम होता. त्या वेळी त्या थेट हैदराबादहून येऊन गायला बसल्या होत्या. त्यांनी भूप रागातला बडा ख्याल सुरू केला. वसंतराव आचरेकर तबला साथीला होते. सुरुवातीची काही मिनिटं त्यांचा आवाज लागेना. अचानक त्यांनी हाताने खूण करून मला गायला सांगितलं. मी सुरुवात करून त्यांच्याबरोबर स्वराला स्वर दिला. आणि गंमत म्हणजे दोन-तीन आवर्तनं अशी झाली, की सुरू त्या करायच्या आणि मी पूर्ण करायचे. मला त्या वयात भलतंच छान वाटलं होतं. त्यांनी माझं कौतुकही केलं होतं. ही माझ्यासाठी अविस्मरणीय आठवण आहे. 
 
- तुम्ही स्वतंत्रपणे कार्यक्रम करायला कधीपासून सुरुवात केलीत?
- १९७१ साली गंधर्व महाविद्यालयाच्या मध्यमा परीक्षेत मी भारतात पहिली आल्यामुळे काही संस्थांनी मला संधी दिली. त्यातून मी माझा स्वतंत्रपणे कार्यक्रम करायला सुरुवात केली. आज ४८ वर्षं हा गायनाचा सिलसिला चालू आहे. आणि १९८२ सालापासून (गेल्या ३६ वर्षांपासून) मी बोरिवलीमध्ये माझ्या सुमधुरा संगीत विद्यालयातर्फे संगीत शिक्षणाचं काम करत आहे. वेगवेगळ्या वयोगटातले विद्यार्थी येऊन शिकून गेले आहेत. मनापासून शिकायची इच्छा असलेल्यांना मी आवर्जून शिकवते. प्रत्येक विद्यार्थ्याचा आवाज, आवड आणि क्षमता बघून मी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग देते. माझ्याकडून शिकून गेलेल्या हर्षा प्रभू, प्राजक्ता निबंधे-फणसाळकर, अनिता पुंडेकर, राजश्री आगाशे-कुलकर्णी, रक्षा शेट्टी, सना, ओंकार पाटील अशा काही विद्यार्थिनींची/ विद्यार्थ्यांची मी आवर्जून नावं घेईन, जे संगीत क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. 
 
- सकारात्मकतेसाठी संगीताचा उपयोग कसा होतो?
- आपल्या भारतीय रागसंगीतामध्ये आपल्याला मनःशांती देण्याची ताकद आहे. या संगीतामुळे आपल्याला समाधान मिळणं, प्रसन्नता मिळणं हे सहज होतं. लहान मुलांना अभ्यासाच्या आणि मोठ्या मंडळींना ऑफिसच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी रागसंगीत फार सुंदर काम करतं. माझ्या शालेय विद्यार्थ्यांना मी नेहमी सल्ला देते, की गाण्याचा रियाज परीक्षेच्या काळातही चालू ठेवलात, तर तुमचे पाच टक्के मार्क्स नक्की वाढतील. अशी संगीताची किमया आहे.
......

(मधुवंती पेठे यांनी लहान मुलांसाठी स्वतः रचलेली एक मराठी बंदिश, गोरख कल्याण रागातली एक बंदिश आणि शांता शेळके यांच्या कवितेला चाल लावून त्यांनी केलेले सादरीकरण पाहा सोबतच्या व्हिडिओत...) 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search