पुणे : नव्या आणि जुन्या पिढीतील कलाकारांचा कलाविष्कार एकाच व्यासपीठावर अनुभविण्याची संधी पुणेकर रसिकांना मिळणार आहे. निमित्त आहे ‘सा’ व ‘नी’ प्रस्तुत ‘धरोहर’ या कार्यक्रमाचे. यामध्ये उस्ताद जाकीर हुसेन संतूरवादक राहुल शर्मा आणि बासरीवादक राकेश चौरासिया यांना साथ करणार आहेत. येत्या रविवारी, दोन डिसेंबर, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे हा कार्यक्रम होणार आहे.
'या कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पं. शिवकुमार शर्मा यांचे सुपुत्र व शिष्य राहुल शर्मा यांचे संतूर वादन होणार असून, उत्तरार्धात पं. हरिप्रसाद चौरासिया यांचे पुतणे व शिष्य राकेश चौरासिया यांचे बासरी वादन होईल. या दोन्ही तरुण कलाकारांना तबल्याची संगत उस्ताद जाकीर हुसेन करणार आहेत. जुनी पिढी व नवीन पिढी एकत्रित येत असल्याने या कार्यक्रमाला ‘धरोहर’ असे नाव देण्यात आले आहे', अशी माहिती ‘सा’ व ‘नी’ संस्थेचे सुरेंद्र मोहिते यांनी दिली. विशेष म्हणजे उस्तादजींचा अशा पद्धतीचा कार्यक्रम पुण्यात प्रथमच होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
याबरोबरच पुण्यातील ज्येष्ठ तबलावादक पं. विनायकराव थोरात यांना या वर्षी महाराष्ट्र शासनाचा आण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचा उस्तादजींच्या हस्ते सत्कारदेखील करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या सशुल्क प्रवेशिका २७ नोव्हेंबरपासून बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि टिळक स्मारक मंदिर येथे सकाळी १० ते १२.३० व सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध होऊ शकणार आहेत. मात्र कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे रविवारी, दोन डिसेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे संपूर्ण दिवसभर प्रवेशिका उपलब्ध असतील, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.