Next
..अखेर दर्शनाची वेळ आली..
BOI
Saturday, May 19, 2018 | 04:49 PM
15 0 0
Share this article:


अमरनाथ यात्रा संपूर्ण झाली. पण जन्मलेला प्रत्येक जण हा पांथस्थ असतो. त्यामुळे यात्रा कधीही संपत नाही. ती अविरत सुरुच असते. हिमालय असाच बोलवत राहील. त्याच्यावरच भिस्त टाकून मी जात राहीन. आजही बर्फाच्या नदीवरून जाणारी मानवी रांग आठवते. हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवते... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा सत्ताविसावा आणि शेवटचा भाग.. 
...............................
घोड्यांच्या टापांचा आवाज माझ्या कानी पडत होता. तो आवाज खूप छान वाटत होता. मी अक्षरशः ग्लानीत होतो. आजूबाजूला रौद्र, बलाढ्य, विशाल आणि अत्यंत सुंदर निसर्ग होता; पण मी नीट रसग्रहण करण्यास असमर्थ होतो. सुंदर पर्वतरांगांमधून मी जात होतो. काही तुरळक लोक पायी जात होते. तेवढ्या वाईट अवस्थेतही मनात विचार आला, की पुन्हा कधी या अमरनाथच्या रस्त्यांवरून जाता येईल..? त्यामुळे फोटो काढण्याचा कुळाचार नक्कीच करायला हवा.! आठवण हवीच या रोमांचक सहलीची.. यात्रेची..!

मी अश्वारूढ होतो. अंगावर रेनकोट नावाचं प्लास्टिकचं चिलखत होतं. त्याच्या आत लोकरीचं एक आवरण. त्यावर चामडी काळा अंगरखा होता. एका हातात घोड्यावर ‘डाव डाव’ करताना हातात लगाम, पाय ताणलेले.. रस्ता अत्यंत खराब.. दगड चिखलातून जाणारा. त्यामुळे नियंत्रण जाऊन कडेलोट  होऊ नये, ही काळजी. पण फोटोंचा कुळाचार तो कुळाचार.! तो पूर्ण करायलाच हवा. त्यामुळे घोड्यावर बसल्या बसल्याच तशा अवस्थेतही मी खूप प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवत काही फोटो काढले. फोटोंचा कुळाचार पूर्ण केला. सोशल मीडिया या कुलदैवताचा कोप टाळला.

बघता बघता पावसाचे थेंब खाली येऊ लागले. १३ हजार  फुटांवर असल्याने तो पाऊस जरा जास्तच जवळ वाटत होता. तो जोरात अंगावर आल्यासारखा वाटत होता. शंकररावांच्या कृपेने तो लवकरच थांबला. मात्र त्या थोड्याच पावसाने रस्ता आणखी वाईट झाला. आणखी जास्त चिखल झाला होता. बर्फ वितळून अधून-मधून येणारे पाण्याचे ओढे.. दगड… यातून घोडा चालत होता. कधी तीव्र उतार, तर कधी उंच चढ.. मी अर्धवट ग्लानीत लगाम पक्का धरून चढ-उतारानुसार मागे-पुढे झुकत होतो. कित्येकदा तोल जाऊन खाली बर्फाच्या चिखलात पडू, असं वाटत होतं. रस्ताच तसा होता. खूप बिकट आणि चिखलाचा.., पण माझा घोडा खूप हुशार होता. नुकतंच चालायला शिकलेलं लहान मूल हळुवारपणे, जागा बघून जसं पाय टाकतं, तसा माझा घोडा बिकट जागी, दगडांमधून धोक्याच्या जागी प्रथम काही क्षण थांबायचा, मग योग्य जागेवर पाय टाकून तो कठीण टप्पा पार करायचा. मला त्याची फार गंमत वाटे. 

इतर घोडे मात्र अगदीच बेदरकारपणे, विचार न करता चालायचे. त्यामुळे कित्येक वेळा ते घोडे अडकायचे. एक-दोनदा यात्रेकरू खाली पडलेही. बघता बघता एक मैदान लागलं. त्यावर समांतरपणे पाण्याचे काही प्रवाह वाहत होते. जवळच मोठं तंबूस्थान दिसलं. त्याला लागून हेलिपॅड होतं. हेलिकॉप्टर्स सतत ये-जा करत होते. मागे अप्रतिम हिमशिखरं आकाशाच्या पोटात शिरताना दिसत होती. मला समजलं, की ते ठिकाण ‘पंचतरणी’ आहे. दुसऱ्या रात्रीचा मुक्काम इथे होतो; पण मी तर सरळ गुफेपर्यंत जाणार होतो. पंचतरणी मागे पडलं. न थांबता आम्ही पूढे जात राहिलो. थोड्याच वेळात एक अप्रतिम मोठा लंगर लागला. हा एक प्रसिद्ध लंगर आहे. पंचपोत्री लंगर. अमरनाथ यात्रेतील सगळ्यात मोठा आणि मेजवानी असलेला लंगर. त्याच्या सुरुवातीलाच एक छोटं मंदिर केलेलं होतं. तेथील बोर्ड मला विशेष आवडला. त्यावर लिहिलं होतं, ‘यहा पैसे मत डालीये..’ भारतात आजवर मी एकाही देवळासमोर असा बोर्ड लावलेला पाहिला नव्हता.

माझी छाती प्रचंड दुखत होती. पंचपोत्री लंगरला मी घोडेवाल्याला थांबायला सांगितलं, कारण तिथे वैद्यकीय सुविधा उपलब्ध होती. मी तिथं तपासणी केली. रक्तदाब तपासला. त्यांनी सांगितलं लवकर खाली जा. उंचावर असल्याने हा त्रास होतोय. काही तासात खाली पोहोचल्यावर त्रास कमी होईल. तिथून लंगरमध्ये गेलो. तिथे निरनिराळे लाडू.. मिठाई.. खाण्याचे पदार्थ.. खजुराचे, तिळाचे लाडू, रबडी, रसगुल्ला, गुलाबजाम, मोरावळा, पनीरचे पदार्थ, इतकंच काय, तर मश्रूम फ्रायसुद्धा उपलब्ध होतं. असं वाटत होतं, तेरा हजार फुटांवरील स्टार हॉटेलवर आलोय. फरक हाच की हे सगळं मोफत होतं.. तेही अत्यंत आर्जवतेने यात्रेकरूंना बोलावून ते देत होते. शिवाय एका कोपऱ्यात अनेक प्रकारचे चॉकलेट्स, आयुर्वेदिक चूर्णही मोफत मिळत होती. दूध मिळत होतं. 

अमरनाथ यात्रेत कलियुगातील कर्ण दिसतात. मी मात्र काहीही खाल्लं नाही. मी त्या अवस्थेतच नव्हतो. पोट खराब झालेलं होतं. सतत विचारगृहाच्या.. शौचालयाच्या वाऱ्या चाललेल्या. संपूर्णपणे गळून गेलो होतो. शिवाय मळमळ, डोकेदुखी, श्वसन करताना त्रास, छातीत वेदना.. माझ्या अहंकाराच्या, माजाच्या चिंधड्या झाल्या होत्या. चोवीस तासांपासून मी काहीही खाल्लं नव्हतं. पंचपोत्री लंगरमध्ये असतानाच पोटाने पुन्हा मोर्चा काढला. पुन्हा शौचालयाकडे धाव घेतली. माझी अवस्था बिकट झाली होती. शरीरातील जलांश कमी झाला होता. बाहेर येऊन एका खुर्चीत मटकन बसलो; पण तिकडे घोडेवाला वाट बघत होता. आधीच उशीर झाला होता. आता आस होती अमरनाथाच्या दर्शनाची! मी पुन्हा अश्वारूढ झालो. गुफेकडे कूच करता झालो. पुन्हा ग्लानी चढू लागली. काही वेळ असाच मार्ग सुरू राहिला. कुठे अगदी चिंचोळ्या मार्गाने, कुठे खिंडीतून.. थोडया वेळाने एक समांतर रस्ता दिसू लागला. त्या मार्गावरही खूप लोक दिसत होते. मला आठवलं हा बालताल मार्ग. म्हणजेच आता संगम पॉईंट आला तर..! इथे दोन मार्ग एक होतात. अंगात थोडा उत्साह संचारला. याचाच अर्थ आता अमरनाथ गुहा जवळ आली होती. मी भानावर येऊन बसलो. मी मोबाईलमध्ये ‘दिल्ली सिक्स’ चित्रपटातील माझं आवडतं गाणं लावलं. ‘अर्जिया सारी मैं चेहरे पे लिखके लाया हूं.. तुमसे क्या मांगु मैं, तुम खुद ही समझ जाओ.. मौला मेरे.. मौला मेरे..’

घोडा समोर जाऊ लागला. एक वळण आलं आणि मला ते दृश्य दिसलं. दूरवर एक गुफा दिसत होती. आजवर फोटोत, टीव्हीवर, नेटवर बघितलेली. तीच अमरनाथ गुहा. माझ्या अंगावर रोमांच दाटले. मी घोड्यावरील दोन्ही हात सोडून गुहेला नमस्कार केला. आजवर बघितलेलं एक स्वप्न पूर्ण होणार होतं. गुहा जवळ जवळ येत होती. आवाज, गर्दी वाढू लागली. गुहेपासून अडीच किमी दूर घोडे थांबत होते. मी माझ्या प्रिय घोड्यावरून उतरलो. त्या काही तासांतच माझा त्याच्याशी एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. घोडेवाल्याला त्याचे पैसे दिले. घोड्याला नमस्कार केला आणि आपली काठी घेऊन पुढे निघालो. आजूबाजूला खूप दुकानं, गर्दी होती. समोर अवाढव्य ग्लेशियर म्हणजेच बर्फनदी पसरली होती. एका दुकानात थांबून तिथे काठी, बॅग, मोबाईल ठेवले. कारण पूढे हे सगळं नेण्यास मनाई होती. 

मंजिल आता जवळ होती. गुफा अगदी स्पष्ट दिसत होती; पण अजूनही दोन किलोमीटर अंतर बाकी होतं. ग्लेशियरवरून जायचं होतं. मी शंकराचं स्मरण करून एक-एक पाऊल टाकू लागलो. लोक बर्फावरून घसरून पडत होते. खाली नदी होती. मी खूप उत्तेजित झालो होतो. ग्लेशियर संपली. गुफेच्या जवळ पोहचलो. आता तिथून पायऱ्या सुरू होत होत्या. जोडे काढून ठेवले. पायाला गार स्पर्श झाला. मी पहिल्या पायरीला नमस्कार केला. कठड्याला पकडून वर जाऊ लागलो. शेवटच्या पायरीवर पोहचलो. मी गुफेच्या अगदी जवळ होतो. खूप आनंदाचा क्षण.. अंगात उत्साह रोमांच दाटला होता. 

तेवढ्यात काही लोकांचा आवाज ऐकू आला. ‘बाजू हटो रास्ता दो..!’ काही सैनिक एका वयस्कर स्त्रीला आडवं उचलून खाली नेत होते. तिचा गुहेत मृत्यू झाला होता. तिचा देह निष्प्राण होता. अमरनाथाचे दर्शन घेऊन कदाचित तिने प्राण सोडले होते. मी आत गेलो. उंच, प्रशस्त, रुंद गुफा.. आणि मला तो दिसला. समोर दुधाळ, भरीव बर्फाचं शिवलिंग होतं. अमरनाथाच्या पिंडीचं दर्शन झालं. याचसाठी केला होता अट्टाहास.! सद्गुरूंचं, आई-बाबांचं स्मरण केलं. शंकर महाराज, दत्त गुरू, स्वामी समर्थांचं स्मरण करून त्यांना धन्यवाद म्हटलं. त्यांच्या कृपेने मी इथपर्यंत आलो होतो. प्रार्थना केली. समोर चिन्मय पिंड होती. म्हटलं तर सगुण म्हटलं तर निर्गुण! कारण भरीव पिंड आहे म्हणून सगुण. पण ती कोणीही तयार केली नाही म्हणून निर्गुण. मनापासून प्रार्थना केली. आवडत्या व्यक्तींसाठीही. मी ‘चिन्मयानंदात’ मग्न होतो. 

तेव्हा अचानक लक्षात आलं, की गुहेत चार कबुतरं आहेत. शुभ्र आणि तपकिरी. त्यांचं दर्शन शुभ असतं. मी वर बघितलं. इतर लोकंही बघत होते. तेवढयात एका खोबणीत एक शुभ्र कबुतर दिसलं. त्याने पंख फडफडवले. काही क्षणात दुसरं कबुतर दिसलं. तिसरं काळपट कबुतरही दिसलं. लोकांना दाखवलं. सगळे लोक जल्लोषात शंभूचा गजर करू लागले. आनंदाचा सोहळा होता तो. यात्रा परिपूर्ण झाली होती. 

बाहेर सतत सूचना सुरू होती की गुहेच्या परिसरात प्राणवायूची कमतरता असल्याने लवकरात लवकर यात्रेकरूंनी खाली परतीच्या मार्गाला लागावं. मी परत निघालो. माझ्या जवळील काठी, पाण्याची बाटली हे सगळंच मला शंकराचं रूप वाटत होतं. तिथल्या प्रत्येक गोष्टीशी ऋणानुबंध निर्माण झाला होता. मी त्याच दिवशी बालतालला पोहचलो. दुसऱ्या दिवशी श्रीनगरला आणि त्याच्या पुढच्या दिवशी वैष्णो देवी कटराला येऊन पोहचलो. त्याच दिवशी बातमी समजली, की अमरनाथ दर्शन करून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर आतंकवादी हल्ला झाला. काही यात्रेकरू त्यात मृत्युमुखी पडले. मी निःशब्द झालो. मन सुन्न झालं. खूप वाईट वाटलं. ईश्वराच्या कृपेनेच ही यात्रा पूर्ण केली होती. 

अमरनाथ यात्रा संपूर्ण झाली. पण जन्मलेला प्रत्येक जण हा पांथस्थ असतो. त्यामुळे यात्रा कधीही संपत नाही. ती अविरत सुरुच असते. हिमालय असाच बोलवत राहील. त्याच्यावरच भिस्त टाकून मी जात राहीन. आजही बर्फाच्या नदीवरून जाणारी मानवी रांग आठवते. हरिवंशराय बच्चन यांची कविता आठवते...
‘तू न थकेगा कभी,
तू न रुकेगा कभी,
तू न मुडेगा कभी
कर शपथ.. कर शपथ.. कर शपथ..
अग्निपथ.. अग्निपथ.. अग्निपथ..
यह महान दृश्य है.. चल रहा मनुष्य है..
अश्रू श्वेत से लथपथ लथपथ लथपथ..
अग्नीपथ.. अग्निपथ..
हिमपथ.. हिमपथ.. हिमपथ…..

समाप्त
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगमधील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search