Next
पिसवली शाळेत दिवाळी सुट्टीत छंदवर्ग
दत्तात्रय पाटील
Monday, November 12, 2018 | 01:19 PM
15 0 0
Share this storyपिसवली (कल्याण) :
दिवाळीच्या सुट्टीत छंदवर्गाचे आयोजन करण्याचा उपक्रम पिसवली (ता. कल्याण, जि. ठाणे) येथील शाळेत याही वर्षी आयोजित करण्यात आला होता. गेली सहा वर्षे या शाळेत हा उपक्रम राबवला जात असून, विद्यार्थ्यांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या छंदवर्गात विविध नामवंतांनी विद्यार्थ्यांना विविध कलांमधील अनुभवाचे बोल सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते सावित्रीमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या छंदवर्गाचे उद्घाटन करण्यात आले. हा उपक्रम तीन दिवसांचा होता. मुंबई महापालिकेत कार्यरत असलेल्या सायली घरत व सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी राऊत यांनी मुलांना वारली पेंटिंग, पॉट पेंटिंग आणि कागदाची विविध प्रकारची फुले बनविण्याचे प्रशिक्षण दिले. नाट्य दिग्दर्शक विशाल राऊत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘आपण रोज जगतो ते म्हणजेच नाटक. जीवनात आपल्याला पावलापावलांवर वेगवेगळा अभिनय रोजच करावा लागतो. मग त्यासाठी आपण नवरसांचा संमिश्रपणे वापर करत असतो. नाटक आपल्याला उत्साहाने जगायला शिकवते. येथे मान, सन्मान, प्रतिष्ठा आणि पैसाही आहे; पण त्यासाठी आपल्या अंगी प्रामाणिकपणा व प्रचंड मेहनत करण्याची इच्छा पाहिजे.’ स्मिता धबडे व वैशाली पेठे यांनी टाकाऊ वस्तूंमधून टिकाऊ वस्तू, वॉल पीस बनवण्याचे प्रात्यक्षिक मुलांकडून करून घेतले. स्वतः वस्तू तयार केल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर झळकत होता. टीव्ही सीरियलमधील प्रसिद्ध कलाकार श्रीरंग दाते यांनी व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. आपण उभे कसे राहावे इथपासून निसर्गाचे निरीक्षण करून शिकत राहिले पाहिजे; वाचन, लेखन, स्वच्छ कपडे, अभ्यासाबरोबरच एखादा छंद जोपासणे; आत्मविश्वास हवा; व्यक्तिमत्त्व म्हणजे नुसते शिक्षण नसून सर्वांगीण अपेक्षित आहे, अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले. उन्हाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी, त्यासाठी भरत गोडांबे यांनी मुलांना सेल्फ वॉटरिंग पॉट बनवायला शिकवले. या छंदवर्गाची संकल्पना अजय पाटील व महेंद्र आढांगळे यांची असून, गेली सहा वर्षे सातत्याने दिवाळी सुट्टीत हे छंदवर्ग आयोजित केले जातात. त्या निमित्ताने मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांना पाहण्याचा, ऐकण्याचा, त्यांच्याकडून काही शिकण्याचा आनंद मिळतो. ‘शाळेतील मुलांबरोबरही दिवाळी सणाचे काही क्षण एकत्र घालवता यावेत, हाही या छंदवर्गाचा हेतू आहे,’ असे अजय पाटील यांनी सांगितले. 

अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सूत्रसंचालन अजय पाटील यांनी, तर आभारप्रदर्शन महेंद्र आढांगळे यांनी केले. मुलांसाठी जेवणाची व्यवस्था कमला भोईर, वनिता भोईर यांनी केली होती.

(छंदवर्गाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...) 

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mrs.Bamble Chhaya. About 98 Days ago
Innovative and lifetime useful for students.
0
0
नारायण मंगलारम About 98 Days ago
पिसावली शाळा आणि अजय दादा आपला खूपच स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम .....👌👌👌 अभिनंदन .....💐💐💐
1
0
अजय पाटील About 98 Days ago
खूप छान सर. मनापासून आभार.
1
0

Select Language
Share Link