Next
तुमच्या शांत स्वभावाचा मुले फायदा घेत नाहीत ना?
BOI
Saturday, April 07, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


वयाने लहान असलो, तरी आपण आरडाओरडा केला, हट्ट केला, रडारड केली, की आई-बाबा आपलं ऐकतात, आपले हट्ट पुरवतात, हे कौस्तुभला बरोबर समजलं होतं आणि म्हणूनच त्याच्या वर्तनसमस्यांत वाढ होत गेली. वडिलांच्या सततच्या शांत व मवाळ वागण्याचा तो फायदा घेत होता... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या वर्तनसमस्येबद्दल...
.....................
शारदा, त्यांचा मुलगा कौस्तुभबद्दल बोलण्यासाठी आली होती. सोबत कौस्तुभचे बाबाही होते. भेटण्यासाठी आल्यावर त्यांनी आधी स्वतःची ओळख करून दिली. कौस्तुभची आई औषधांच्या एका खासगी कंपनीत काम करते, तर त्याचे वडील उच्चशिक्षित असून, एका कंपनीत बऱ्याच मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. कौस्तुभ हा त्यांचा एकुलता एक मुलगा. स्वतःची आणखी जुजबी ओळख करून दिल्यानंतर त्यांनी कौस्तुभबद्दल बोलायला सुरवात केली. 

कौस्तुभ बालवर्गात शिकणारा चार वर्षांचा मुलगा. त्याच्या आई-वडिलांच्या सांगण्यानुसार, तसेच शाळेतील त्याच्या शिक्षिकांनी दिलेल्या माहितीनुसार, तो अतिशय हुशार मुलगा. चुणचुणीत, उत्साही, हुशार म्हणून त्याचं नेहमीच कौतुक व्हायचं आणि आताही होतंच; पण गेल्या सात-आठ महिन्यांपासून मात्र त्याचं वागणं अगदी बदलून गेलं होतं. 


‘सध्या तो खूप त्रास देतो. सतत भांडणं, मारामाऱ्या, उलट उत्तरं देणं, वस्तूंची फेकाफेक करणं, जरा मनाविरुद्ध काही घडलं, की रडून गोंधळ घालणं, अशा पद्धतीने तो सध्या वागत होता. त्याला मारलं, रागावलं तरी काही फरक पडत नाही. बाबा, आजी-आजोबा सगळ्यांना उलट उत्तर देतो. वर्गातून आणि तो जातो त्या पाळणाघारातल्या ताईंकडूनही आजकाल त्याच्या सारख्या तक्रारी येत आहेत. समजावणं, रागावणं, मारणं कशा कशाचाच त्याचावर परिणाम होत नाही,’ असं सगळं बोलून आई थांबली. वडिलांनीही या साऱ्या तक्रारींना दुजोरा दिला. 

शाळेतल्या बाईंच्या सांगण्यावरूनच आज ते दोघं समुपदेशनासाठी आले होते. मुलाबद्दल बोलताना आईच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं आणि बोलण्यात काहीसा वैतागही जाणवत होता. या साऱ्या चर्चेत कौस्तुभचे बाबा मात्र शांत होते. त्यांच्याशी बोलून झाल्यावर आणि अधिक सविस्तर माहिती घेतल्यावर त्यांना पुढच्या सत्रात कौस्तुभला घेऊन येण्यास सांगितलं.

ठरल्याप्रमाणे ते कौस्तुभला घेऊन आले. त्याची ओळख करून दिली. कौस्तुभ खरंच अतिशय उत्साही होता. सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं देत होता. आईशी बोलताना मात्र त्याचा नूर वेगळाच होता. सतत त्याची चिडचिड, आरडओरडा चालू होता. हट्टीपणा चालू होता. आईने सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकायला तो तयार नव्हता. एकूण सत्रातील चर्चा आणि निरीक्षणांवरून पुढील काही सत्रांत त्याचं केवळ निरीक्षण करायचं ठरलं. या सत्रांना आई-वडिलांनी चांगलं सहकार्य केलं. या सत्रांदरम्यानच्या निरीक्षणातूनच त्याची समस्या लक्षात आली. या साऱ्या निरीक्षणांतून असं लक्षात आलं, की कौस्तुभच्या वडिलांचा स्वभाव अतिशय शांत होता. मुलाशी बोलतानाही ते अतिशय शांतपणे बोलायचे. एखादी गोष्ट सांगताना, ती अतिशय शांतपणे, हळू आवाजात सांगायचे. तो चुकीचं वागला तरी शक्यतो त्याला न रागवता समजावण्याचा प्रयत्न करायचे. त्याने अगदीच नाही ऐकलं तर एखादा फटका द्यायचे. याउलट आईने एखादा फटका दिला, तर तो आईवरच चिडायचा. त्याला मारल्याची अपराधी भावना लगेच आईच्या वागण्यात, आवाजात जाणवायची; पण याचा कौस्तुभवर काहीच परिणाम होत नव्हता. आजी-आजोबांच्या बाबतीतही हेच. त्या दोघांना तो मारायचा, उलट उत्तर द्यायचा.  

त्याच्या घेतलेल्या सगळ्या सत्रांमधील निरीक्षणे आणि मिळालेली माहिती या साऱ्यावरून असं लक्षात आलं, की कौस्तुभच्या वडिलांच्या सततच्या शांत व मवाळ वागण्याचा तो फायदा घेत होता. वयाने लहान असलो, तरी आपण आरडाओरडा केला, हट्ट केला, रडारड केली, की आई-बाबा आपलं ऐकतात, आपले हट्ट पुरवतात, हे त्याला बरोबर समजलं होतं आणि म्हणूनच त्याच्या या वर्तनसमस्यांत वाढ होत गेली. त्याची ही समस्या आणि कारण लक्षात आल्यावर त्याच्या आई-वडिलांना याची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याच्याशी वागताना आपल्या वर्तनात कोणकोणते बदल करणे आवश्यक आहे, पालकांच्या वागण्यातला ठामपणा आणि सातत्य याचा त्याच्या वर्तनसमस्या सोडवण्यास कसा उपयोग होईल यावर सविस्तर मार्गदर्शन केलं. सांगितल्याप्रमाणे त्यांनी आवश्यक ते बदल केले आणि कौस्तुभच्या समस्या हळूहळू सुटत गेल्या.

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

- मानसी तांबे-चांदोरीकर 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link