Next
आशियातील सर्वाधिक वजनदार महिलेने कमी केले २१४ किलो वजन
प्रेस रिलीज
Saturday, May 11, 2019 | 03:09 PM
15 0 0
Share this article:

बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्याआधीच्या अमिता राजानीमुंबई : आशियातील सर्वांत वजनदार महिला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यातील वसई येथील ४२ वर्षांच्या अमिता राजानी यांनी २१४ किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे आता त्यांना सर्वसामान्य आयुष्य जगता येणे शक्य झाले आहे. अमिता यांच्यावर चार वर्षांपूर्वी बेरिअॅट्रिक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता त्यांचे वजन ८६ किलो असून, यासाठी त्यांना बेरिअॅट्रिक सर्जन आणि लॅपरो ओबेसो सेंटरचे संस्थापक, तसेच लिलावती रिसर्च सेंटर व हिंदुजा रुग्णालयाचे डॉ. शशांक शहा यांचे मार्गदर्शन मिळाले. 

अमिता यांचे वजन वयाच्या सहाव्या वर्षापासून वाढण्यास सुरुवात झाली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांचे वजन १२६ किलो होते. आपल्या दैनंदिन क्रियासुद्धा त्या व्यवस्थितपणे करू शकत नव्हत्या. त्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानावर परिणाम झाला. भारत आणि यूकेमधील आघाडीच्या एंडोक्रिनोलॉस्ट्सनासुद्धा त्यांच्या स्थूलपणाचे नक्की कारण सापडत नव्हते. त्यांचे वजन ३०० किलोपर्यंत पोहोचले तेव्हा परिस्थिती अजूनच गंभीर झाली आणि त्यांना घराबाहेर पडणेही शक्य नव्हते. सगळ्या दैनंदिन क्रियांसाठी त्यांना मदतीची गरज लागत असे. त्याचप्रमाणे श्वसनाच्या समस्यांमुळे ऑक्सिजनचा सपोर्टही लागत असे. शस्त्रक्रियेच्या आधी आठ वर्षे त्या खाटेला खिळून होत्या.

शस्त्रक्रिया केल्यानंतरच्या अमितालॅपरो ओबेसो सेंटरमधील डॉ. शहा यांची त्यांनी भेट घेतली आणि अमिता यांना लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. त्यांना अतिस्थूलपणाच्या विकाराबरोबरच त्यांच्या कोलेस्टरॉलची पातळी असंतुलित होती, मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड झाला होता, टाइप टू प्रकारचा मधुमेह आणि श्वसनाच्याही समस्या होत्या. शस्त्रक्रियेपूर्वी दोन महिन्यांची पूर्वतयारी करण्यात आली होती. त्यासाठी एक विशेष रुग्णवाहिका सज्ज करण्यात आली होती. त्या रुग्णवाहिकेचे दरवाजे काढून आत एक साडेसहा फुटांचा सोफा बसविण्यात आला होता, जेणेकरून त्यांना हॉस्पिटलमध्ये आणता येईल. हॉस्पिटलमध्ये त्यांना विशिष्ट आहार घेण्यास सांगितला होता आणि त्यांच्यासाठी खास बेड, कपडे, वजन करण्याचे मशीन ठेवण्यात आले होते. 

अमिता यांची शस्त्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये झाली. २०१५मध्ये त्यांच्यावर पहिल्या टप्प्यातील लॅपरोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रेक्टोनॉमी ही चयापचय शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांची परिस्थिती सुधारू लागली आणि त्यांचे बरेचसे वजन कमी झाले आणि त्या स्वतःहून चालू लागल्या. २०१७ साली अमिता यांच्यावर दुसरी गॅस्ट्रिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी त्यांचे वजन १४० किलो होते. हे दोन चयापचय उपचार आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांचे वजन कमी झाले.

या विषयी माहिती देताना डॉ. शहा म्हणाले, ‘कर्करोग किंवा एचआयव्हीएवढाच स्थूलपणा हा गंभीर आजार आहे आणि सगळ्या आजारांचे हे मूळ असते आणि पुरुषांच्या तुलनेने महिलांना हा आजार अधिक प्रमाणात होतो. कारण महिलांमध्ये प्रसूती किंवा रजोनिवृत्तीसारखी शारीरिक कारणे असतात आणि पुरुषांमध्ये अॅबडॉमिनल ओबेसिटी म्हणजेच पोटाकडील भागाचा स्थूलपणा असतो. पोटाच्या भागात स्थूलपणा वाढल्यामुळे कोलेस्टरॉल, मधुमेह आणि हृदयविकारांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे महिलांमध्ये प्रमाणापेक्षा अधिक वजन असणे हे भावनिकदृष्ट्या अधिक त्रासदायक असते. मधुमेह, मूत्रपिंडाचा विकार, रक्तदाब किंवा अतिरिक्त कोलेस्टरॉलमुळे जीव गमवावा लागलेल्या व्यक्तींमध्ये स्थूलपणा हे मूळ कारण होते.’

अमिता राजानी यांच्यासमवेत डॉ. शशांक शहा‘भारतातील प्रत्येक पाचव्या व्यक्तीचे वजन प्रमाणापेक्षा थोडे अधिक असते. पण गेल्या दशकापासून भारतातील प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीचे वजन प्रमाणापेक्षा अधिक झाले आहे. पर्यावरणीय घटकांमुळे चयापचयावर परिणाम झाला आहे आणि स्थूलपणा हा जणू काही साथीचा रोग झाला आहे. जीवनशैलीमुळे वजन वाढण्याच्या प्रवृत्तीला चालना मिळते. वातावरणीय घटक या आजाराला कारणीभूत ठरतात आणि अंतःस्त्रावी यंत्रणेवर परिणाम झाल्याने हा आजार बळावतो. अमिता यांच्यासारख्या काही प्रकरणांमध्ये हा असंतुलितपणा गंभीर स्वरुप धारण करतो; पण आज, शस्त्रक्रियेच्या चार वर्षांनंतर त्या मधुमेह आणि रक्तदाबासारख्या आरोग्याच्या समस्यांपासून दूर आहेत. त्यांचे मूत्रपिंड सामान्यपणे कार्य करत आहे आणि त्यांना आहाराचे पथ्य पाळण्यास सांगितले आहे. आता आम्ही अमिताची केस लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्याच्या प्रयत्नांत आहोत,’ असेही डॉ. शहा यांनी सांगितले.  

अमिताची आई ममता राजानी म्हणाल्या, ‘अमिताची काळजी घेताना मी खूप समस्यांना सामोरे गेले. माझ्या मुलीला अशा अवघडलेल्या परिस्थितीत बघून मला किती यातना होत होत्या हे मी शब्दांत सांगू शकत नाही. अमिता अजिबात हलू शकत नव्हती. त्यामुळे तिचे कपडे बदलणे, तिला खाऊ घालण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत मला करावी लागे. तिच्या शरीरातून बाहेर पडणारे स्त्रावसुद्धा टॉवेल आणि बेडशीटमध्ये शोषून घेतले जात असे. त्याचप्रमाणे तिला हालचाल करण्यासाठीही मदत करावी लागत असे. अखेर आमची प्रार्थना ऐकली आणि अमिताचा बांधा आता व्यवस्थित झाला आहे. या संपूर्ण लढाईत डॉ. शहा आमच्यासोबत होते आणि हे सगळे त्यांचेच श्रेय आहे.’

अमिता म्हणाल्या, ‘आधी मी खाटेला खिळलेली होते आणि आता मी स्वतंत्र आहे आणि मुक्तपणे हालचाल करू शकते. मी माझ्या आवडीचे कपडे घालू शकते आणि मला हवे तसे आयुष्य जगू शकते. माझ्या आनंदाला पारावार राहिलेला नाही आणि माझे अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी मला मदत केल्याबद्दल मी डॉ. शहा यांची मनापासून आभारी आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search