Next
‘दिल्लीत असलो, तरी लक्ष विद्यापीठाकडे असेल’
‘यूजीसी’चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, October 20 | 12:47 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अनेकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच माझे व्यक्तिमत्व घडत गेले, त्यामुळे विद्यापीठ अनुदाय आयोगाच्या (यूजीसी) उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल होत असलेला सत्कार आपल्या सर्वांचा आहे. यापुढे मी दिल्लीत असलो, तरी माझे लक्ष आपल्या विद्यापीठाकडे निश्चितपणे असेल,’ असे प्रतिपादन ‘यूजीसी’चे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिले.

विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी असलेले डॉ. पटवर्धन यांचा ‘यूजीसी’च्या उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाली. त्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे कुलगुरू प्रो. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या पत्नी भाग्यदा पटवर्धन यांचा डॉ. करमळकर यांच्या पत्नी डॉ. रोहिणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते.

डॉ. पटवर्धन म्हणाले, ‘माझे लहानपण विद्यापीठात गेले. तेव्हापासून माझे विद्यापीठाशी नाते आहे. पुढच्या काळात येथे भेटलेले गुरूजन, मार्गदर्शक, वरिष्ठ यांचे मार्गदर्शन, तसेच विद्यार्थी, सेवक मंडळी यांच्या सहकार्यामुळेच माझे व्यक्तिमत्व घडत गेले. मी नसताना माझे सहकारी विभागाची धुरा सांभाळू शकले आणि विद्यार्थी उत्तम कामगिरी करू शकले. त्यामुळेच मी हे करू शकलो. त्याचीच परिणिती या नेमणुकीत झाली आहे. त्यामुळे दिल्लीत असलो, तरी माझे लक्ष आपल्या विद्यापीठाकडे असेल.’

‘यूजीसी’च्या अंतर्गत देशातील ४० हजार महाविद्यालये येतात. त्यांची गुणवत्ता सुधारली, तरच ‘यूजीसी’तर्फे चांगले काम झाले असे ठरेल. त्याद्वारे देशाला काहीतरी चांगले देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची क्षमता मोठी आहे. विद्यापीठाला डॉ. करमळकर यांचे सक्षम नेतृत्व लाभले आहे. जागतिक मानांकनात वरच्या स्थानावर येण्याची क्षमता असलेल्या देशातील मोजक्या विद्यापीठांमध्ये त्याचा समावेश होतो. त्यामुळे जगातील उत्तम विद्यापीठांमध्ये आपल्या विद्यापीठाचाही समावेश असेल,’ असे डॉ. पटवर्धन यांनी नमूद केले.

या प्रसंगी बोलताना डॉ. करमळकर म्हणाले, ‘पटवर्धन यांचा विद्यापीठात, तसेच इतर क्षेत्रात मोठा प्रभाव आहे. त्यांनी ‘एथिक्स इन पल्बिकेशन’ या माध्यमातून सुरू केलेले काम आता देशभर पोहोचले आहे. सध्या देशाच्या पातळीवर शैक्षणिक धोरणे सुधारण्याचे काम सुरू आहे. अशा वेळी पटवर्धन दिल्लीत असणे महत्त्वाचे आहे. या प्रकियेत त्यांचे ज्ञान व अनुभवाचा मोठा फायदा होऊ शकेल.’

प्रास्ताविक डॉ. पवार यांनी केले. डॉ. उमराणी यांनी आभार मानले. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link