Next
नारायण हरी आपटे, ई. बी. व्हाइट...
BOI
Tuesday, July 11, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this story

‘दिनमणीसदरात आज नारायण हरी आपटे, ई. बी. व्हाइट  आणि डॉ. शंकरराव खरात  ...
.......................
नारायण हरी आपटे

मुंबई इलाख्याअंतर्गत येणाऱ्या सांगलीमध्ये ११ जुलै १८८९ रोजी जन्मलेल्या नारायण हरी आपटे यांनी, वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेण्यासाठी घर सोडलं होतं आणि ते सावरकरांच्या ‘अभिनव भारत’मध्ये सामील झाले होते. समाजसुधारणेत महत्त्वाचे योगदान देताना, त्यांनी वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम केलं.

ऐन विशी-पंचविशीत त्यांनी पुस्तक प्रकाशन व्यवसायात उडी घेतली. श्रीनिवास मुद्रणालय नावाने छापखानाही सुरू केला. वयाच्या पन्नाशीत (१९३९ साली) त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. त्या वेळी भारतभर फिरताना हिंदी, इंग्लिशबरोबरच बंगाली, गुजराथी आणि नेपाळी भाषाही ते शिकले होते. पुढे १९४२च्या ‘चले जाव’ चळवळीतही ते सहभागी झाले होते.
 
त्यांना दादासाहेब फाळके यांचा काही काळ सहवास लाभला होता. बाबूराव पेंटर यांनी त्यांना मराठी चित्रपटसृष्टीची ओळख करून दिली आणि नंतर नारायण हरी यांनी मराठी सिनेसृष्टीत बऱ्याच सिनेमांसाठी कथा, पटकथा लिहिल्या. त्यांच्याच कादंबरीवरचा ‘कुंकू’ हा सिनेमा प्रचंड गाजला होता. सामाजिक, अद्भुत, रम्य, ऐतिहासिक असे अनेक विषय त्यांनी लेखनातून हाताळले. आत्मसन्मान, सामाजिक बांधिलकी, देशप्रेम, कुटुंबसंस्था यांवर त्यांनी अत्यंत आग्रहीपणे आणि ठामपणे आपली मतं मांडली.

हरी नारायण आपटे यांच्या ‘करमणूक’ मासिकात नारायण हरी यांची पहिली लघुकथा प्रसिद्ध झाली होती. ‘अजिंक्य तारा’, ‘लांछित’, ‘चंद्रमा’, ‘संधिकाल’, ‘कपटकाल’, ‘वंदावे की निंदावे?’ , ‘पहाटेपूर्वीचा काळोख’,‘कथा- कौमुदी’, ‘सुखाचा मूलमंत्र’ अशी त्यांची पुस्तके गाजली.

१४ नोव्हेंबर १९७१ रोजी सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव येथे त्यांचा मृत्यू झाला.
......................

ई. बी. व्हाइट

११ जुलै १८९९ रोजी अमेरिकेतील व्हरनॉन इथे जन्मलेल्या ‘एल्विन ब्रूक्स’ला आपलं हे नाव कधीच आवडलं नाही आणि म्हणून त्याने कॉर्नेल युनिव्हर्सिटीत त्याला मिळालेल्या ‘अँडी’ याच टोपणनावाचा कायम आग्रह धरला. ‘न्यूयॉर्कर’सारख्या प्रतिष्ठित मासिकाचा तो अखेरपर्यंत संपादक राहिला होता.बालगोपाळांच्यात तुफान लोकप्रिय झालेलं छोट्या गोड उंदराच्या धमाल कथा सांगणारं ‘स्ट्युअर्ट लिटल’ हे त्याचं अत्यंत गाजलेलं पुस्तक आणि त्यावर १९९९ साली उत्तम सिनेमाही बनला होता. ‘मेन’ इथल्या त्याच्या धान्याच्या कोठारात एके दिवशी मोठ्ठं जाळं विणणारा कोळी पाहताना त्याला एक कल्पना सुचली आणि त्यातूनच त्याचं ‘शार्लट्स वेब’ हे एका शार्लट नावाच्या कोळ्याची आणि विल्बर डुकराची दोस्ती वर्णन करणारं मजेदार पुस्तक जन्माला आलं. आणि त्यावरही सुंदर सिनेमा बनवला गेला.

१९७८ साली त्याला ‘स्पेशल पुलित्झर अॅवार्ड’ देऊन त्याच्या साहित्यिक सेवेचा गौरव करण्यात आला.

एक ऑक्टोबर १९८५ रोजी ब्रुकलीन येथे त्याचा मृत्यू झाला.
.................

डॉ. शंकरराव खरात

११ जुलै १९२१ रोजी आटपाडीमध्ये मागासवर्गीयांत जन्मून महारांचं, तळागाळातल्या लोकांचं जीवन जवळून अनुभवलेल्या शंकर खरात यांनी, कठीण परिस्थितीशी झगडून शिक्षण घेतलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ‘अस्पृश्यांचा मुक्तिसंग्राम,’ ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धर्मांतर,’ ‘डॉ. आंबेडकरांची पत्रे’ अशी आणि इतर अनेक वैचारिक पुस्तकं लिहिली.

त्यांच्या ‘तराळ अंतराळ’ या आत्मचरित्राला सर्व थरांतल्या मराठी वाचक, समीक्षक, विचारवंत यांची पसंती मिळाली. त्यांनी राजकारण, समाजकारणसुद्धा जवळून अनुभवलं होतं. ते वेश्या वस्तीतही राहिले होते. वेश्यांचं, तमासगिरांचं जग त्यांनी जवळून पाहिलं आणि त्या सर्व अनुभवांवर पुस्तकं लिहिली.

ते मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलगुरू होते. तसंच १९८४ साली जळगाव येथे भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ‘बारा बलुतेदार,’ ‘तडीपार’, ‘गावचा टिनोपाल गुरुजी’, ‘दलितांचे शिक्षण’, ‘हातभट्टी’, ‘सांगावा’ ही त्यांची इतर गाजलेली पुस्तकं आहेत.

नऊ एप्रिल २००१ रोजी त्यांचं निधन झालं.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link