Next
जब प्यार किसी से होता है...
BOI
Sunday, December 03 | 06:45 AM
15 0 0
Share this story

हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो देव आनंद याचा तीन डिसेंबर रोजी स्मृतिदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’मध्ये आज घेऊ या त्याच्यावर चित्रित झालेल्या ‘जब प्यार किसी से होता है...’ या गीताचा आस्वाद...
........
देव आनंद! हिंदी चित्रपटसृष्टीचा चॉकलेट हिरो! एक सळसळते तारुण्य! एक अफाट उत्साह! पुरुषही एवढे सुंदर दिसू शकतात, हे वास्तव म्हणजे देव आनंद! पुराणकथांमधील ‘मदन’ कसा दिसत होता, ते आम्हाला माहीत नाही; पण तरीही वाटते, की तो देव आनंदसारखाच दिसत असणार! एव्हरग्रीन हिरो देव आनंद! ‘माना तू सारे हसीनों से हसीं है, अपनी सूरत बुरी तो नही है’ असे ‘ड्रीमगर्ल’ला सांगण्याचा अधिकार देवला जरूर होता आणि त्याची ‘सूरत बुरी’ नव्हती हे सांगणाऱ्या नायिकांच्या चार चार पिढ्या मौजूद होत्या! देव-देव आणि देव... त्याच्याबद्दल, त्याच्या दिसण्याबद्दल, त्याच्या तारुण्याबद्दल, उत्साहाबद्दल, सतत कामात राहण्याच्या वृत्तीबद्दल सांगावे तेवढे कमीच!

असा हा देव या पृथ्वीतलावरून अंतर्धान पावला ती तारीख होती तीन डिसेंबर २०११! आजही ३ डिसेंबर आहे. त्या तीन डिसेंबरला शनिवार होता आणि आज रविवार आहे! त्या शनिवारी अशी सकाळी सकाळीच बातमी आली – त्याच्या निधनाची. सारा दिवस त्यामुळे नासून गेला! 
देव कोण होता? चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता! चित्रपटांतून मिळवलेला पैसा चित्रपटांसाठीच वापरणारा खरा सिनेमा प्रेमी! देव कोण होता? जॅकी श्रॉफ, झीनत अमान आणि अनेक कलावंतांना पडद्यावर झळकण्याची संधी देणारा तो निर्माता होता.

देव कोण होता, हा प्रश्न गुरुदत्तला विचारला असता, तर त्याने सांगितले असते, की देव हा दिलेल्या शब्दाला जागणारा सच्चा मित्र होता. तो, रहमान, गुरुदत्त हे सर्व ‘प्रभात’ संस्थेत नवशिके होते. आपल्यापैकी जो पुढे जाईल, त्याने दुसऱ्याला साह्य करायचे, असे त्यांनी ठरवले होते. सर्वांत आधी देव आनंदने चित्रपटनिर्मितीला हात घातला आणि त्याने मित्राला दिलेला शब्द पाळला. गुरुदत्तला दिग्दर्शक म्हणून बोलावले. पुढे गुरुदत्त त्याच्या कलेमुळे मोठा बनला; पण सुरुवात देव आनंदने करून दिली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘त्रिमूर्ती’च्या साम्राज्याला ज्यांच्यामुळे सुरुवात झाली, त्यामध्ये दिलीपकुमार, राजकपूर यांच्याबरोबर तिसरा नायक देव आनंद होता. देव आनंदबद्दल खूप काही लिहून आले आहे. त्यामध्ये त्याचे गुणगान करणारे लेख आहेत आणि त्याचे दोष दाखवणारेही आहेत. दोष कोणाच्यात नसतात? पण मग तेच डोक्यात घेऊन बसण्यात काय अर्थ आहे?

हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘टॉप’चा नायक बनूनही देव आनंदचे पाय जमिनीवर होते. प्राप्तिकर चुकवणाऱ्यांच्या यादीत कधी त्याचे नाव आले नाही, की त्याने कधी ‘नशेमध्ये’ गैरवर्तन केल्याचे आढळले नाही. मुळात त्याला दारूची नशा नव्हती, तर सतत काम करण्याची नशा असायची. त्यामुळेच वयाची आठ दशके ओलांडली, तरी तो उत्साहाने नवीन चित्रपटांच्या निर्मितीत गुंतलेला असायचा. आपले चाहते, त्यांचे प्रेम तो ओळखून होता. त्यामुळेच त्याच्या फोनवर तो स्वतःच असायचा. सेक्रेटरीने फोन घेतला, असे त्याच्याबाबत घडले नव्हते. सामन्यातला सामान्य माणूस त्याला चाहता म्हणून भेटायला गेला, तरी देव त्यांना भेटत असे. 

देव आनंद कोण होता, या प्रश्नाचे आणखी एक उत्तर असेही सांगता येईल, की तो एकमेव कलावंत असा होता, ज्याने पडद्यावर गायलेली गाणी तो जीवनात जगला होता. देववर चित्रित झालेली काही गाणी, त्यांचा अर्थ, आशय आणि देवच्या जीवनातील घटना यांचे अवलोकन केले, तर ते आपल्याला दिसून येते. उदाहरणादाखल ही दोन-तीन गाणी बघा!

देव आनंदचे सुरैयावर प्रेम होते; पण दोघांचे लग्न होऊ शकले नाही. या संदर्भात ‘विद्या’ चित्रपटात देवच्या तोंडी मुकेशने गायलेले एक गीत होते - ‘बहे ना कभी नयन से नीर चाहे दिल में चुभी हो पीर बावरे यही प्रीत की रीत’ या गीताच्या आशयाप्रमाणे देव जगला! सुरैया मिळाली नाही याचे दुःख त्याने मनातच ठेवले. ‘जो मिल गया उसीको मुकद्दर समझ लिया, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...’ हे देवचे पडद्यावर साकारलेले ‘हम दोनों’ चित्रपटातील गीत! हे गीत तर देवचे जीवनगीतच होते. साहीरने जणू ते त्याच्यासाठीच ते लिहिले होते. याप्रमाणेच ‘नौ दो ग्यारह’मधील ‘जो भी प्यार से मिला, हम है राही प्यार के’ हे गीत, तसेच देवच्याच ‘लूटमार’ चित्रपटातील ‘हँस तू हरदम खुशियाँ हो या गम’ ही गीते बघता येतील. सतत काम करणारा देव ‘हरे राम हरे कृष्ण’ चित्रपटातील गीतातून सांगतो ‘राम का नाम बदनाम ना करो.’

देवची ही ओळख आज त्याच्या स्मृतिदिनी जाणून घेतल्यावर त्या हसऱ्या-खेळत्या, छान दिसणाऱ्या देव आनंदच्या एका छान प्रेमगीताकडे आपण वळू या! तशी तर देवने पडद्यावर साकार केलेली अनेक ‘सुनहरी गीते’ आहेत. त्यापैकी कोणतेही एक निवडले, तरी हे का नको, असा प्रश्न दुसऱ्या गीताबद्दल विचारला जाईलच! पण तरीही हे एकच गाणे बघा - शंकर जयकिशनचे मस्त संगीत, मोहम्मद रफीचा गोड आवाज, हसरत जयपुरीचे शब्द आणि पडद्यावर छान दिसणारा हसरा, आनंदी देव आनंद! तरुणींनी ज्याच्या प्रेमात आपणहून पडावे, तो देव आपल्या प्रेयसीला विनवणी करत आहे, तिला तो म्हणतो -

अरे ओ दिल का पर्दा खोल दो 
जब प्यार किसी से होता है, 
तो दर्द सा दिल में होता है
तुम एक हसीन हो लाखों में 
भला पा के तुम्हे कोई खोता है

हे प्रिये, तू काही बोल ना! तुझ्या हृदयीचे भाव मला सांग ना! (अगं) एखाद्यावर प्रेम जडले, तर हृदयात, मनात एक दुःख होते, हुरहुर लागते (आणि असे दुःख सहन करून) तुझ्यासारख्या लाखातील सुंदरीला प्राप्त केल्यवर कोणी तुला पुन्हा गमावेल काय? (नव्हे तुझ्या सान्निध्यातच राहील.)

नजरोंसे जितने तीर चले,
चलने दो जिगरपर झेलेंगे
इन प्यार की उजली राहोंपर 
हम जान की बाजी खेलेंगे 
इन दो नयनों के सागर में 
कोई दिल की नैया डुबोता है

(हे प्रिये, मी अशी प्रेमाची कबुली दिली; पण हे तुला माहीत आहे का, की) तुझ्या नयनबाणांनी मला कसे घायाळ केले आहे ते? तुझ्या सुंदर नेत्रांच्या आधारे तुझे बघणे मला घायाळ करते; पण तुझ्या नेत्रबाणांचे वार मी माझ्या हृदयावर झेलीन. (इतकेच नव्हे तर) या प्रीतीच्या उजळलेल्या वाटांवर मी माझ्या प्राणांची बाजी लावेन! (अगं) तुझ्या या नेत्ररूपी समुद्रात कोणी (म्हणजे मी ) स्वतःच्या हृदयाची नाव बुडवून टाकत आहे. (याची तुला जाणीव नाही का?) 

प्रेयसीजवळ स्वतःची ही अवस्था व्यक्त केल्यावर तिच्या चेहऱ्याचे भाव पाहून तो काय ते ओळखतो आणि तिला म्हणतो, 

तुम भी तो इस आग में जलते हो
चेहरे से बयाँ हो जाता है 
हर बात पे आहें भरते हो, 
हर बात पे दिल थर्राता है
जब दिल पे छुरीयाँ चलती हैं, 
तब चैन से कोई सोता है

तूही या प्रेमअग्नीत जळत आहेस. (माझ्या प्रेमात पडली आहेस) हे तुझा चेहरा सांगत आहे. (शिवाय) प्रत्येक गोष्टीवर तू उसासे टाकत आहेस, तुझे हृदय धडधडत आहे (त्याची धडधड वाढली आहे. ही सारी माझ्या प्रेमात पडण्याची लक्षणे आहेत आणि मग अशा वेळी तूच सांग, की) ही प्रेमरूपी सुरी जेव्हा हृदयावर फिरते, तेव्हा कोणी शांतपणे झोपू शकते का?

अगदी छोटेच असले, तरी हे एक मधुर गीत आहे! नायकाची आनंदी मनस्थिती, नायिकेची संभ्रमावस्था, रेल्वे इंजिनाचा आवाज या सगळ्या अनुषंगाने दिलेले संगीत आणि रफीच्या खुला खट्याळ स्वर! आणि महत्त्वाचे म्हणजे पडद्यावरचा गोड देव आनंद! 

कोण म्हणते तो गेला? देव इथेच आहे. चराचरात भरून राहिला आहे ना तो?

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.)

(दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link