Next
‘विज्ञानशोधिके’तर्फे ‘इनोव्हेशन हब’चे
प्रेस रिलीज
Monday, February 26, 2018 | 06:18 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे उभारण्यात आलेल्या आणि सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या पुण्यातील पहिल्या इनोव्हेशन हबचे उद्घाटन ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते २८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे.

‘या प्रसंगी दासॉल्ट सिस्टीमच्या संशोधन व विकास विभागाचे मुख्याध्याकारी सुदर्शन मोगासले व नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्सचे (एनसीएसएम) संचालक समरेंद्र कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांच्या प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे दि. २७ व २८ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे. या आंतरशालेय प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन ‘आयुका’चे संचालक डॉ. सोमक रायचौधरी यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे,’ अशी माहिती भारतीय विद्या भवनाचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर, उपसंचालिका नेहा निरगुडकर, भारती बक्षी यांनी दिली.

अनंत भिडे म्हणाले, ‘या इनोव्हेशन हबसाठी कोलकाता येथील नॅशनल सेंटर फॉर सायन्स म्युझियमकडून मान्यता मिळाली आहे. या हबच्या उभारणीत विज्ञानशोधिका केंद्राने ५० टक्के आणि भारत सरकारच्या वतीने ५० टक्के खर्च केला आहे. वर्षभरापूर्वी या हबच्या उभारणीला सुरुवात झाली होती. येत्या २८ तारखेपासून हे हब सर्वांसाठी खुले होणार आहे. यामध्ये मेकॅनिकल इनोव्हेशन सेंटर, अॅडव्हान्स्ड फॅब्रिकेशन अँड प्रोटोटायपिंग सेंटर, काँम्प्युटर अँड इलेक्ट्रॉनिक सेंटर असणार आहे. येथे विविध प्रकारची अवजारे, मशिनरी, प्रणाली उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स कार्यशाळाही आयोजिल्या जाणार आहेत.’

प्रा. नंदकुमार काकिर्डे म्हणाले, ‘दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या समस्यांवर उपाय शोधात यावेत, यासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे धडे देणे आवश्यक असल्याची बाब लक्षात घेऊन भारत सरकार इनोव्हेशन हब अर्थात अविष्कार केंद्र उभारणीला प्रोत्साह देत आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय त्यासाठी पुढाकार घेत आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत १५ केंद्र उभारण्यात आले आहेत. या समितीकडून निधी मिळवणारी विज्ञानशोधिका पहिली खासगी संस्था आहे. दासॉल्ट सिस्टीमने या प्रकल्पासाठी विज्ञानशोधिकेला देणगी स्वरूपात निधी दिला आहे.’

संदीप नाटेकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांतील कल्पक विचारांना वाव देण्यासाठी दरवर्षी विज्ञान दिनाच्या निमित्ताने ही प्रकल्प स्पर्धा भरविण्यात येते. यंदा यामध्ये जवळपास ७० प्रकल्प पाहता येणार आहेत. त्यातील उत्कृष्ट प्रकल्पांना विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत. पारितोषिक वितरण ‘एनसीएमएस’चे संचालक समरेंद्र कुमार यांच्या हस्ते होणार आहे.’

मुक्तांगण विज्ञान शोधिका केंद्र
गेल्या २५ वर्षांपासून विज्ञानशोधिका ‘प्रयोगातून विज्ञान’ या संकल्पनेतून विज्ञानप्रसार करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत संशोधनाविषयी आवड निर्माण व्हावी, सर्वांपर्यंत विज्ञान पोहोचावे, या उद्देशाने डॉ. व्ही. जी. भिडे यांनी १९९२मध्ये विज्ञानशोधिका केंद्राची स्थापना केली. विज्ञान शोधिकेने गेल्या पंचवीस वर्षांत सात प्रयोगशाळा, कोथरूड व निगडीसह तीन केंद्र असा विस्तार केला आहे. विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी सातत्याने विविध उपक्रम घेतले जातात. त्यामध्ये ‘मीट अ सायंटिस्ट’ (महिन्यातून एकदा शास्त्रज्ञांशी गप्पा), विज्ञानातील गमतीजमती, नाविन्यता विकास कार्यशाळा, विज्ञान चित्रपट महोत्सव, विज्ञान प्रश्नमंजुषा, आंतरशालेय यंग एक्स्प्लोअर प्रोजेक्ट स्पर्धा, विज्ञान व्याख्यानमाला आदी उपक्रमांचा समावेश आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर आणि भौगोलिक विज्ञान अशा सात प्रयोगशाळा आहेत.

स्पर्धा व प्रदर्शनाविषयी :
दिवस : मंगळवार, २७ फेब्रुवारी २०१८
वेळ : सकाळी ११ वाजता

कार्यक्रमाविषयी :
दिवस : बुधवार, २८ फेब्रुवारी २०१८
वेळ : सायंकाळी चार वाजता
स्थळ : मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्र, हॉटेल मेरियटसमोर, सेनापती बापट रस्ता, पुणे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search