Next
रम्य भुलेश्वर
BOI
Wednesday, July 19, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


शिल्पकलेचा आणि संस्कृतीचा उच्च वारसा सांगणारं एक ठिकाण म्हणजे पुण्याजवळच्या यवत या गावातलं भुलेश्वर मंदिर. ‘चला भटकू या’ सदरात या वेळी या भूल पाडणाऱ्या मंदिराची सफर...
.............
आपल्या देशाला शिल्पकलेचा अफाट वारसा लाभलेला आहे. प्राचीन काळापासून वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये शिल्पकला विकसित झाली, समृद्ध झाली. भाषेची सुरुवातच खरं तर चित्र, शिल्पांमधून झाली. अनेक प्रकारच्या शिल्पांतून व्यक्त केलेल्या भावना, साकारलेल्या गोष्टी, संदेश आपल्याला भारतभर आढळून येतात. अगदी अत्यल्प साधनांच्या आधारे, वर्षानुवर्षे मेहनत करून दगडांत कोरलेली ही शिल्पं पाहिली, की त्या वेळच्या लोकांची निष्ठा, त्यांची मेहनत आणि कलाकुसर यांची साक्ष पटते. शहरांच्या आसपास असलेले हे शिल्पकलेचे अचाट नमुने अनेकदा लोकांना माहीतही नसतात. भटकंती म्हणजे फक्त निसर्गरम्य ठिकाण, धुक्याची सफर किंवा धबधब्याखालील स्नान, अशाही कल्पना असतात; पण भटकंती म्हणजे संस्कृती, कलेची माहिती घेणंही असू शकतं. शिल्पकलेचा आणि संस्कृतीचा असाच उच्च वारसा सांगणारं एक ठिकाण म्हणजे पुण्याजवळच्या यवत या गावातलं भुलेश्वर मंदिर.

पुणे-सोलापूर रस्त्यावर असलेल्या यवत या प्रमुख गावाच्या थोडं अलीकडे भुलेश्वरला जाण्यासाठीचा फाटा फुटतो. हे मंदिर मुख्य महामार्गापासून सुमारे सहा ते सात किलोमीटर आत आहे. मुख्य महामार्ग सोडला, की वळणावळणाचा घाटरस्ता सुरू होतो. पावसाळ्यात हा प्रवास अधिक प्रेक्षणीय आणि मनोरंजक असतो. लांबूनच भुलेश्वराचं मंदिर आपलं लक्ष वेधून घेतं. मंदिरापर्यंत गाडी जाण्याची सोय आहे. 

या ठिकाणाचं मूळ नाव ‘मंगलगड’ असं होतं. तेराव्या शतकात देवगिरीकर यादवांच्या कारकिर्दीत महाराष्ट्रात हेमाडपंती रचनेच्या अनेक मंदिरांची निर्मिती झाली, त्याच वेळी भुलेश्वर मंदिराचं बांधकाम झालं असावं, असं मानलं जातं. सिंहगडावरून निघालेल्या सह्याद्रीच्या रांगेत माळशिरस गावाच्या उत्तरेला आणि यवतच्या नैर्ऋत्येला ७०० फूट उंचीवर भुलेश्वराचं मंदिर आहे. हे मंदिर दौलतमंगल या किल्ल्याचा एक भाग होतं. भुलेश्वरच्या पर्वतरांगेत सिंहगड आणि मल्हा‍रगड यांच्या सोबतीने दौलतमंगल किल्ला उभा आहे. त्या किल्ल्याचे काही बुरूज आणि प्रवेशद्वार वगळता केवळ भग्नावशेष उरले आहेत. मंदिरातील शिल्पं हा शिल्पसौंदर्याचा उत्तम आविष्कार आहे. भुलेश्वराच्या मंदिरात स्त्रीरूपातील गणेशमूर्तीचं दुर्मीळ शिल्प पाहता येतं.

या मंदिराबाबत एक दंतकथा प्रसिद्ध आहे. देवी पार्वतीनं भगवान शंकरासाठी नृत्य केलं आणि त्यांना पार्वतीची भुरळ पडली. त्यानंतर त्यांचा हिमालयात विवाह झाला. महादेवाला पार्वतीच्या सौंदर्यानं भूल पाडली, म्हणून ते ठिकाण भुलेश्वर नावानं ओळखलं जाऊ लागलं.

भुलेश्वरचं मुख्य मंदिर भव्य असून, ते एका पठारावर उभारलेलं आहे. मंदिराची उभारणी जमिनीपासून उंच चौथऱ्यावर केली आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. संपूर्ण मंदिर दगडात कोरण्यात आलं आहे. मंदिराच्या चौथऱ्यावर प्रवेश करायच्या आधी पायऱ्यांजवळ असलेल्या द्वारपालांच्या मूर्ती लक्ष वेधून घेतात. मूर्तींच्या शरीरावरचं दागिन्यांचं कोरीवकाम आकर्षक आहे. उजव्या बाजूच्या मूर्तीशेजारी वाघ हत्तीवर आक्रमण करत असल्याचं शिल्प कोरलेलं आहे. मुख्य मंदिरासमोर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. मंदिरासमोर प्रशस्त फरसबंद आवार आहे. आवारातून दर्शनी मंडपात प्रवेश करण्यासाठी तिन्ही बाजूंना प्रवेशद्वारे आहेत. त्या दगडी मंडपात दरवाजे आणि जाळीदार गवाक्षांच्या साह्यानं हवा खेळती ठेवली आहे. आतील बाजूस उत्तुंग घुमटाकृती रचना असल्यानं, दगडातला थंडावा उन्हाळ्यातही टिकून असतो.

भुलेश्वराचं संपूर्ण मंदिर अप्रतिम शिल्पकलेनं नटलेलं आहे. या शिल्पांमधलं कोरीव काम आणि मूर्तिकाम विलक्षण आहे. या मंदिरात स्त्री रूपातील गणपतीची मूर्ती आहे. गाभा‍ऱ्यात शिवलिंग आहे. अर्धखुला मंडप, अंतराळ आणि गर्भागृह अशी मंदिराची रचना आहे. या मंदिरासमोर नंदीमंडपही आहे. अर्धखुल्या मंडपाच्या खालच्या थरावर सिंह आणि हत्ती, तर वरच्या थरावर पुराणकथांमधील दृश्यं कोरलेली आहेत.

इतर हेमाडपंती मंदिरांच्या तुलनेत या मंदिरातील शिल्परचना अधिक उच्च प्रतीची आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मंदिराच्या बाहेरील रचना उत्तरेतील जैन मंदिरांच्या धर्तीवर आहे. येथील शिवमंदिरास भुलेश्वर-महादेव किंवा यवतेश्वर म्हणतात. मंदिराची मूळ बांधणी १३व्या शतकातली असून, सभोवतालची भिंत, नगारखाना आणि शिखरं अठराव्या शतकातील मराठा शैलीतील आहेत.

या मंदिराचं गर्भागृह खोल असून, त्यासमोर उंचावर काळ्या दगडातला कोरीव काम केलेला नंदी आहे. शिवलिंगाच्या संगमरवरी बाणावर पितळी मुखवटा बसवलेला आहे. अन्य शिवमंदिरांपेक्षा इथं अनेक वैशिष्ट्यं आढळतात. कीर्तिमुखं उंबरठ्यांच्या मध्यभागी न काढता दोन्ही अंगास कोरलेली आहेत. गाभाऱ्याच्या गणेशपट्टीवर गणपतीचं चित्र असलं, तरी देवळाभोवती असणाऱ्या दक्षिणाभिमुख पट्ट्यांवर गणेशाऐवजी भैरवाचं शिल्प कोरलेलं आहे. ओवऱ्या व दगडात कोरलेल्या खिडक्या यांची एकाआड एक मांडणी केलेली आहे.

या मंदिरात मोठ्या प्रमाणात मानवी आणि देवतांची शिल्पं आहेत. देवळाभोवती असलेल्या ओवऱ्यांमध्ये अनेक देवतांच्या मूर्ती असून, काही ओवऱ्या रिकाम्या आहेत. मुख्य सभामंडपाच्या भोवती असलेल्या अर्धभिंतींवर युद्धप्रसंग, सिंह, हत्ती इत्यादी प्राणी आणि रामायण-महाभारतातले प्रसंग कोरलेले आहेत. महाभारतातले प्रसंग भारतातल्या इतर मंदिरांपेक्षा इथं जास्त ठसठशीत आणि रेखीव आहेत. द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम अशा अनेक कथा शिल्पांच्या रूपातून साकारण्यात आल्या आहेत आणि त्या लक्षवेधक आहेत. मातृकादेवी, गणपती, विष्णूचे अवतार, योद्धे, पक्षी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शिल्पाकृती या देवळात कोरलेल्या आढळतात.

यादव साम्राज्याच्या अंतानंतर आलेल्या राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरांची नासधूस केली, त्यात या मंदिराचंही मोठं नुकसान झालं आहे. तरीही काही शिल्पांमधलं सौंदर्य अजूनही टिकून आहे. पहिले बाजीराव पेशवे आणि सातारचे शाहू छत्रपती यांचे गुरू ब्रह्मेंद्रस्वामी यांनी अनेक हेमाडपंती मंदिरांचा जीर्णोद्धार केला. १७३७मध्ये स्वामींनी एक लाख रुपये खर्चून तीन कमानींचा नगारखाना, सभामंडप व तीन चुनेगच्ची शिखरे बांधली. जीर्णोद्धारामुळे हे मंदिर हेमाडपंती-मराठा अशा संमिश्र वास्तुशैलीचं झालं आहे. पुरातत्त्व खात्यानं हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणूनही घोषित केलं आहे. मंदिराच्या आत छायाचित्रणास बंदी आहे. महाशिवरात्रीला इथे मोठी यात्रा असते. माळशिरस गावातून श्रावण महिन्यात मंदिरात भुलेश्वराची पालखीही नेली जाते.

कसं जायचं? 
पुण्यापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर, यवत गावाजवळ या मंदिराकडे जाण्यासाठी फाटा आहे. बसनं जायचं असल्यास स्वारगेटहून यवत बसस्थानकापर्यंत बससेवा आहेत. तिथून पुढे सहा आसनी रिक्षानं भुलेश्वर मंदिरापर्यंत जाता येतं.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(‘चला, भटकू या’ हे सदर दर बुधवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search