Next
‘नाट्यक्षेत्राला गरज वैविध्यपूर्ण प्रयोगांची’
BOI
Tuesday, March 27, 2018 | 03:03 PM
15 0 0
Share this story

नाट्यक्षेत्रातील मानाचा हबीब तन्वीर राष्ट्रीय सन्मान मिळालेले ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भोळे नाट्यक्षेत्रात ३५ वर्षे कार्यरत आहेत. ‘जिज्ञासा थिएटर्स’ या संस्थेच्या माध्यमातून ते रत्नागिरीत नाट्यशिबिरांसह वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करतात आणि अनेक रंगकर्मी घडवतात. ‘प्रेक्षकांनी नाट्यगृहात जाऊन नाटके पाहिली पाहिजेत आणि त्यासाठी नाट्यक्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोग सातत्याने व्हायला हवेत, तरच रंगभूमीला चांगले दिवस येतील,’ असे त्यांना वाटते. आज (२७ मार्च) जागतिक रंगभूमी दिन आहे. त्या निमित्ताने कोमल कुळकर्णी-कळंबटे यांनी घेतलेली ही त्यांची मुलाखत...
.............
जागतिक रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय रंगभूमीबद्दल काय सांगाल?
सर्वप्रथम ‘बाइट्स ऑफ इंडिया’ परिवारासह सर्व वाचक, प्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा. भरतमुनींनी नाट्यशास्त्रात ज्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, त्या इतरांनी लिहिलेल्या नाट्यशास्त्रापेक्षा सरस आहेत, असे मला वाटते. अर्थात त्या वेळी प्रकाशयोजना अस्तित्वातच नव्हती, त्यामुळे त्या दृष्टीने त्यात काही त्रुटी असतील; पण त्या वगळता ते सरस आहे. नट मग तो कुठल्याही शैलीचा असो, नट म्हटल्यावर रंगभूमीवरचा नट हा विचार केला जातो. रंगभूमी जागतिक असो अथवा स्थानिक असो, तुम्ही रंगभूमीवरून बोललेला प्रत्येक शब्द नाट्यगृहातील शेवटच्या प्रेक्षकाला ऐकू गेला पाहिजे. ज्याला आपण लाउडनेस म्हणतो, तशा पद्धतीने बोलण्याची क्षमता त्या पात्राकडे असायलाच हवी. पूर्वीच्या नाटकांना ‘मेलोड्रामा’ म्हटले जायचे. आता परत तेच शास्त्र आलेले पाहायला मिळते. नाटकातील अभिनय नैसर्गिक पद्धतीने होणे गरजेचे आहे. पूर्वी ध्वनिप्रणाली (साउंड सिस्टीम) तितकीशी विकसित नसल्याने संवादफेक ओरडल्यासारखी करावी लागायची; मात्र आता तसे नाही. आता नाटकांतही नैसर्गिकपणे बोलणे सहज शक्य आहे. कारण आता तेवढ्या प्रगल्भतेची ध्वनिप्रणाली निर्माण झाली आहे. आज कॉलर माइक असल्याने सहज बोलले तरी प्रेक्षकांना ऐकू जाऊ शकते. परदेशी लोकांनी या प्रगतीची आस धरली म्हणून ते सुधारत इथवर आले; मात्र आपल्याकडील लोकांकडे ही प्रगतीची आस अजूनही तितकी नाहीये, हे दुर्दैव आहे. म्हणूनच जगाच्या पातळीवर आपण शैक्षणिक, बौद्धिकदृष्ट्या कितीही हुशार असलो, तरी मागे पडतो. म्हणूनच परदेशी लोकांचा उदो उदो केला जातो. तांत्रिकदृष्ट्या ते नक्कीच पुढारलेले आहेत.

- सध्या आपल्याकडील रंगभूमीवरील नाटकांमध्ये प्रकाशयोजना, कथानक याबाबत काही प्रयोग केलेले दिसतात. त्याबद्दल काय सांगाल?
- सध्या तंत्रज्ञान बदलत आहे आणि त्यानुसार कथानक असेल, प्रकाशयोजना असेल किंवा त्यांच्याशी निगडित अन्य बाबी असतील, तर त्यात प्रयोग केले जात आहेत की खूपच चांगली गोष्ट आहे. हल्ली नेपथ्याच्या बाबतीतही ते दिसून येते. नाटकांत नेपथ्य हा भाग खूप महत्त्वाचा असतो. नाटकातील प्रसंग जसजसे बदलतात तसतसे नेपथ्यही कथाप्रसंगानुसार बदलले जाते; मात्र हल्ली काही नाटकांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच पार्श्वभूमी दिसते आणि प्रकाशयोजनेच्या माध्यमातून त्या-त्या प्रसंगानुरूप हे नेपथ्य उठावदार केले जाते. थोडक्यात, आभास निर्माण केले जातात. ‘शहाण्याचं घर शेणाचं’ ही माझी कामगारांवर आधारित पहिली एकांकिका. कामगारांशी निगडित विषय असल्याने त्यामध्ये मी अख्खा कारखाना उभा करत होतो. तिथे फक्त ठोकळे वापरत होतो; पण तिथे एक खरा कारखाना आहे आणि त्यात काम सुरू आहे हे प्रेक्षकांना जाणवत होते. हे सर्व आभास केवळ प्रकाश आणि ध्वनी यांच्या संयोगातून निर्माण केले जात होते. आभास निर्माण करणे हे नट, दिग्दर्शक यांचे खरे कौशल्य आहे. तुम्ही काय दाखवता आणि कशा पद्धतीने दाखवता हे महत्त्वाचे.

- असे प्रयोग सातत्याने होणे गरजेचे आहे, असे वाटते का?
- नक्कीच. असे प्रयोग नक्कीच व्हायला पाहिजेत. याला कारण असे की, तुमच्याकडे पैसे असतील, तर तुम्ही स्टेजवर रंगीत ताजमहालही आणून उभा करू शकता. हे प्रेक्षकांना विरंगुळा म्हणून बघायला ठीक आहे; पण जेव्हा एखाद्या कलाकृतीचा मनमुराद आनंद घ्यायचा असतो, त्या वेळी तुम्हाला कमीत कमी गोष्टींत जास्तीत जास्त काहीतरी देता आले पाहिजे. त्यात तांत्रिक गोष्टीही पाहिजेत. तंत्र म्हणजे हिऱ्याला पैलू पाडावे अशी बाजू आहे. त्याची साथ घ्यायलाच पाहिजे; पण ती किती घ्यायची हे त्या-त्या निर्मितीवर ठरते. दुर्दैवाने काहीवेळा असे प्रयोग केलेले प्रेक्षकांच्या पसंतीस येत नाहीत; पण प्रयत्न हे सातत्याने व्हायला पाहिजेत.

- हल्ली तरुण-तरुणी झटपट लोकप्रिय होण्यासाठी नाटकांऐवजी मालिकांकडे वळतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?
सुहास भोळे- मुळात नाटक हा पाया आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचे झाले, तर नाटक ही व्यक्त होण्याची भाषा आहे. म्हणजे तुम्हाला व्यक्त व्हायचे असेल, मग ते चित्रपटात असो, मालिकांत असो किंवा नाटकात असो, ते व्यक्त होताना जे काही म्हणायचे आहे ते व्यवस्थित पद्धतीने सांगता आले नाही, तर ते समोरच्याला समजणार नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगणे असो, प्रियकराने प्रेयसीला असो किंवा मुलाने आईला असो, सांगणे हे एक प्रकारचे ट्युनिंग आहे. या प्रत्येक ठिकाणी नाटक असते. व्यक्त होताना तसे भाव चेहऱ्यावर आले नाहीत, तर ते समोरच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचणार नाही. एखादी गोष्ट आपण ठोकळ्यासारखे उभे राहून चेहऱ्यावर कोणताही भाव न आणता सांगितली, तर त्या सांगण्याला काही अर्थ नसतो. चार लोकांसमोर उभे राहून बोलायचे असेल, तर त्यासाठी धाडस लागते आणि हे धाडस करायला नाटक शिकवते. यातून जो आत्मविश्वास मिळतो, तो जास्त मिळतो. त्यामुळे अभिनयावर आधारित अन्य कोणत्याही क्षेत्रात जाण्यासाठी नाट्यक्षेत्रात पाया पक्का करणे अत्यंत आवश्यक आहे.

- तुम्ही या क्षेत्रात जवळपास ३५ वर्षे कार्यरत आहात. या मोठ्या काळात तुम्ही खूप बदल पाहिले आहेत. तुम्हाला भावलेल्या, देशातल्या एखाद्या वेगळ्या प्रयोगाबद्दल किंवा बदलाबद्दल सांगा...
- आपल्या देशाचा विचार करता कोलकात्याच्या रंगभूमीने कात टाकली आहे. तिथली रंगभूमी ‘टॉप’ रंगभूमी आहे असे म्हटले जाते. तिथे वैविध्यपूर्ण प्रयोग केले जात आहेत. विशेषतः ‘लाइट्स’च्या बाबतीत खूप प्रयोग केले जातात. रतन थिय्यम यांनी ‘लाइट्स’वर इतके प्रभुत्व मिळवले आहे, त्याला खरंच तोड नाही. त्यांची काही शिबिरे मुंबईतही झाली; पण तिथे फारसे लोक आले नाही हे दुर्दैव. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात रंगभूमीवर असे काही प्रयोग झाले. गंगा अवतरली आणि त्यात ग्रंथ तरंगत आहेत, अशा काही प्रयोगांचा त्यात समावेश आहे; पण थिय्यम यांनी अख्ख्या स्टेजवर पाणी भरले आहे असे शॉट घेतले आहेत. ते अप्रतिम आहेत. थिय्यम जे काही करतात, तशा पद्धतीच्या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या अजून आपल्या व्यावसायिक रंगभूमीवरही आल्या नाहीत. त्या येणे गरजेचे आहे. ते नक्कीच ते खर्चिक असेल. लोक खूप ठिकाणी खर्च करतात, तर हे बघण्यासाठीही करावा. कोट्यवधी रुपये खर्चून चित्रपट निर्मिती केली जाते. त्याप्रमाणेच रंगभूमीला जिवंत ठेवायचे असेल, तर अशा गोष्टी करणे गरजेचे आहे.

- आपल्याकडच्या रंगभूमीवर कशा प्रकारच्या सुधारणा व्हाव्यात, असे तुम्हाला वाटते?
- जागतिक स्तरावर आधीच सुधारणा झाल्या आहेत. पाश्चिमात्य देशांत ‘इलेव्हेटिंग थिएटर्स’ म्हणजे लिफ्ट थिएटर्स आहेत. म्हणजे आपल्याकडे फिरता रंगमंच असतो, तसे तिथे प्रत्येक लिफ्टवर एकेक थिएटर सेट केलेले असते. ‘ब्लॅक आउट’ झाले, की तो मजला खाली जातो आणि पुढचा मजला वर येतो. कलाकार विंगेत जातात आणि पुढचे नाटक सुरू होते. गेल्या वर्षी आपल्याकडे नागपुरात एका स्पर्धेदरम्यान हिमालयातील दृश्यासाठी बर्फ पडण्याचे दृश्य दाखवले होते. तांत्रिकदृष्ट्या तो खूप छान झाला. त्यामुळे सुधारणा झाल्या, तर त्या नाट्यगृहाबाबत झाल्या पाहिजेत, नाट्यगृहांच्या मेंटेनन्सबाबत झाल्या पाहिजेत, प्रेक्षकांकडून झाल्या पाहिजेत. प्रेक्षकांनी नाट्यगृहात जाऊन नाटक बघायला पाहिजे, तरच रंगभूमी जिवंत राहणार आहे. आज मोबाइल, टीव्ही आणि इंटरनेटमुळे घरबसल्या सगळे दिसते. त्यामुळे नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे हा प्रकार कमी झाला आहे. त्या दृष्टीने सुधारणा हवी.

- प्रेक्षक रंगभूमीकडे वळण्याचे प्रमाण वाढावे, यासाठी काय करायला हवे, असे एक रंगकर्मी म्हणून तुम्हाला वाटते?

- प्रेक्षकवर्ग नाटकांकडे ओढला जात आहे, हे चित्र काही नाटकांपुरतं असलं, तरी रंगकर्मी म्हणून माझ्यासाठी नक्कीच आशादायी आहे; मात्र प्रत्येक नाटकाचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग असतो. रत्नागिरीचेच उदाहरण घ्यायचे झाले, तर इथे संगीत नाटक बघण्यासाठी नाट्यप्रेमी प्रचंड संख्येने गर्दी करतात; पण संगीत नाटकांचा प्रेक्षक इतर कुठलेही चांगले, कितीही सरस असलेले नाटक बघायला जाणार नाही, हे एक प्रेक्षक म्हणून त्यांचे दुर्दैव आहे. स्वतःची आवड असणे, हा भाग वेगळा; पण इतर प्रकारांतही काय होते, हे बघता आले पाहिजे, तरच आपल्याला टीका करण्याचा अधिकार आहे. त्यात काय वाईट आहे हे बघण्यासाठी तरी बाकीची नाटकं बघितली पाहिजेत. दुसरा मुद्दा असा, की प्रशांत दामलेंसारख्या काही नटांनी स्वतःची वेगळी ऊर्जा विकसित केली असल्यामुळे त्यांच्या एकट्याच्या नावावर नाटक चालते. मग अशी ऊर्जा बाकीच्यांना का निर्माण करता येत नाही, हा प्रश्न आला. मराठी चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या एका अभिनेत्याने काही महिन्यांपूर्वी नाटक केले आणि त्याचा प्रयोग बघायला येण्याचे आमंत्रण केले. त्यानुसार मी गेलो, तर ते तद्दन फालतू नाटक होते. धम्माल विनोदी नाटक म्हणून त्याची जाहिरात केली आणि संपूर्ण नाटकात एकदाही हसायला आले नाही तर लोक ३०० रुपये घालून कशाला नाटक बघतील. ही शुद्ध फसवणूक झाली. या पातळीवर काम करण्याऱ्या कलाकारांनी खरे तर अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. कुठेतरी गणित चुकते आहे, हे लक्षात आले पाहिजे आणि या कलाकारांना आत्मपरीक्षणही करता आले पाहिजे. नाहीतर मग चार प्रयोग करून नाटक बंद पडते, हे दुर्दैवी आहे. प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळवण्यासाठी आपण काय करतोय, काय दाखवतोय, हे महत्त्वाचे आहे.  

- जागतिक पातळीवरचा विचार करता आपल्याकडील नाटकांतील तंत्रवापराबद्दल काय सांगाल?

- नाटक सादरीकरणासाठी आज जागतिक पातळीवर जे तंत्र वापले जाते, ते तंत्र आपल्या भारतीय रंगभूमीवरील नाटकांच्या सादरीकरणाबाबत दिसून येत नाही. याला दोन कारणे आहेत. पहिले म्हणजे आर्थिक बाजू. आपल्या देशात नाटकांच्या बाबतीत आर्थिक बाजू कमकुवत आहे. म्हणजे निर्मितीचा आर्थिक स्तर वाढला तर त्याचा बोजा प्रेक्षकांना परवडत नाही ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे निर्माता हे धाडस करायला बघत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुळातच नवीन तंत्रज्ञान शिकायची आवड असावी लागते. देशपातळीवरचा विचार करायचा झाल्यास मणिपूरमधील रतन थिय्यमसारख्या (मणिपूर) माणसाने जी प्रगती केली आहे, प्रकाशयोजनेच्या बाबतीत जे उच्च तंत्रज्ञान विकसित केले आहे, तसे तंत्र आपल्याकडे व्यावसायिक रंगभूमीवरही वापरले जात नाही. ते महाराष्ट्रासह देशभरात सर्वत्र वापरले जावे, असे मला वाटते. असे झाले, तर खऱ्या अर्थाने आपल्याकडची रंगभूमी प्रगत झाली आणि जागतिक पातळीवर पोहोचली, असे म्हणता येईल.

(सुहास भोळे यांचे मनोगत आणि त्यांच्या सादरीकरणाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link