Next
फेरफटका सांगली जिल्ह्याचा...
BOI
Wednesday, March 20, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

श्री गणेश मंदिर

‘करू या देशाटन’
सदराच्या मागील काही भागांत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची माहिती घेतली. आजच्या भागापासून पाहू या, कोल्हापूरला लागूनच असलेल्या सांगली जिल्ह्यातील पर्यटनस्थळांबद्दल... 
.........
राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये, शेतीमध्ये, व्यापार, उद्योगामध्ये हा जिल्हा कायम अग्रेसर राहिला आहे. सहकारी संस्थांचे मोठे जाळे येथे आहे. द्राक्ष उत्पादनामुळे वायनरी, बेदाणे यांचे उत्पादन आणि निर्यातही होते. हळद, गूळ यांचे उत्पादन व व्यापारही मोठा आहे. सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीमुळे या भागात आर्थिक सुबत्ता आहे. भारतातील सर्वांत कुशल सोने गाळणारे (Gold Refinery) कारागीर येथे आहेत. कृष्णाकाठच्या सुपीक जमिनीमुळे या परिसराला पूर्वापार समृद्धी होतीच. समृद्धी असली, की सुबत्ता येते व त्याच्या बरोबरीने आक्रमणे आलीच. कृष्णेच्या काठावर वसलेल्या सांगलीने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार, यादव, बहामनी, आदिलशाही, मुघल, मराठे, संस्थानिक पटवर्धन आणि अखेर इंग्रज अशा अनेक राजवटी पहिल्या. येथे कला, वाणिज्य, अभियांत्रिकी, वास्तुरचना, कृषी, अध्यापन, वैद्यकीय, औषधनिर्माणशास्त्र, संगीत, नृत्य अशा सर्व प्रकारच्या विद्याशाखांमधील शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. सांगलीने अनेक नररत्ने दिली. त्यांची यादी एवढी मोठी होईल, की त्यासाठी वेगळा लेख लिहावा लागेल. अनेक स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, विचारवंत, क्रिकेटपटू, कुस्तीगीर, खेळाडू, अभिनेते, अभिनेत्री, गायक, गायिका, संगीतकार, लेखक, कवी, नाटककार, वक्ते, लोकनाट्यकार, उद्योजक आणि कष्टाळू कृषीवल या मातीत जन्मले. 

सांगली हे नाव कसे तयार झाले, याबद्दल वेगवेगळी मते आहेत. कृष्णा नदीच्या काठावर सहा गल्ल्या आहेत. त्यामुळे ‘सहा गल्ली’वरून सांगली झाले असावे असा एक मतप्रवाह आहे. दुसऱ्या मतप्रवाहानुसार, कानडी भाषेत सांगलकी म्हणत, म्हणून त्याचे सांगली झाले असावे. मिरज, कुपवाड व सांगली मिळून महानगरपालिका झाली आहे. 

१६६९ साली छत्रपती शिवाजी महाराजांचे सरनोबत नेताजी पालकर यांनी आदिलशहाकडून सांगली, मिरज व ब्रह्मनाळ जिंकून घेतले. सन १७७२मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांनी गोविंदराव पटवर्धनांना हा प्रदेश जहागीर म्हणून दिला. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या मृत्यूनंतर मिरज जहागिरीची वाटणी झाली. त्यात मिरज सांगलीपासून वेगळे झाले. सन १८०१मध्ये चिंतामणराव पटवर्धनांनी सांगली संस्थान स्थापन केले. तेव्हापासून या गावाला महत्त्व आले. चिंतामणरावांनी सांगली येथे सुप्रसिद्ध गणेशदुर्ग बांधला. तसेच कृष्णा नदीच्या काठावर प्रसिद्ध गणेश मंदिर बांधले. 

आयर्विन पूल

आयर्विन पूल :
सांगलीत प्रवेश होतो तो आयर्विन पुलावरून. या पुलावरून महापुरात पट्टीचे पोहणारे उड्या टाकतात व पोहत काठावर येतात. सांगलीत इ. स. १९१४ व इ. स. १९१६ साली आलेल्या कृष्णेच्या महापुरानंतर नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी तत्कालीन संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी पुढाकार घेतला व इ. स. १९२७मध्ये पुलाचे बांधकाम सुरू झाले आणि इ. स. १९२९ साली ते पूर्ण झाले. पुलाचे उद्घाटन तत्कालीन व्हाइसरॉय आयर्विन यांच्या हस्ते इ. स. १९२९मध्ये झाले. 

श्री गणेश, सांगली

गणेश मंदिर महाद्वारश्री गणेश मंदिर : इस्लामपूरमार्गे आल्यावर कृष्णा नदीच्या काठावरच हे मंदिर दिसते. संस्थानिक चिंतामणराव पटवर्धन यांनी हे सुंदर मंदिर बांधले. हे सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान आहे. सन १८१४ ते १८४४ एवढा ३० वर्षांचा काळ मंदिर उभारणीला लागला. पायासाठी मजबूत धर नसल्याने प्रथम ३० ते ४० फूट खोदाई करून दगड व चुना यांचा पाया तयार करून घेण्यात आले. नदीच्या पश्चिम बाजूला खालपासून तटबंदी करण्यात आली. तटबंदीच्या पलीकडे नदीला सुंदर घाट बांधण्यात आला. त्यामुळे नदीच्या प्रवाहाचा तटबंदीशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. तसेच नदीच्या पूर्वेकडे धूप होत नाही. त्यामुळे पुरापासून गावालाही संरक्षण मिळते. अशा कल्पकतेने हे मंदिर बांधलेले आहे. हे पेशवाई शैलीचे पंचायतन मंदिर आहे. मुख्य मंदिराच्या चारही बाजूला शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मीनारायण या देवतांची मंदिरे आणि मध्ये श्री गजाननाचे मुख्य मंदिर अशी रचना आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी क्षेत्र महाबळेश्वर येथील मंदिरासाठी आणलेला संगमरवरी दगड शिल्लक होता. तो येथे आणण्यात आला व भीमण्णा पाथरवट व मुकुंद पाथरवट यांच्याकडून मंदिरातील मूर्ती घडवून घेण्यात आल्या. 

गणेशदुर्ग (फोटो : Tripadvisor)

गणेशदुर्ग किल्ला :
प्रशासकीय कारभारासाठी पटवर्धन संस्थानिकांनी या भुईकोट किल्ल्याची उभारणी केली. या ठिकाणी तटबंदी केलेली असून खंदकही होता. सध्या येथे जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच इतरही अनेक शासकीय कार्यालये आहेत. वसंतदादा पाटील यांना येथे बंदिवासात ठेवण्यात आले होते.

गणेशदुर्ग दरबार हॉल (फोटो : Tripadvisor)

हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिनमिरज : मिरज हे दक्षिणेकडे जाणारे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असून, येथील भुईकोट किल्ल्याचे अवशेष, वानलेस मिशन दवाखाना व मीरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. अवलिया हजरत पीर ख्वाजा शमशोद्दिन हे तुर्कस्तानातील काशगर या गावातून येथे आले. त्यांच्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. या दर्ग्यापुढे हिंदू आणि मुस्लिम दर्शनासाठी जात असतात. या दर्ग्याचे बांधकाम सन १६६८मध्ये करण्यात आले. २०० फूट लांब आणि २०० फूट रुंद अशा चौथऱ्यावर हा दर्गा बांधला आहे. प्रख्यात शास्त्रीय गायक स्वरसम्राट मरहूम अब्दुल करीम खाँ यांची कबर याच दर्ग्याच्या आवारात आहे. त्यांचे शिष्य त्यांची पुण्यतिथी येथे संगीत महोत्सवाने साजरी करतात. मिरजेची जगभरात ‘मेडिकल सिटी’ अशी ओळख झाली आहे. खासकरून अरब देशांतील लोक उपचारासाठी येथे येत असतात. अनेक प्रकारची मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स येथे आहेत. तसेच मेडिकल कॉलेजही आहे. दुसरे म्हणजे सतार, तंबोरा, सारंगी, वीणा ही तंतुवाद्येही येथे तयार करून मिळतात. या ठिकाणी हिंदुस्थानी संगीतातील अनेक गायक होऊन गेले. 

संगमेश्वराचे मंदिर

संगीत शारदा नाटकाचे लेखन येथे झाले.हरिपूर : कृष्णा आणि वारणा नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणी हे गाव आहे. येथे संगमेश्वराचे मंदिर आहे. सांगलीतून हरिपूरकडे जाताना वाटेत पुरातन गणपती मंदिर आहे. पूर्वी त्याच्या भोवताली दाट झाडी होती. त्यामुळे या ठिकाणाला ‘बागेतला गणपती’ असे म्हणतात. एक पिकनिक स्पॉट म्हणून हे ठिकाण लोकप्रिय आहे. मिरजेचे जहागीरदार गोविंद हरी पटवर्धन यांनी हे देऊळ बांधले. संगमामुळे हे सहलीचे ठिकाण झाले आहे, तर संगमेश्वराच्या मंदिरामुळे भाविकांची गर्दीही असते. विशेषकरून पावसाळ्यात पूर आल्यावर नदी सागराप्रमाणे दिसते. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांनी येथील चौकातील पारावर बसून ‘संगीत शारदा’ हे नाटक लिहिले आहे. तो पार आजही येथे पाहायला मिळतो. येथे हळदीचे पेव (जमिनीतील साठवणूक) पाहायला मिळते. हे ठिकाण सांगली शहरापासून तीन किलोमीटरवर आहे.

रामगड/रामदुर्ग : हा किल्ला विजापूरचे सरदार डफळे यांनी जत तालुक्यात रामपूरजवळ सतराव्या शतकात बांधला असून, किल्ल्याला पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. येथे हेमाडपंती शैलीतील प्राचीन शिवमंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज अजूनही दिसतात. हा किल्ला एका छोट्या टेकडीवर बांधला असून, त्याचा टेहळणीसाठी उपयोग केला जात असावा. हा किल्ला सांगलीपासून डफळापूरमार्गे ८३ किलोमीटरवर आहे.

रामगड

कृष्णा आणि वारणा  संगम

दंडोबा :
मिरजेच्या पूर्वेस हे निसर्गरम्य ठिकाण आहे. पुरातन गुंफा मंदिरे हे येथील वैशिष्ट्य. वनविभागाने येथील जंगल केले आहे. दुष्काळी भागात हे ठिकाण म्हणजे वाळवंटातील मृगजळ आहे. सांगली-पंढरपूर रस्त्यावर देशिंग गावाच्या हद्दीत डोंगरावर हे ठिकाण आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा दंडकारण्याचा भाग होता. डोंगरावर सुमारे तीनशे वर्षांपूर्वीचा मनोरा आजही सुस्थितीत उभा आहे. डोंगरावर अनेक मंदिरे असून, एका दिवसाच्या सहलीसाठी हे ठिकाण खूप छान आहे. या डोंगराचा ‘क’ दर्जाच्या पर्यटनस्थळांमध्ये समावेश झाला आहे. 

कवठे एकंदकवठे एकंद : सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील हे खूप लहानसे खेडे; पण दसऱ्याच्या आतषबाजीमुळे हे प्रसिद्ध झाले आहे. जशी गणपतीची मंडळे असतात, तशी येथे आतशबाजीची मंडळे आहेत. म्हैसूरच्या तोडीसतोड आतषबाजी येथे होते. दारूकाम करणाऱ्यास गोलंदाज म्हणतात. असे दोन ते तीन हजार गोलंदाज येथे आहेत. लाकडाचे ओंडके पोखरून त्यात दारू ठासली जाते. त्याच वेळी आत विशिष्ट रचना करून, मग ती प्रज्ज्वलित केली जाते. त्यामध्ये भारताचा नकाशा, मोर, फुगडी डिस्को, झाडांचे आकार दाखविले जातात. येथे श्री सिद्धरामाचे एक प्राचीन मंदिर आहे. तासगावपासून पाच किलोमीटरवर हे गाव आहे. 

सागरेश्वर देवराष्ट्र : देवराष्ट्र ही यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी, तसेच प्रसिद्ध समाजसेविका रमाबाई रानडे यांचेही जन्मगाव. गावाच्या हद्दीतच सातवाहन काळातील सातव्या शतकातील मंदिरसमूह आहे. येथे लहानमोठी ४०-५० मंदिरे आहेत. सर्व देवळे हेमाडपंती शैलीची आहेत, मध्यभागी असणारे देऊळ सर्वांत प्राचीन असून, ते समुद्रेश्वराचे (सागरेश्वर) आहे. हा भाग पूर्वी ‘कुंताड’ राष्ट्र म्हणून ओळखला जाई व येथे ऋषी-मुनी तपश्चर्या करीत असत. त्यांच्यापैकी कोणीतरी ही देवालये बांधली असावीत, असे संशोधकांचे मत आहे. देवळांची बांधणी हेमाडपंती आहे. सागरेश्वराहून देवराष्ट्र गावात जाताना एक प्राचीन तळे आहे. हे कुंतल नरेशाने दुरुस्त केले, असे म्हणतात. सूत नावाचे पूर्वी एक महाऋषी होते. त्यावरून ‘सूत उवाच’ असा उल्लेख पुराणात आहे. सूत हा पुराणकथाकार होता. सूतमुनी एकदा व्यासांना म्हणाले, ‘गुरुदेव, मी सारी तीर्थे हिंडलो. परंतु मला मानसिक समाधान मिळाले नाही. मला आत्मिक समाधान लाभेल असे ठिकाण सांगा.’ व्यासांनी त्यांना समुद्रेश्वराच्या महादेवाचे मंदिर सुचविले. तेव्हापासून सूत ऋषींनी या ठिकाणी तप केले. त्यामुळे ही भूमी पावन झाली असे लोक मानतात. 

क्षेत्र औदुंबर

सागरेश्वर अभयारण्य :
१०.८७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेले हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. संपूर्ण अभयारण्याला कुंपण घातले आहे. या अभयारण्यात सांबर, काळवीट हे प्राणी संख्येने अधिक आहेत. याशिवाय तरस, लांडगे, कोल्हे, ससे, रानमांजरे आदी प्राणीही येथे दिसतात. अनेक पक्षी या जंगलात आढळतात. येथे मोरांची संख्या खूप अधिक आहे. सागरेश्वराच्या देवळापासून थोड्या अंतरावर अभयारण्य सुरू होते. या सुंदर वनाची निर्मिती करण्यासाठी प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक व वृक्षमित्र धों. म. मोहिते यांनी परिश्रम घेतले व उजाड माळावर वनसंपदा उभी केली. त्यामुळेच या ठिकाणी अभयारण्य निर्माण झाले आहे. सुमारे ३०-४० प्रकारचे वृक्ष या जंगलात आढळतात. 

ब्रह्मनाळ : कृष्णा व वेण्णा नदीच्या संगमावर हे ठिकाण आहे. राजयोगी आनंदमूर्ती यांची येथे समाधी आहे. कृष्णेच्या पात्रामध्ये मगरींचा वावर आहे. अनेक लहान मुले, मोठी माणसे मगरींनी येथून ओढून नेली आहेत. 

कवलापूर : सांगलीजवळ असलेल्या या छोट्या गावातील माधवराव पाटलांनी इंग्लंडमधील इलिंग या शहराचे महापौर होण्याचा मान १ मे १९९६ रोजी मिळवला. गेली तीन तपे इंग्लंडमध्ये राहूनही अस्खलित मराठी बोलणारे माधवराव हे मराठी बोलताना वाक्यात चार-चार इंग्रजी शब्द घुसडणाऱ्या मराठी जनांसाठी आदर्श आहेत. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू बॅ. पी जी. पाटील यांचे हे जन्मगाव, तसेच प्रसिद्ध वगसम्राट ‘काळू बाळू’ हेही याच गावचे. बॅ. पी जी. पाटील गमतीने म्हणायचे, की आम्ही ‘काळू बाळूच्या गावचे. 

कवठेपिरान : मिरज तालुक्यातील कवठेपिरान हे गाव आदर्श गाव म्हणून गौरवले गेले होते. खासदार पहिलवान मारुती माने यांचे हे जन्मगाव. 

पद्माळे : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे हे जन्मगाव. कृष्णा नदीच्या काठावर असलेले हे गाव बागायतींचे आहे. नदीच्या पात्रामध्ये अनेकदा मगरींचे दर्शन होते. 

गोपुर तासगाव गणपतीतासगाव : हे गाव द्राक्षांसाठी जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्री गजाननाचे २०० वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. पेशव्याचे प्रसिद्ध सेनानी परशुरामभाऊ पटवर्धन यांनी हे मंदिर बांधले. या मंदिराला दक्षिणी घाटणीचे सात मजली गोपुर आहे. गोपुरावर खालपासून वरपर्यंत विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत. अनेक भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. 

रेणावी : येथील रेवणसिद्ध मंदिर हे नाथपंथीय रेवणसिद्धस्वामींचे मंदिर आहे. १६व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले. हे लिंगायत समुदायाचे श्रद्धास्थान आहे. श्री देव रेवणसिद्धनाथ यांनी सोलापूर शहरातील लिंगायत समुदायाचे मुख्य संत श्री सिद्धेश्वर महाराजांना भेट दिली होती. चिपळूण-कराड-विजापूर रस्त्याच्या दक्षिणेस रेवणसिद्ध मंदिर उभे आहे. असे म्हणतात, की या पर्वतावर ८४ पवित्र ठिकाणे आहेत. येथे आता उद्यान तयार करण्यात आले आहे. रेवण पर्वतावर निरनिराळ्या रंगांची माती सापडते. भक्त भस्म म्हणून याचा वापर करतात. 

कवठे महांकाळ महाकाली

कवठे महांकाळ येथील २५ फूट उंचीची दीपमाळ.श्री महाकाली देवी विग्रह दर्शनकवठे महांकाळ : महाकाली देवीच्या मंदिरासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. श्री महाकाली देवीच्या मस्तकाचा आकार शिवलिंगासारखा आहे. श्री महाकाली देवीच्या हातातील शस्त्रे तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी देवीसारखी दिसतात. श्री महाकाली मंदिरात सर्व नैवेद्य शाकाहारी असतात. मंदिराच्या आवारात कोणतीही पशुहत्या होत नाही. श्री महाकाली मंदिराच्या जवळच श्री विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. पूर्वी मंदिराला लागून कमंडलू नावाची नदी वाहत होती. या नदीच्या तीरावर त्रिमुखी दत्तमंदिर आहे. द्राक्षे, साखर-गहू, ज्वारी, बाजरी, गोड मका ही येथील मुख्य उत्पादने आहेत. त्याचप्रमाणे देवी महाकाली साखर कारखानादेखील आहे. हे शहर सांगलीपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे. कवठे महांकाळ गावाच्या आसपास कुकटोळी येथे श्री गिरलिंग, दंडोबा येथे श्री दंडनाथ, रायवाडी येथे श्री हरणेश्वर, आरेवाडी येथे श्री बिरोबा देवस्थान, इरळी येथे हेमांडपंती शिवमंदिर, आगळगाव येथे आगळेश्वर आदी प्राचीन ठिकाणे आहेत. 

आटपाडी : सांगलीच्या ईशान्येस हे गाव आहे. हा भाग माणगंगेच्या खोऱ्यात असल्याने माणदेश म्हणतात. या भागातील डाळिंबे निर्यात होतात. या दुष्काळी भागातून गेलेल्या चार साहित्यिकांनी साहित्याचे मळे फुलविले. इतिहासकार ना. सं. इनामदार यांनी अनेक व्यक्तिरेखांचा इतिहास पुढे आणला. ‘गदिमां’नी गीतरामायण लिहून गीत-संगीताच्या क्षेत्रात ठसा उमटविला. आटपाडीजवळील शेटफळ येथे आजोळी ग. दि. माडगूळकर यांचा जन्म झाला. व्यंकटेश माडगूळकरांनी ग्रामीण कथा खुसखुशीतपणे लिहिल्या. आटपाडीजवळील माडगूळ हे त्यांचे गाव. शंकरराव खरात यांनी ‘तराळ-अंतराळ’ या आत्मकथेतून उपेक्षितांच्या व्यथा मांडल्या. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद या चौघांनीही भूषविले. या भागातील राम नाईक यांनी केंद्रामध्ये मंत्रिपद भूषविले असून, सध्या ते उत्तर प्रदेशाचे राज्यपालपद भूषवत आहेत. प्रा. अरुण कांबळे यांनीही लेखन केले. या भागात धनगर वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे धनगरी नृत्य हा आटपाडीच्या संस्कृतीचा मुख्य घटक आहे. कोल्हापुरी फेटा हा मूळचा माणदेशातील लहरी पटका/फेटा आहे असे म्हणतात. 

जत : जत हे एक सांगली-विजापूर रस्त्यावर असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या भागाचा सातव्या शतकापासून इतिहासात उल्लेख सापडतो. तसेच स्थानिक लोकांच्या मते महाभारत व रामायणाशीही या ठिकाणाचा संबंध होता. विजापूर दरबारातील मूळचे राजस्थानमधील डफळे सरदार यांचे हे गाव. त्यांचा येथे एक वाडा आहे. शेजारीच प्रसिद्ध राममंदिर असून श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या सुंदर मूर्ती आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय नौदलात असलेले विजयसिंहराजे यांनी खासदार रूपाने जतची सत्ता सांभाळली.

हा भाग कायम दुष्काळी आहे. तरीही या भागातील अभियंता अशोक खाडे यांनी परिस्थितीवर मात करून उद्योजक म्हणून नाव कमावले. आज त्यांच्या उद्योगात मुंबई येथे ४५०० लोकांना रोजगार मिळाला आहे. 

उमराणी : जतजवळच उमराणी म्हणून ऐतिहासिक गाव आहे. या गावातच प्रतापराव गुर्जरांनी बहलोलखानास शरण येण्यास भाग पाडले; पण त्याने दयायाचना करताच उदारमनाने त्यांनी दया केली. त्यामुळे महाराजांची खप्पा मर्जी झाली. उमराणीमध्ये डफळे सरकारांची गढी आहे. गढीचा दरवाजा व बुरुज आणि काही जुन्या बांधकामांचे अवशेष दिसून येतात. बहलोलखानाच्या विरुद्ध प्रतापरावांनी मिळविलेल्या विजयाच्या आठवणीप्रीत्यर्थ गावकऱ्यांनी स्तंभ उभारला आहे. 

बनाळी बनशंकरीबनाळी : सांगलीच्या पूर्वेस हे सुंदर सहलीचे ठिकाण आहे. छोट्या टेकड्या व त्यातील वृक्षराजीमुळे हे ठिकाण मनाला आनंद देते. दुष्काळी भागात वसलेले हे ठिकाण सुंदर पर्यटनस्थळ आहे. चारी बाजूला छोट्या टेकड्या, मधोमध असणाऱ्या दऱ्यांमध्ये वेगवेगळ्या वृक्षांची गर्दी आहे. या परिसरात दोन मोठ्या विहिरी असून, एका विहिरीतून बनाळी गावास पाणीपुरवठा केला जातो. दुसऱ्या विहिरीने देवस्थान परिसरातील झाडे व इतर वापराकरिता पाण्याचा पुरवठा केला जातो. जत तालुक्यात वैराण माळरान असताना येथे मात्र हिरवेगार बन आहे. आकर्षक अशी श्री बनशंकरीची मूर्ती पाहायला मिळते. या गावात बनशंकरी देवीचे जागृत देवस्थान आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे गावात मांसाहार चालत नाही. मांसाहार करणारा कोणी शोधूनही सापडणार नाही. कोणी मांसाहार केला, तर त्याच्यावर जंगलातील मधमाश्या हल्ला करतात, अशी ग्रामस्थांची समजूत आहे. त्याची परीक्षा घेण्यास कोणी धजावत नाही. नवरात्रौत्सव येथे भक्तिभावाने साजरा होतो. 

या भागात असलेली इतर धार्मिक व पर्यटन स्थळे : श्री खरसुंडसिद्ध (खरसुंडी), तुंग येथे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेले श्री मारुती मंदिर, बेळंकीजवळ श्री सिद्धेश्वर मंदीर, पलूस येथील श्री धोंडी महाराज समाधी, वलवण येथील मोराचे थवे, राजेवाडी येथील इंग्रज काळातील तलाव, जत येथील श्री यलम्मा देवी मंदिर व श्रीराम मंदिर. 

कसे जाल सांगलीला? कोठे राहाल?
सांगली हे रेल्वे व रस्त्याने संपूर्ण भारताशी जोडलेले आहे. पुणे, दिल्ली, मुंबई, नागपूर, मदुराई, बेंगळुरू, अहमदाबाद, जोधपूर, दरभंगा या ठिकाणांशी रेल्वेने थेट जोडलेले आहे. राहण्यासाठी/भोजनासाठी मिरज, सांगली येथे चांगली व्यवस्था आहे. मे महिना सोडून वर्षभर जाण्यासाठी योग्य. 

या भागात सांगलीच्या येरळा नदीच्या पूर्वेकडील भागाची माहिती दिली आहे पुढील भागात पश्चिमेला सह्याद्रीपर्यंतचा भाग पाहू. 

(या लेखासाठी सांगली येथील कथ्थक नृत्यशिक्षिका कल्याणी पटवर्धन, हरिपूर येथील सतीश खंडागळे, गोल्ड रिफायनरी कारागिरांचे नेते दत्तात्रय देवकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू प्रमोद लाड यांचे सहकार्य झाले आहे.) 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 81 Days ago
I hope , all these articles will be published in the form of book. Best wishes Rs Es
0
0
जयश्री चारेकर About 85 Days ago
मस्त माहिती .सातारा,सांगली हा भाग बघायचा राहीलाय.या लेखाचा खूप उपयोग होईल
0
0

Select Language
Share Link
 
Search