Next
‘अपस्माराबाबत जागरूकता आवश्यक’
प्रेस रिलीज
Wednesday, November 14, 2018 | 12:58 PM
15 0 0
Share this article:

पुणे : योग्य वेळेत निदान आणि औषधोपचार यांमुळे अपस्मार (एपिलेप्सी) असलेल्या व्यक्ती देखील इतरांप्रमाणेच सामान्य जीवन जगू शकतात. त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव आढळतो म्हणूनच कुटुंबाकडून त्यांना सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे,’ असे मत तज्ञांनी व्यक्त केले.

१७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय अपस्मार दिवस (नॅशनल एपिलेप्सी डे) म्हणून पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर या आजाराबाबत असलेले गैरसमज आणि जागरूकतेचा अभाव यासंदर्भात माहिती देण्यात आली.

या विषयी बोलताना न्युरोलॉजिस्ट डॉ. राहुल कुलकर्णी म्हणाले, ‘अपस्माराबाबत अजूनही कमी जागरूकता व गैरसमज आहेत. ज्ञान आणि दृष्टीकोन यांत थेट संबंध असतो. दृष्टीकोन चांगला असेल, तर आपण याबाबत माहिती गोळा करतो व गैरसमज दूर करतो. अपस्माराबाबत हेच व्हायला पाहिजे. विशेषकरून महिलांमधील अपस्माराबाबत अधिक जागरूकता महत्त्वाची आहे. ज्या महिला अपस्माराने ग्रस्त असतात त्यांच्यात आत्मविश्‍वासाचा अभाव दिसतो. यातील ५० टक्क्यांहून अधिक महिला प्रजनन वयात असल्याने त्यांच्या मनात अनेक प्रश्‍न असतात. त्यामध्ये प्रजनन क्षमता चांगली राहील का, मूल झाल्यावर ते सुदृढ असेल का, स्तनपान करता येईल का, असे अनेक प्रश्‍न असतात; मात्र याबाबत त्यांना व्यवस्थित माहिती देणे गरजेचे आहे.’

‘अपस्मार हा इतर रोगांसारखाच एक सामान्य रोग असून, त्यासाठी योग्य निदान व औषधोपचार गरजेचे आहे. औषधोपचार व्यवस्थित केल्यास ९० टक्क्यांहून अधिक महिलांमध्ये असे कुठलेही प्रश्‍न उपस्थित होण्याची कदाचित शक्यता नसते. गरज आहे ती कुटुंबाकडून सहकार्याची. योग्य सहकार्य लाभल्यास आत्मविश्‍वास वाढण्यास मदत होईल,’ असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.

पेडियाट्रिक न्युरोलॉजिस्ट डॉ. संदीप पाटील म्हणाले, ‘अपस्माराचे पुण्यातील प्रमाण हे साधारण एक टक्का आहे. म्हणजेच पुण्यामध्ये साधारण ३४ हजार व्यक्तींना अपस्मार आहे. त्यापैकी सहा हजार लहान मुले ही सहा वर्षांखालील आहेत. अपस्माराचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसत असले, तरी बहुतांशवेळी त्याची सुरुवात १२ वर्षांच्या आतमध्ये सुरू होते. लहान मुलांमध्ये आढळत असलेल्या अपस्माराबाबत देखील लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. एखाद्या लहान मुलाला अपस्मार असल्यास त्याला जन्मभर औषधोपचार लागेल असे नाही. योग्य वेळेत निदान व उपचार केल्यास ७० ते ७५ टक्के मुलांना पुढे जाऊन औषधांची कदाचित गरज पडणार नाही. फक्त पाच टक्क्यांहून कमी मुलांमध्ये अपस्मारासाठी आयुष्यभर औषधोपचार करावे लागू शकतात.’

‘अपस्मार असलेली मुले इतर मुलांसारखीच नेहमीप्रमाणे शाळेत जाऊ शकतात व डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर विविध खेळ प्रकारात देखील सहभागी होऊ शकतात; मात्र असे करत असताना शाळेतील शिक्षक व प्रशासनाला त्यांना अपस्मार आहे ही माहिती देणे आवश्यक आहे. अपस्माराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या जीवनमानावर कमी जास्त प्रमाणात फरक पडत असला, तरी ते सामान्य व्यक्तीप्रमाणेच तितकाच दीर्घकाळ आयुष्य जगू शकतो हे देखील अधोरेखित करणे गरजेचे आहे,’ असे डॉ. पाटील यांनी नमूद केले.

‘अपस्मार आणि यांच्याशी संबंधित कोणत्याही विकाराच्या प्रकाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर व अचूक झाल्यास रुग्णाला योग्य ते उपचार मिळण्यात मदत होते. आपल्या समाजात या अपस्माराबद्दल असलेले गैरसमजुती बघता, या आजाराबाबत अधिक जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे,’ असे मत अ‍ॅबोटचे प्रादेशिक वैद्यकीय संचालक डॉ. बाला यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search