Next
गदिमा, बाबूजी, ‘पुलं’ना त्रिवेणी कार्यक्रमातून मानवंदना
रत्नागिरीत चित्पावन ब्राह्मण मंडळातर्फे आयोजन
BOI
Tuesday, November 06, 2018 | 03:16 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
गीतकार ग. दि. माडगूळकर, गायक, संगीतकार सुधीर फडके म्हणजेच बाबूजी आणि अष्टपैलू कलाकार पु. ल. देशपांडे ही महाराष्ट्राची दैवतं. अशा या त्रयीचा जन्मशताब्दी महोत्सव यंदा साजरा होत आहे. या त्रिमूर्तीमधील समान धागा म्हणजे यांचे संगीतातील अमूल्य योगदान. हाच धागा पकडून अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाने ‘त्रिवेणी’ या एका अप्रतिम मैफलीचे आयोजन रत्नागिरीत केले आहे.

हा कार्यक्रम ११ नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील जोशी पाळंद येथील चित्पावन मंडळाच्या ल. वि. केळकर विद्यार्थी वसतिगृह इमारतीतील श्री भगवान परशुराम सभागृहात होणार आहे. उदयोन्मुख हार्मोनियमवादक निरंजन गोडबोले यांच्या ‘सप्तसूर मुझिकल्स’ची ही निर्मिती आहे. मैफल सर्व रसिकांसाठी विनाशुल्क आहे.

प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी व निरंजन गोडबोले यांनी कार्यक्रमाची संकल्पना मांडली. या कार्यक्रमात रत्नागिरी, दापोली आणि चिपळूण येथील युवा गायक आणि वादक यात सादरीकरण करणार आहेत. यात अजिंक्य पोंक्षे, अभिजित भट, हिमानी भागवत, अभय जोग आणि प्रियांका दाबके हे गायक कलाकार सहभागी आहेत. निरंजन गोडबोले (हार्मोनियम), चैतन्य पटवर्धन (कीबोर्ड), उदय गोखले (व्हायोलीन), निखिल रानडे (तबला) आणि हरेश केळकर (तालवाद्य) असे वादक कलाकार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते, ऑर्गनवादक आणि ओघवती वाणी असलेले विघ्नेश जोशी करणार आहेत.

पुलं, बाबूजी आणि गदिमा या सरस्वतीपुत्रांनी आपल्या असामान्य कलाकर्तृत्वाने आपल्याला भरभरून देणे दिले आहे. आधुनिक वाल्मिकी असे ज्यांना म्हटले जाते, ते गीतरामायणासारखे अद्वितीय काव्य लिहिणारे गदिमा आणि त्या काव्याला तितक्याच समर्थपणे संगीताचा साज चढवणारे बाबूजी आपल्याला कायमच संस्मरणीय आहेत. आपल्या अफाट लेखणीतून विविधांगी आणि बहुआयामी साहित्य निर्माण करणारे पु. ल. देशपांडे म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटकच आहेत. अशा या संगीतमय त्रिवेणी संगमात न्हाऊन निघण्यासाठी चित्पावन ब्राह्मण मंडळाने रसिकांना आग्रहाचे आमंत्रण केले आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link