Next
‘एक पिढी घडली...
BOI
Saturday, July 07, 2018 | 08:00 AM
15 0 0
Share this story


‘वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या समाजातले सामाजिक प्रकल्प सुरू होत गेले. त्यातून कार्यकर्त्यांचा, शिक्षणाचा एक ओघ सुरू झाला. त्यातून गेल्या दहा-पंधरा वर्षांत एक पिढी तयार झाली आहे...’ सांगत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे.... आरती आवटी यांनी घेतलेल्या त्यांच्या प्रदीर्घ मुलाखतीचा हा सातवा भाग...
.........
अटल बिहारी वाजपेयीभटके आणि विमुक्त यांच्याबद्दलच्या कामाला सरकारकडून कशा प्रकारचा प्रतिसाद, मदत मिळाली?
गिरीश प्रभुणे : भटक्या-विमुक्तांच्या कामाला केंद्र सरकारचा निधी मिळत नव्हता. नोकऱ्यांमध्ये आकर्षण मिळत नव्हतं. नंतर महाराष्ट्रापुरतं आलं. राज्य घटनेमध्ये यांचा विशेष उल्लेख नव्हता. ते ‘ओबीसी’मध्ये धरले जायचे आणि महाराष्ट्रात यांचा वेगळा विभाग केल्यामुळे यांना केंद्राचा कुठलाच निधी मिळत नव्हता. त्या वेळेला केंद्रात वाजपेयींचं सरकार होतं. पंढरपूरला भटक्या-विमुक्तांचा एक मोठा मेळावा घेतला. सहा लाख भटके-विमुक्त आले होते. त्यामध्ये वाजपेयींनी नवीन आयोगाची घोषणा केली. अनुसूचित जमाती (शेड्युल्ड ट्राइब्ज) वेगळ्या, अनुसूचित जाती (शेड्युल्ड कास्ट्स) वेगळ्या. भटके-विमुक्त म्हणजे व्ही. जे. एन. टी.  सगळ्या देशभरात असून, त्यांची संख्या फक्त महाराष्ट्रातच दीड कोटी, तर देशभरात सुमारे दहा कोटी आहेत. तरीही त्यांचा जनगणनेत उल्लेख येत नाही. एकूण समाज शंभर कोटी असेल, तर हे धरून मग एकशे दहा कोटींचं बजेट उभं राहायला पाहिजे. त्याचा अभ्यास करण्याकरिता एक आयोग नेमण्यात आला. त्यानंतर लगेचच चार महिन्यांत सरकार गेलं. डॉ. मनमोहनसिंगांनी नंतर त्या आयोगावर बाळकृष्ण रेणकींची नेमणूक केली. म्हणजे आमच्या प्रयत्नांतनं जे-जे झालं, त्यात केंद्र स्तरावर एक आयोग नेमला गेला आणि राज्य स्तरावर नेमला गेला. राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं केंद्र व्हावं, असा प्रयत्न केला. म्हणजे भटक्या-विमुक्तांच्या विषयावर सरकारतर्फे काम सुरू झालं.

माझं ‘पारधी’ पुस्तक आलं, ते पुस्तक प्रमोद महाजनांनी महाराष्ट्रातल्या सर्व आमदारांना आणि सर्व खासदारांना सप्रेम भेट म्हणून पाठवलं. सर्वांनी ते वाचलं. वाचल्यानंतर अनेक आमदारांचे, खासदारांचे, काही मंत्र्यांचे फोन आले. त्यानंतर  २००७च्या बजेटमध्ये पारधी पुनर्वसनासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद केली गेली. आम्ही दिलेला एक आराखडाही त्यांनी स्वीकारला. दोन-तीन वेळा जयंतराव पाटलांची भेट झाली. त्यामुळे शासकीय पातळीवर जे काही थोडंसं दुर्लक्ष होतं, तेही या निमित्ताने दूर झालं. संपूर्ण महाराष्ट्रातल्या पारध्यांचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने हाती घेतलं. पोलीस खात्याला, जिल्हाधिकाऱ्यांना, तहसीलदारांना त्यांनी आदेश दिले. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यात पारध्यांची गावे किती आहेत, गावांत किती जण राहतात, कसे राहतात याचा आराखडा शासनापर्यंत आला.

यमगरवाडीत भटके-विमुक्त विकास परिषदेच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर गेल्या पंधरा-सोळा वर्षांत असा प्रवास झाला. आता शासकीय पातळीवर किमान इथपर्यंत आलंय. हळू-हळू ते मुख्य मार्गामध्ये समाविष्ट होईल. शासनाचं काम आज ठरवलं की उद्या होतं, असं नाही. ३१ मार्चपर्यंत त्यांचा जो काही खर्च व्हायला पाहिजे होता, त्यापैकी काहीच निधी खर्च झालेला नाही. हे मी मध्यंतरी बोललो. ते म्हणाले, ‘आम्ही बजेटमध्ये ३३ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे; पण सर्वेक्षणाच्या पलीकडे अजून काम नाही झालेलं.’ मी विचारलं, ‘काय कारण,’ तर, ‘कलेक्टरकडून तलाठ्याकडे यायला सहा महिने लागले. त्यातून त्यांच्या नेहमीच्या निवडणुका आणि त्या कामातनं हे काम करायला आणखी सहा महिने लागले. त्यामुळे आता पुढल्या वर्षी यातला काही पैसा खर्च होऊ शकतो,’ असं उत्तर मिळालं.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान एक तरी विकासाचं केंद्र उभारावं, यासाठी लागणारा आराखडा तयार आम्ही करून शासनाला दिलेला आहे; पण ते काम शासनानं करावं. त्यात आम्ही असं म्हटलं आहे, की आज जेवढ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत (खासगी व सरकारी), त्या प्रत्येकाने आपल्या परिसरातल्या भटक्या-विमुक्तांच्या, विशेष करून पारधी समाजाच्या मुलांची, किमान त्यांच्या शाळेतल्या संख्येच्या दहा टक्के मुलांची व्यवस्था करावी. शासनानं त्यांच्या निवासाची व्यवस्था करावी, म्हणजे वसतिगृहासाठी शंभर टक्के अनुदान द्यावं. असा दहा वर्षांचा आराखडा तयार केला, तर दहा वर्षांत महाराष्ट्रातल्या शेवटच्या टोकापर्यंत सुधारणा होईल. शासनानं तो आराखडा स्वीकारला आहे. परंतु अजून सर्वेक्षण करून कदाचित काही ठिकाणी २००८पर्यंत होईल. आम्ही सुचवलेले प्रकल्प आहेत, त्या-त्या ठिकाणी त्यांनी सहकार्य करायचं मान्य केलं आहे. 

पारध्यांप्रमाणेच अन्य जाती-जमातींच्या लोकांसाठीचं काम कसं सुरू झालं?
गिरीश प्रभुणे : पारध्यांप्रमाणेच डोंबारी-कोल्हाटी. लातूर जिल्ह्यात अंसरवाडा म्हणून एक गाव आहे. तिथे सुमारे दोनशे डोंबाऱ्यांची वस्ती आहे, गोपाळ समाजाची. रस्त्यावर कसरती करणं, भिक्षा मागून नेणं अशी कामं ते करतात. तिथं आम्ही क्रीडाभारती, संघाचे स्वयंसेवक आणि भटके-विमुक्त विकास परिषद यांच्या माध्यमातनं पालावरची एक शाळा सुरू केली. त्यातनं आता काही मुलं इतकी तयार झालेली आहेत, की या वर्षी इथे बालेवाडीला (पुण्यात) त्यांना योगासनं, खेळांचे सामने वगैरे दाखवण्याची संधी कदाचित मिळेल. कोल्हाटी समाजाचे किशोर शांताबाई काळे यांच्याशी परिचय झाला आणि लक्षात आलं की समस्या खूप गंभीर आहे. त्यांचं ‘कोल्हाट्याचं पोर’ हे आत्मकथन आल्यामुळे समजातल्या अनेकांना कळलं की समस्या काय आहे. त्यातली विकृतीही कळली. म्हणजे त्या आत्मकथनातनं लोकांनी वाईट अर्थही घेतले वेगळे. तोपर्यंत या समाजातली काही मुलं शिकायला लागली होती, मुलीही शिकत होत्या. आईचं नाव आलं, तर तोपर्यंत कोणी हसत नव्हतं. ‘कोल्हाट्याचं पोर’ वाचल्यानंतर, ‘अरे म्हणजे हे असं आहे. मग तुझी आई कुठे नाचायला जाते? तुझी आई कुठल्या तमाशात आहे? तुझी आई कुठल्या कलाकेंद्रात आहे,’ असं हिणवणं कॉलेजमधल्या युवकांनी सुरू केल्यामुळे काही मुलींनी कॉलेजं सोडली. माझ्या माहितीतल्या किमान तीसेक जणी अशा होत्या, की ज्या कॉलेजच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापर्यंत गेल्या होत्या, त्यांनी कॉलेज सोडलं. म्हणजे समाजात विकृती एवढी वाढली होती. पुस्तकं वाचून सामाजिकता वाढायला पाहिजे. त्याऐवजी विकृती आली. 

त्यातच एक घटना घडली. तोपर्यंत आम्ही त्या कोल्हाटी समाजात काम सुरू केलं नव्हतं. चेंबुरणीतल्या दोन मुली मला भेटायला आल्या. मुलींची आई नृत्यकाम करायची. एकीची आई ‘आर्यभूषण’मध्ये करायची, एकीची आई चेंबुरणीलाच कलाकेंद्र चालवायची. आता त्या ‘एमए, बीएड’पर्यंत शिकत आल्या आहेत. बारावीला असताना त्या काही तरी वाचून मोतीबागेत मला भेटण्याकरिता आल्या. म्हणाल्या, की आमची आई तुम्हाला भेटायला आली आहे. म्हटलं येऊ द्या. त्यावर म्हणाल्या, ‘नाही तुम्ही आधी खाली या, बघा, वर आली तर चालेल का सांगा.’ मी म्हटलं, ‘न चालायला काय झालं? तुझी आई आहे ती, इथं आली तर चालेल.’ तोपर्यंत त्यांनी स्वतःचा परिचय करून दिलेला नव्हता. त्या कॉलेजमधे जाणाऱ्या, व्यवस्थित कपडे केलेल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘आम्ही कोल्हाट्याच्या आहोत.’ वाटलं, इतकं काम करतो आपण पारध्यांचं त्याच्यात कोल्ह्याट्याचं न चालायला काय झालं? ‘चालत असेल तर मग चला खाली,’ म्हणाल्या. खाली आलो, तर त्या दोघी जणी मोतीबागेच्या बाहेर उभ्या होत्या. दोघींच्याही भडक साड्या, केसांचे आकडे, लिपस्टिक लावलेली, चेहऱ्यावर गोंदवलेलं, सगळं बघून लक्षात आलं, की या नृत्यामध्ये काम करणाऱ्या आहेत. एक थोडीशी स्थूल होती आणि एक अगदी बारीक. मी त्यांना म्हटलं, ‘चला या आत.’ मोतीबागेमध्ये पहिल्यांदा अशा प्रकारच्या स्त्रिया आल्या. मोतीबागेत आता माधव सभागृहाचं बांधकाम झालंय, तिथे आम्ही बसलो होतो. दामूअण्णा, दादा इधाते तिकडे होते. मी दोघांना सांगितलं, की ‘अशा-अशा दोघीजणी आल्या आहेत. माझा आजचाच परिचय आहे. तासभर माझ्या त्यांच्याशी गप्पा झालेल्या आहेत. त्या दोघींच्या आयाही आलेल्या आहेत. आपण जरा भेटू या.’ दामूअण्णांनासुद्धा काही कल्पना नाही. भेटायला आले आहेत कुणीतरी, पालक असतात. तसं भेटायला जाऊ. खुर्च्या मांडल्या, त्या आल्या. दामूअण्णा एकदम म्हणाले, ‘गिरिश यांच्याशी काय बोलणार आपण? चौकशी तरी काय करायची?’ ‘तू बोलत रहा,’ म्हणाले. आम्ही फक्त ऐकतो. दादाही म्हणाले, ‘माझा हा पहिलाच प्रसंग आहे.’ म्हटलं ठीक आहे. त्या दोघी जणी निरीक्षण करत होत्या. आमची काहीतरी कुजबुज चाललेली आहे. आता अशी कुजबुज त्यांच्या आयुष्यात कायम असते. अशी बाई कुठेही दिसली, की कुजबुज सुरू होते. आणि इथे आल्यानंतरसुद्धा कुजबुज झाली. त्या दोघीही अत्यंत नाराज झाल्या. चेहऱ्यावरून दिसत होतं. मी त्यांना म्हटलं, ‘हे बघा तुम्ही नाराज नका होऊ, आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ही पहिली घटना आहे.’ मोतीबागेमध्ये तोपर्यंत, म्हणजे या खालून वर येईपर्यंत अख्खी मोतीबाग इकडून तिकडून बघायला लागली होती. सगळे प्रचारक, सगळे कार्यकर्ते. आता प्रभुणेंनी हे काय चालवलेलं आहे, असा प्रश्न पडला सगळ्यांना. दादा आणि दामूअण्णांनी चौकशी केली. ‘ठीक आहे, चांगलं शिक्षण चाललंय. तुम्ही मुलींना शिकवताय खूप चांगलं आहे,’ असं म्हणून दोघे जण निघून गेले. 
मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही कुठे असता?’ ‘आर्यभूषण.’ मला आर्यभूषण नीट माहिती नव्हतं. म्हणजे मी इतकी वर्षं सामाजिक क्षेत्रात आहे, पण दहा वर्षांपूर्वीपर्यंत ‘आर्यभूषण’ हे काय आहे, ते पाहिलेलं नव्हतं. मला आर्यभूषण छापखाना माहिती होता.

काय आहे मग आर्यभूषण?
गिरीश प्रभुणे : आर्यभूषण हे तमाशा थिएटर आहे पुण्यात.

कुठे? पुण्यात?
गिरीश प्रभुणे : हो हो, पुण्यामध्ये. अल्पना टॉकीज आहे ना त्याच्या अलीकडे. तर, त्या म्हणल्या, की ‘मी ‘आर्यभूषण’मध्ये असते. तुम्ही उद्या याल का तिथे?’ मी म्हणालो, ‘हो येईन. तुम्ही राहताय तर येऊ.’ दुसऱ्या दिवशी त्या दोघी मुली आल्या. त्यापैकी एक अक्षरनंदन शाळेत शिक्षिका आहे आता. आणि दुसरी एमपीएससी परीक्षा पास झाली आहे आणि वर्ध्याला उपजिल्हाधिकारी आहे. त्या म्हणाल्या, ‘तुम्ही चला आपण जाऊ.’ माझ्याबरोबर नंदीवाल्यांच्या समाजातला दिलीप कानडे म्हणून एक कार्यकर्ता आणि बाळू कांबळे, असे आम्ही तिघेजण गेलो. ‘आर्यभूषण’ची ती बारी म्हणजे संगीत बारी, त्यातच तमाशाही असतो. तिथे तिकीट काढून जाता येतं. आम्ही काही तिकीट काढायला गेलो नाही. सकाळच्या वेळेला गेलो. एका मुलीनं तिथं सांगितलं, ‘इथं माझी आई आहे, आम्हाला भेटायचं आहे.’ आम्ही आत जाऊन बसलो. अगदी छोट्या अशा दहा खोल्या. त्या खोलीमध्ये मोठमोठ्या पेट्या होत्या आणि तिथेच त्या दहा-बारा जणी बसल्या होत्या. त्यांच्या लहान-लहान मुली तिथेच होत्या. कुणाची रांगणारी, कुणाची तान्ही. मला काही कळेना. त्याच ठिकाणी कोणी साडी बदलतंय, वगैरे वगैरे. मी मनात म्हटलं, ‘कुठे आलो आपण.’ आम्हाला घेऊन आलेली मुलगी आमच्याकडे बघत होती. म्हणाली, ‘हे आमचं जीवन आहे. तुम्ही हे पाहिलं नाही अजून. आणि तुम्ही भटके-विमुक्तांमध्ये काम करता. तुम्ही संघाचे आणि हिंदू. हा हिंदू समाजच आहे. यांच्यासाठीही काही करा.’ मग एक-एक खोली दाखवत होती ती. समोर मोठं आर्यभूषणचं थिएटर, बाकडी. दुपारी दोन वाजता नाचकाम सुरू होतं. रात्री बारा-एक पर्यंत चालतं. संपूर्ण नाना, भवानी पेठेतले व्यापारी तिथे ‘दौलतजादा’ करतात. म्हणजे ज्यादा झालेली दौलत उधळतात. म्हणाली, ‘आमची आई आणि या सगळ्या नाचतात. माझं बालपण इथंच गेलं. आई नाचायची आणि मी इथं पेंगुळलेली बसून राहायची. इथंच राहून मी शिक्षण केलं आणि मग आईनं मला वसतिगृहात ठेवलं. मला शिकवलं. आता मी ‘एमए’पर्यंत आले.’

वसतिगृहात म्हणजे यमगरवाडीत की इथे चिंचवडला?
गिरीश प्रभुणे : हो दोन वर्षं तिथेही होती. ती चेंबुरणीवरनं आली, कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये राहिली. ‘एमए’पर्यंत ती तिथे होती. नंतर मग सांगलीला एक वर्ष राहिली. नंतर ज्ञानप्रबोधिनीच्या वसतिगृहात राहिली, मग पाचगणीला काही वर्षं होती. एमए, बीएड झाली, एमपीएससी परीक्षा उत्तम प्रकारे पास झाली. नेमणूक ही झाली. आणि दुसरी मुलगीही पुण्यात कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये शिकली.

कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत त्या वेळी केवळ ब्राह्मण मुलींनाच प्रवेश दिला जात असे. ते त्या वेळचं सामाजिक वातावरण. आता कोल्ह्याट्यांच्या मुलीसुद्धा तिथे शिकल्या. मुस्लिमही आहेत. आता तर पारधी मुलीसुद्धा तिथे आहेत, यमगरवाडीतनं पुढे शिकायला आलेल्या. इतकं परिवर्तन समाजात झालेलं आहे. 

मग त्या मुली पुढे काय म्हणाल्या?
गिरीश प्रभुणे : त्या मुली म्हणाल्या, की असा हा आमचा समाज आहे. या सगळ्या बायका तिथे आंघोळीसुद्धा उघड्यावर करतात. तबलजी, पेटीवाले तिथेच असे खाली मान घालून बसतात. बाहेर टपरीवर रुपयाला चहा मिळतो. त्याला आत दहा रुपये घेतात; पण या बायकांकडे पैसा भरपूर असतो. आणि यांना होणारी मुलं, त्यांना बाप नाही. पुढारी, अमुक-तमुक, व्यापारी यांच्यापासुन मुलं होतात. ते कोल्ह्याट्याचं पोर. ते किशोर शांताबाई काळे म्हणून आईचे नाव लावतात. मग या सगळ्या म्हणाल्या, ‘आमच्या काही समस्या आहेत काका. त्यांचं काहीतरी केलं पाहिजे. तुम्ही सांगा.’ 

तिथून तो विषय सुरू झाला. किशोर शांताबाई काळे यांचं नेर्ले नावाचं गाव आहे, त्या नेर्ल्याला भारतमाता वसतिगृह आम्ही सुरू केलं आहे. सात वर्षं झाली. तिथे कोल्हाटी समाजाचे तीन पूर्ण वेळ कार्यकर्ते तिथे आहेत. एक अशोक तांबे आहेत, जे जात सांगायला घाबरत असत, ते आता स्वाभिमानाने सांगतात, की आम्ही कोल्हाट्याचे आहोत. त्यांना आम्ही इतिहासातली उदाहरणं सांगितली आहेत. इतिहासातली अनेक व्यक्तिमत्त्वं अशी आहेत, की त्यांचे बाप कोण आहेत, ते माहिती नाही. त्यामुळे तुम्ही काहीही कमीपणा मानू नका. आईचा श्रेष्ठपणा सांगून मग ते वसतिगृह सुरू झालं.

आज तिथे सत्तरेक मुलं-मुली शिकतात. भटके-विमुक्त विकास परिषदेचंच भारतमाता वसतिगृह सुरू झालं. त्या मुलीने तिथे नेलं त्या दिवशीची माझी अशी अवस्था होती, की मला उलट्या झाल्या बाहेर पडताना. इतक्या प्रकारचे वास होते. आंघोळी करायला त्यांना जागा नाही. सुस्वरूप देखण्या मुली... नाच करणाऱ्या... सतरा ते वीस-पंचवीस या वयोगटातल्या. परंतु वास, वेगवेगळ्या प्रकारचे वास. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं. या मुलीने त्यांना झापलं म्हणून. नाही तर त्यांना असं वाटलं, की आम्ही तिथे एखाद्या मुलीशी संबंध ठेवण्यासाठी आलो आहोत. त्यांच्या त्यांच्या भाषेत ते बोलत होते. आम्हाला काही कळत नव्हतं. बाईची तर किंमत होतेच, माणसाचीही किंमत होते. ते जोखतात लाखाचा आहे का, पाच हजाराचा आहे, आमदार आहे, का खासदार आहे, का मंत्री आहे? त्या बायकांची किंमत हे करतात. एक वर्षाची बोली असते त्यांची. हे सगळं तिनं दाखवलं आणि मी जे काही खाल्लं होतं ते उलटून पडलं. पुढे आठ दिवस मला भरपूर ताप होता. 

आपण किती सुरक्षित आहोत... आपली बहीण, आपली मुलगी, आपली आई, आपली बायको यांना काय सन्मान मिळतो. आणि मग यांना तो का नाही मिळत? त्यातनं मग किशोर शांताबाई काळे आणि त्या सगळ्यांचा परिचय झाला आणि त्या परिचयामध्ये खूप म्हणजे खूप शिकायला मिळालं. प्रत्येक दिवस हा माझ्या कामात शिक्षणाचा होता. फक्त एकच कारण म्हणजे संघाचा संस्कार.

आपला यमगरवाडीचा मुख्य कार्यकर्ता अशोक तांबे. त्याची आई नृत्यांगना होती. त्यांचं तमाशाचं गाजलेलं केंद्र होतं. त्यांचा मुलगा आता यमगरवाडीच्या प्रकल्पाचा मुख्य आहे. आता तो भविष्यात संघटनमंत्री होईल, म्हणजे एके काळी मी संघटन मंत्री होतो, तसा तो होईल. असे वेगवेगळ्या जातीतले, वेगवेगळ्या समाजातले प्रकल्प सुरू झाले. त्यातनं कार्यकर्त्यांचा, शिक्षणाचा एक ओघ सुरू झाला. गेल्या दहा-पंधरा वर्षांत एक पिढी तयार झाली आहे.
......
(क्रमशः)
(ही मुलाखत २००८च्या सुमारास घेतलेली आहे. त्यामुळे स्थळ-काळाचे संदर्भ त्यानुसारच लक्षात घ्यावेत, ही विनंती. या मुलाखतीचे सर्व भाग https://goo.gl/tvAKSg या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link