Next
अनामिक
BOI
Tuesday, October 10 | 02:56 PM
15 0 0
Share this story

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर आपल्याला वेगवेगळ्या व्यक्ती काही ना काही कारणांनी भेटत जातात. त्यातल्या काही आपल्याबरोबर राहतात, काही साथ सोडून निघून जातात. त्यांचं येणं आणि जाणं आपल्या हातात नसतं; पण अशा दूर गेलेल्या व्यक्ती आपला एक अमीट ठसा आपल्या आयुष्यावर उमटवून जातात. अशाच काही जुळलेल्या आणि काही तुटलेल्या अनामिक नात्यांच्या गोष्टी वैशाली फाटक-काटकर यांनी अत्यंत तरलपणे, संवादरूपी शैलीत ‘अनामिक’ या कथासंग्रहातून आपल्यासमोर आणल्या आहेत. त्याचा हा संक्षिप्त परिचय...
...............
वेगळ्या आशयाच्या असल्या तरी ‘अनामिक नाती’ या एकाच सूत्राखाली बांधल्या गेलेल्या चार दीर्घकथांचा संग्रह म्हणजे ‘अनामिक’. आधुनिक काळातले काही नाजूक प्रश्न सहजतेने मांडून ते समस्या बनण्यापूर्वी, सुसंस्कृत आणि प्रगत विचारसरणीच्या आधारे वेगळ्या प्रकारे हाताळता येतात याची जाणीव या कथा करून देतात.

प्रत्येक कथा एका मुख्य विषयावर आधारित असली, तरी ‘तुझ्या-माझ्यात’ ही केवळ एक प्रेमकथा न राहता अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला लावते. ‘लपंडाव’मध्ये कॉर्पोरेट आणि युवा पिढीचे जग वेगळीच दिशा घेत असलेले दिसते. ‘रियुनियन’ ही कथा येणाऱ्या प्रत्येक धूसर वळणावर पुढे काय होणार याची उत्सुकता वाढवत जाते; तर ‘गेले... ते दिन गेले!’मध्ये आयुष्यातील प्रत्येक टप्पा आपल्याला घडवत जातो.

दर्जेदार भाषा, संवादरूपी लेखन, विचार करायला लावणारे विचार, उत्कंठावर्धक प्रसंग डोळ्यांसमोर उभे करण्याचे लेखन कौशल्य यामुळे कथा वाचकाला खिळवून ठेवतात. पहिल्या वाक्यापासून पकड घेत हळूहळू उलगडत जाणारे कथानक, लिखाणातले शब्दखेळ, अलंकारिक भाषा सौंदर्य, खोलवर अर्थ दडलेले प्रगल्भ परिपक्व विचारांची कल्पना यामुळे लेखिकेने पदार्पणातच स्वतःची लेखनशैली निर्माण केली आहे, जेवढे अर्थपूर्ण मुखपृष्ठ तिने स्वतः तयार केले आहे.

संसारात ठहराव आलेल्या ‘निशी’च्या आयुष्यात मित्राचे पुनरागमन झाल्यावर ‘रियुनियन’चा सूर्योदय कशा प्रकारे होतो. नावातली महत्त्वाकांक्षा  स्वभावात उतरलेली ‘तनिशा’ आणि सरळ नाकासमोर चालणारी ‘श्वेता’ यांच्याबरोबर ‘लपंडाव’ खेळायला अनेकजण सामील आहेत. ‘गेले... ते दिन गेले!’ याची खंत न बाळगता नवीन जबाबदाऱ्या सांभाळत, स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवत आरोही, बकुळ, चंद्रिका आणि देविकाची मैत्री घट्ट ठेवण्याची खटपट. समुद्रकाठची कोरडी आणि ओली वाळू, यातील अस्पष्ट रेषा न मिटवू शकलेले ‘अनुराधा-आशुतोष’ जे ‘तुझ्या-माझ्यात’ होते ते तसेच का राहू देतात? 

कथांमध्ये व्यक्तिमत्त्वाला प्राधान्य दिले गेले असल्याने वाचताना प्रसंगांबरोबर व्यक्तिरेखाही परिपूर्ण अशाच समोर उभ्या राहतात आणि आपली छाप उमटवून जातात. ‘योगेश’चे गूढ स्मितहास्य, ‘देवच जाणो!’ म्हणून कुतूहल निर्माण करणारा ‘अनिश’, परिस्थितीची जाणीव असणारी ‘बकुळ’, वेळोवेळी मौलिक सल्ले देणाऱ्या ‘मिसेस प्रधान’, चेष्टेखोर ‘अमित’ किंवा प्रत्येकाला हाताळायची हातोटी ज्ञात असलेला ‘प्रशांत!’

नाती हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असला, तरी तितकाच तो गुंतागुंतीचा विषय आहे. त्यामुळे काही बंध ‘सर्वमान्यांच्या’ चौकटीत न बसल्याने किंवा त्यांना कायद्याच्या भाषेत ठराविक नाव देता येत नसल्याने ‘अनामिक’ राहतात. व्यावहारिक दृष्टिकोन समोर ठेवून लिहिल्या गेलेल्या कथा काळाप्रमाणे आपण आपली विचारसरणी बदलली पाहिजे हा संदेश नक्कीच देतात. कथा आपल्या सभोवती घडणाऱ्यांपैकीच एक आहे असे वाटते आणि वाचक वास्तविकतेशी, तसेच सद्य परिस्थितीशी संबंध लावू शकतील. सर्वांच्या मनात दडलेल्या विचारांची, लेखिका वैशालीने कथांद्वारे केलेली सुसूत्र बांधणी नक्कीच भावते आणि नकळत एक ‘अनामिक’ नाते निर्माण होते...

लेखिका : वैशाली फाटक-काटकर 
ई-मेल : vaishalee.katkar@gmail.com
प्रकाशक : मंगेश वाडेकर, अभिषेक टाइपसेटर्स अँड पब्लिशर्स, सदाशिव पेठ, पुणे ४११०३० 
फोन : (०२०) २४४७१०६१ 
पृष्ठे : २३९ 
मूल्य : २५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागवण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
RAKESH MORE About
Beautifully written book!! One gets connected to the stories.
1
0
Aparna Gulavani About
It was a pleasure reading this book. Each story is a tale of a unique relationship between the protagonists and unwinds beautifully throughout. All stories are set in contemporary situations, will certainly make every reader connect with them.
1
0

Select Language
Share Link