Next
मराठी भाषा आणि भारताबद्दल ज्यूंना ममत्व; नोहा मस्सील यांचे प्रतिपादन
बदलत्या माध्यमांशी जुळवून घेण्याचे दिलीप माजगावकर यांचे प्रकाशकांना आवाहन
BOI
Wednesday, May 29, 2019 | 01:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘जगभरात मदतीसाठी फिरलेल्या ज्यू लोकांना फक्त भारतात बंधुभावाने वागवले गेले. त्यामुळे भारताबद्दल आणि ज्या महाराष्ट्रात आम्ही राहिलो, तेथील मराठी भाषेबद्दल आम्हाला ममत्व आहे. भारताबाहेर मराठीसाठी कार्य केल्याबद्दलच्या पुरस्काराचा पहिला मानकरी म्हणवून घेताना आनंद वाटतो,’ अशी भावना इस्राइलचे नोहा मस्सील यांनी व्यक्त केली. तसेच, ‘डिजिटायझेशनच्या युगात बदलणाऱ्या माध्यमांशी प्रकाशक कसे जुळवून घेतात, यावर प्रकाशन व्यवसायाची पुढची वाटचाल ठरेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक, संपादक, प्रकाशक दिलीप माजगावकर यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे माजगावकर यांना जीवनगौरव पुरस्कार, तर नोहा मस्सील यांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

प्रा. मिलिंद जोशीपुण्यात नव्या पेठेतील निवारा सभागृहात २७ मे रोजी ‘मसाप’च्या ११३व्या वर्धानपदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘मसाप’चे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे होते. ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार आदी या वेळी उपस्थित होते.  

ऋचा बोंद्रेनवोदित गायिका आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कागर’ या मराठी चित्रपटाची पार्श्वगायिका ऋचा बोंद्रे हिने गायलेल्या ‘मोगरा फुलला’ या ज्ञानेश्वरांच्या रचनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या स्वागतानंतर परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. ‘पुण्यात भरलेल्या चौथ्या ग्रंथकार संमेलनात समारोपाच्या दिवशी साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली होती. त्याला लोकमान्य टिळकांनी पाठिंबा दिला होता. ही घटना मळेकर वाड्यामध्ये घडली होती आणि आज त्याच मळेकर वाड्यात बसून दिलीप माजगावकर ‘राजहंस’चे काम करत आहेत, हा एक विलक्षण योगायोगच म्हणावा लागेल,’ असे जोशी यांनी सांगितले. 

दिलीप माजगावकर‘‘मसाप’ची जन्मभूमी, ती ‘राजहंस’ची कर्मभूमी’
‘कोणालाही, कोणताही पुरस्कार मिळाला, तरी आनंद होतोच. परंतु हा वैशिष्ट्यपूर्ण आणि मोठा पुरस्कार ‘मसाप’ने मला दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. साहित्य परिषदेचे जन्मस्थान असलेल्या मळेकर वाड्यात गेली ५० वर्षे ‘राजहंस’चे काम सुरू आहे. त्यामुळे ‘मसाप’ची जन्मभूमी ही एका अर्थाने ‘राजहंस’ची कर्मभूमी ठरली असे म्हटले, तरी वावगे ठरणार नाही. मराठीतील ज्या निवडक समीक्षकांबद्दल माझ्या मनात नितांत आदराची भावना आहे, त्यापैकी एक असलेल्या डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते हा सन्मान होणे हा दुग्धशर्करा योग आहे. ‘राजहंस’ने आजवर केवळ प्रथितयश आणि दिग्गज लेखकांचीच पुस्तके प्रकाशित केली असे नव्हे, तर अनेक नवोदितांचे साहित्यही प्रकाशित केले आहे. लेखकाच्या लेखनाला आकार देणे, ओळख देणे, एक व्यक्तिमत्त्व देण्याचे काम संपादक करत असतात. त्यामुळे मला मिळालेल्या या पुरस्कारात ‘राजहंस’च्या अनेक लेखकांचाही तेवढाच सहभाग असल्याचे मी म्हणीन,’ अशा भावना जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी दिलीप माजगावकर यांनी व्यक्त केल्या. 

याबरोबरच त्यांनी आजच्या प्रकाशकांसमोर असलेल्या अडचणी आणि डिजिटल माध्यमांचे आव्हान याबद्दलही आपले मत व्यक्त केले. ‘ई-बुक आणि ऑडिओ बुकच्या या युगात या माध्यमांकडे आपण स्पर्धा म्हणून पाहतो, का त्यांना आत्मसात करून घेतो, यावर प्रकाशन व्यवसायाची यापुढील दिशा ठरणार आहे,’ असे प्रतिपादन त्यांनी केले. 

नोहा मस्सील‘भारताबाहेरील कार्यकर्त्याला दर वर्षी पुरस्कार द्यावा’
नोहा मस्सील म्हणाले, ‘ज्यूंना केवळ भारतात प्रेम मिळाले. भारताबद्दल आणि मराठी भाषेबद्दल आम्हाला प्रेम वाटते. दर वर्षी आम्ही इस्राइलमध्ये महाराष्ट्र दिन साजरा करतो. मराठीबद्दल आम्हांला फार प्रेम आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात, जिथे मराठीसाठी पुढाकार घेतला जातो, अशा ठिकाणी ‘मसाप’च्या वतीने माझा गौरव केला जात आहे, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. परिषदेतर्फे दर वर्षी असा पुरस्कार मराठीसाठी कार्य करणाऱ्या भारताबाहेरील मराठी माणसाला दिला जावा, अशी मी विनंती करतो.’ मस्सील यांनी स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम संस्थेला परत केली आणि त्यात भर घालून अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दिला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी मराठीबद्दल प्रेम व्यक्त करणारी एक स्वरचित कविताही या वेळी गाऊन सादर केली. 

डॉ. सुधीर रसाळ‘नव्या पिढीने वाचनसंस्कृती जपावी’
‘माजगावकर हे मराठीतील एक वेगळ्या प्रकारचे प्रकाशक आहेत, की ज्यांनी आपल्या प्रकाशनाला विषयाची मर्यादा आखून घेतली नाही. याशिवाय केवळ व्यवसाय वाढावा हा हेतू न ठेवता त्यांनी अनेक नवीन विषय समोर आणले. मराठी संस्कृतीचे एक नवे चित्र वाचकांना मिळेल अशी पुस्तके ‘राजहंस’ने दिली आहेत. लेखक घडवण्याचे, त्यांना लेखनासाठी प्रोत्साहन देण्याचे कामही माजगावकरांनी केले आहे. इतकेच नाही, तर व्यावसायिक असूनही सामाजिक बांधिलकीही ते जपून आहेत. वाचन संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत असताना आताच्या पिढीने या संस्कृतीची जपणूक केली पाहिजे आणि पुढील पिढ्यांमध्येही ती रुजवली पाहिजे,’ असे आवाहन डॉ. सुधीर रसाळ यांनी केले. 

‘देशाबाहेरील मराठी कार्यकर्त्याचा सन्मान पहिल्यांदाच’
‘भारताबाहेर मराठीसाठी दीर्घ काळ, मोठे कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान होणे, ही साहित्य परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणारी गोष्ट आहे. याचा विशेष अभिमान वाटतो. ज्ञान, विज्ञान आणि साहित्य हे भाषेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत. कोणतीही भाषा तोपर्यंतच जगू शकते, जोपर्यंत ती ज्ञान-विज्ञानाच्या वाहकनाडीत असते. त्यात जेव्हा विरोध निर्माण होतो, तेव्हा भाषेची वाढ खुंटते. भाषेत सातत्याने निर्मिती करत राहणारे जोपर्यंत आहेत, तोपर्यंत ती भाषा मरत नाही,’ असे मत ‘मसाप’चे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी मांडले. 

परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाला साहित्यिक नानासाहेब चपळगावकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 


अन्य पुरस्कार
दोन मुख्य पुरस्कारांबरोबरच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘मसाप कार्यकर्ता पुरस्कार’ रावसाहेब पवार (मसाप शाखा सासवड, ता. पुरंदर, जिल्हा पुणे) आणि नरेंद्र फिरोदिया (सावेडी उपनगर, शाखा अहमदनगर) यांना प्रदान करण्यात आले. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक ‘मसाप’च्या मावळ शाखेला देण्यात आला. राजन लाखे पुरस्कृत बाबूराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा नाशिक रोड (नाशिक) यांना देण्यात आला. विशेष बाब म्हणजे नाशिक रोड येथील ही शाखा पूर्णपणे महिला चालवतात. या पुरस्कारांबरोबरच परिषदेचे सर्व कर्मचारी तसेच देणगीदार यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

(कार्यक्रमाचे व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 115 Days ago
How much do the Marathi people know about Israel ? Does anybody study their language ? How many visit their country ? How many keep in touch with what goes on , in that country ?
0
0

Select Language
Share Link
 
Search