Next
‘वर्ल्डस्किल्स’मध्ये पुण्याच्या श्वेता रतनपुराला कांस्यपदक
ग्राफिक डिझाइनमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला
BOI
Thursday, September 05, 2019 | 02:49 PM
15 0 0
Share this article:

श्वेता रतनपुरा हिच्या सत्कारप्रसंगी मार्गदर्शक सतीश नारायणन व जयप्रकाश श्रॉफ

पुणे : ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेत ग्राफिक डिझाइन टेक्नॉलॉजी प्रकारात पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरण्याचा मान पुण्याच्या श्वेता रतनपुरा हिने मिळवला आहे. रशियातील कझानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल स्किल ऑलिम्पिक्स अर्थात ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेत ग्राफिक डिझाइन टेक्नॉलॉजी प्रकारात श्वेता रतनपुरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. अंतिम ३५ स्पर्धकांमधून उल्लेखनीय कामगिरी करत श्वेताने कांस्यपदकाची कमाई केली. केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान’अंतर्गत श्वेताने भारताकडून प्रतिनिधित्व केले. 

श्वेता पुण्यातील डिझाइन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्कूलची विद्यार्थिनी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल डिझाइन मीडिया आणि एंटरटेनमेंट स्कूलच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक जयप्रकाश श्रॉफ, डिझाइन मीडियाचे संचालक आणि श्वेताचे मार्गदर्शक सतीश नारायणन, श्रीदेवी सतीश, श्वेताचे वडील विनीतकुमार, आई अमिता यांच्यासह मीडिया डिझाइन अँड एंटरटेनमेंट स्कूलचे व्यवस्थापक विप्लव पाटीदार आदी उपस्थित होते. या वेळी कझानमध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या स्पर्धेची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.

दर दोन वर्षांनी इंटरनॅशनल स्किल ऑलिम्पिक्स अर्थात ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा रशियाच्या कझानमध्ये ही स्पर्धा झाली. जगभरातील ६३ देशांमधील १३५४ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. ४४ विविध प्रकारच्या कौशल्यांसह ४८ जणांचा भारतीय संघ या स्पर्धेत उताराला होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाने इतिहास रचत एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य आणि १५ जणांनी यशस्वी कामगिरीसाठी ‘मेडल ऑफ एक्सलन्स’ मिळवले आहे.

श्वेता रतनपुरा
श्वेता रतनपुरा म्हणाली, ‘जगभरातील ३५ स्पर्धकांशी माझा सामना होता. ‘वर्ल्डस्किल्स’ स्पर्धेसाठी इंडिया स्किल्सच्या प्रादेशिक स्पर्धेत भाग घेतला, तेव्हापासूनच गेल्या वर्षभरापासून सराव सुरू होता. हा प्रवास सोपा नव्हता. बऱ्याचदा नैराश्य, तणाव यायचा. त्यासाठी सतीश नारायणन यांचे मार्गदर्शन, आई-वडिलांचा पाठींबा आणि नियमित व्यायाम, योगा, ध्यान उपयुक्त ठरले. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवतानाच माझ्यातील नकारात्मक गोष्टी शोधून काढल्या आणि त्यावर काम केले. चार दिवसांच्या या स्पर्धेत विविध गोष्टी सहा तासांमध्ये करायच्या होत्या.’

‘इंडिया स्किल्स प्रादेशिक स्पर्धेनंतर ग्राफिक डिझाइन टेक्नॉलॉजीच्या ‘वर्ल्ड स्किल्स कझान २०१९’ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अनेक फेऱ्यांतून श्वेताची निवड करण्यात आली. डिझाइन मीडिया अँड एंटरटेनमेंट स्कूलमध्ये   मिळालेले सतीश नारायणन यांचे मार्गदर्शन व तिची मेहनत यामुळे भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी श्वेताने  केली आहे,’अशा शब्दात जयप्रकाश श्रॉफ यांनी तिचे कौतुक केले.

सतीश नारायणन म्हणाले, ‘‘वर्ल्डस्किल्स २०१३’ मध्ये मी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पहिल्यांदाच भारताकडून सहभागी झाल्याचा आनंद होता. मात्र, पदक जिंकण्यात मला यश आले नव्हते. आज माझ्या मार्गदर्शनाखाली श्वेताने कांस्यपदक जिंकत माझ्यासह भारतीयांना अभिमान वाटेल, अशी कामगिरी केली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search