Next
फिजिकल शेअर सर्टिफिकेटला रामराम
BOI
Saturday, September 15, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

सुमारे २२ वर्षांपूर्वी ‘डी-मॅट’ ही संकल्पना भारतीय शेअर बाजारात सुरू झाली. तरीही लिस्टेड कंपन्यांच्या एकूण शेअर्सपैकी जवळपास २.५ टक्के इतके शेअर्स ‘डी-मॅट’ झालेले नाहीत. ‘सेबी’च्या आदेशानुसार पाच डिसेंबर २०१८पासून फिजिकल म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपातील शेअर्सचे हस्तांतरण करता येणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे असे शेअर्स असतील, त्यांनी ते तत्काळ ‘डी-मॅट’करणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....
.........
‘डी-मॅट’मुळे सेटलमेंटचा कालावधी कमी होऊन, आता घेतलेल्या अथवा विकलेल्या शेअर्सची सेटलमेंट, टी+दोन म्हणजे खरेदी/विक्रीचा दिवस अधिक दोन कामकाजी दिवस (वर्किंग डेज) इतक्या कमी कालावधीत होत आहे. मागील २२ वर्षांच्या काळात बहुतांश शेअर होल्डर्सनी आपल्याकडे असलेले फिजिकल शेअर्स (कागदी प्रमाणपत्राच्या स्वरूपातील) याआधीच ‘डी-मॅट’ करून घेतले आहेत. तरीही लिस्टेड कंपन्यांच्या एकूण शेअर्सपैकी जवळपास २.५ टक्के इतके शेअर्स ‘डी-मॅट’ झालेले नाहीत. (विशेषत: वृद्ध शेअरहोल्डर्सचे शेअर्स, तसेच वारसा हक्कावरून वादात असलेले शेअर्स अद्याप डी-मॅट झाले नसल्याचे दिसून येते.) ‘सेबी’च्या आठ जून २०१८च्या आदेशानुसार पाच डिसेंबर २०१८पासून फिजिकल स्वरूपातील शेअर्सचे हस्तांतरण करता येणार नाही. (अपवाद फक्त शेअरहोल्डरच्या मृत्यूनंतर करावे लागणारे खाते हस्तांतरण. (अकाउंट ट्रान्समिशन) असे शेअर्स मृतांचे नॉमिनी/ कायदेशीर वारस/मृत्युपत्राच्या सूचनेनुसार संबंधितांना वर्ग करू दिले जातात.)

थोडक्यात, आता वर उल्लेखिलेल्या २.५ टक्के फिजिकल शेअर्सचे तातडीने ‘डीमटेरिलायझेशन’ करणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा असे शेअर्स हस्तांतरित होऊ न शकल्याने त्यांची खरेदी अथवा विक्री होणार नाही. परिणामी अशा शेअर्सना बाजारात किंमत राहणार नाही.याआधी कंपनीच्या प्रवर्तकांना फिजिकल फॉर्ममधील शेअर्सची खरेदी अथवा विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता ती सर्व प्रकारच्या शेअरहोल्डर्सना लागू झाली आहे. शेअर्स ट्रान्स्फरमध्ये होणारी अफरातफर कमी व्हावी व असे व्यवहार पारदर्शी व्हावेत, या उद्देशाने ‘सेबी’ने हे पाऊल उचललेले आहे.

अजूनही काही शेअरहोल्डर्सकडे असणारे शेअर्स फिजिकल फॉर्ममध्ये आहेत. त्यापैकी बहुतांश शेअरहोल्डर एक तर वयस्कर आहेत किंवा मृत आहेत, असे दिसून येते. शेअरहोल्डर मृत असेल व त्याच्या नावावर फिजिकल शेअर्स असतील, तर वारसांनी संबंधित कंपनीला त्वरित कळवून अशा शेअर्सचे हस्तांतरण करून घ्यावे. आजकाल असे शेअर्स हस्तांतरित करतानाच कंपन्या शेअर्स वारसाच्या ‘डी-मॅट’ खात्यात जमा करतात. असे असले तरी एखाद्या व्यक्तीस आपले शेअर्स अजूनही फिजिकल फॉर्ममध्येच ठेवायचे असतील, तर अशा प्रकारे डी-मॅट करणे बंधनकारक नाही; मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की अशा फिजिकल शेअर्सची आता आधीसारखी विक्री करता येणार नाही. यामुळे यातील गुंतवणूक लिक्विड राहणार नाही. याचा परिणाम म्हणजे आपल्या गरजेला अशा शेअर्सचा काहीही उपयोग होणार नाही. कारण अशा शेअर्सची विक्री करता येणार नाही किंवा तारण ठेवून कर्ज  घेता येणार नाही.

‘सेबी’च्या या आदेशामुळे प्रामुख्याने खालील फायदे दिसून येतील.
- शेअर्स ट्रान्स्फर करताना होणारे घोटाळे टाळले जातील.
- शेअर्स ट्रान्स्फर होताना चुका होणार नाहीत. 
- व्यवहारांतील सुरक्षितता वाढेल. तसेच गुंतवणुकीची तरलता (लिक्विडिटी) वाढेल.

‘डी-मॅट’ करणे ही प्रक्रिया अजिबात अवघड अथवा कटकटीची नाही. आपण बँकेत सेव्हिंग्ज खाते उघडतो, तसेच बँकेत अथवा ब्रोकरकडे डी-मॅट खाते सहजगत्या उघडता येते. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड व फोटो यांची आवश्यकता असते. ही सुविधा सध्या एनएसडीएल व सीडीएसएल या दोन डिपॉझिटरीमध्ये दिली जाते. या खात्याला वार्षिक ३५० ते ४५० रुपयांच्या दरम्यान फी आकारली जाते. काही ठिकाणी ही फी एकाच वेळीसुद्धा घेतली जाते. असे ‘डी-मॅट’ खाते उघडल्यावर जेथे ते खाते उघडले आहे तेथे यासाठी उपलब्ध असलेला फॉर्म भरून आपल्याकडील फिजिकल शेअर्स जमा करावेत. त्याची पोहोच घ्यावी, साधारणपणे ३० दिवसांच्या आत आपल्या उघडलेल्या डी-मॅट खात्यावर हे शेअर्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जमा होतात.


- सुधाकर कुलकर्णी
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search