Next
‘ग्लोबल चिपळूण’च्या बालचित्रकला स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
डोळ्यांवर पट्टी बांधून चित्रे काढणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक
BOI
Monday, December 03, 2018 | 01:43 PM
15 0 0
Share this story

ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडतर्फे शहरातील साने गुरुजी उद्यानात आयोजित केलेल्या बालचित्रकला स्पर्धांत सहभागी झालेले विद्यार्थी.

चिपळूण : येथील ग्लोबल चिपळूण टुरिझम मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बालचित्रकला स्पर्धांना शहरातील विविध शाळांतील मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. २२ ते २६ डिसेंबर २०१८ या कालावधीत होणाऱ्या बॅकवॉटर फेस्टिव्हल अॅंड क्रोकोडाइल सफारीच्या निमित्ताने ही स्पर्धा घेण्यात आली. शहरातील साने गुरुजी उद्यानात आयोजित या स्पर्धेत मिड्ब्रेन अॅक्टिव्हेशन या संकल्पनेच्या आधारे डोळ्यांवर पट्टी बांधून अफलातून चित्रे काढणाऱ्या रायझिंग अॅकॅडमीच्या वीस विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

या स्पर्धेत साडेतीनशे मुले सहभागी झाली होती. लहान-मोठा शिशुगट, पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी या चार गटांत ही स्पर्धा झाली. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या ठिकाणी कागद आणि विषय देण्यात आला. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी तहसीलदार जीवन देसाई, ज्येष्ठ चित्रकार रवींद्र धुरी, रायझिंग अॅकॅडमीचे राजेश भांदिगरे, ग्लोबल चिपळूण टुरिझम संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीज उपस्थित होते.

मिड्ब्रेन अॅक्टीवेशन या संकल्पनेच्या आधारे डोळ्यांवर पट्टी बांधून अफलातून चित्रे काढणारे रायझिंग अॅकॅडमीचे विद्यार्थी.

देसाई यांनी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. या वेळी युनायटेड हायस्कूल, सती हायस्कूल, मिरजोळी नॅशनल स्कूल, बांदल स्कूल, यश इंग्लिश अॅकॅडमी, गद्रे स्कूल, पाग झरी शाळा, खतिजा स्कूल, रिक्तोली शाळा, जिल्हा परिषद उक्ताड शाळा आदी विविध शाळांनी यात सहभाग घेतला. उदय मांडे, रेडीज सर, प्रेरणा लाड, मनीषा भांदिगरे, प्रल्हाद लाड, धोंडीराम शिंदे, विलास महाडिक, वणवे सर, श्रीमती मोरे, यादव, आखाडे, मिरगल आदी शिक्षक या वेळी उपस्थित होते.

स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित तहसीलदार जीवन देसाई, ज्येष्ठ चित्रकार रवींद्र धुरी, रायझिंग अॅकॅडमीचे राजेश भांदिगरे, ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष श्रीराम रेडीज.स्पर्धेच्या यशस्वितेसाठी ग्लोबल चिपळूण टुरिझमचे मॅनेजर विश्वास पाटील, आर्किटेक्ट शाहनवाज शाह, डिझायनर महेंद्र कासेकर, पर्यटनदूत समीर कोवळे, आत्माराम कासेकर, अभय पांचाळ, प्रणाली आंबडसकर, शितल पिसे, संपदा बाईत यांनी परिश्रम घेतले.

दरम्यान, या सर्व तालुकास्तरीय स्पर्धांचा निकाल २० डिसेंबरपर्यंत स्थानिक वृत्तपत्रात जाहीर केला जाईल. प्रत्येक गटात प्रथम तीन क्रमांकाना मानचिन्ह, प्रमाणपत्र, तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील. स्पर्धांतील विजेत्यांना संस्थेच्या बॅकवॉटर फेस्टिव्हल अॅंड क्रोकोडाइल सफारी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात २५ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता सन्मानित केले जाईल.

या दरम्यान रंगभरण, निबंध आणि फोटोग्राफी स्पर्धांही घेतल्या जाणार असून, यात चिपळूण परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी केले आहे.

स्पर्धांच्या माहितीसाठी संपर्क : विश्वास पाटील - ९८२३१ ३८५२४, ७०५७४ ३४३१९.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link