Next
‘‘ई-पाठशाळा’तून ‘सीए’च्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रशिक्षण’
‘आयसीएआय’च्या सीए नंदकिशोर हेगडे यांची माहिती
BOI
Saturday, June 08, 2019 | 04:56 PM
15 0 0
Share this article:

पत्रकार परिषदेत माहिती देताना सीए नंदकिशोर हेगडे, सीए प्रीती सावला, सीए ऋता चितळे, सीए उमेश शर्मा, सीए अभिषेक धामणे, सीए यशवंत कासार आदी.

पुणे : ‘सनदी लेखापाल परीक्षेकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे; मात्र खासगी कोचिंग क्लासेसच्या खर्चामुळे अनेकांच्या मनात सीए परीक्षा खूप खर्चिक असल्याचा समज असतो. प्रत्यक्षात ही परीक्षा अतिशय कमी खर्चात आणि लगेच काम मिळवून देणारी आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील विद्यार्थीदेखील सीए होऊ शकतात, हे आपल्याला ज्ञात आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पूरक साहित्य देण्यासाठी दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ‘ई-पाठशाळा’ उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे ‘सीए’च्या विद्यार्थ्यांना अद्ययावत आणि लाइव्ह शिक्षण मिळणार आहे,’ अशी माहिती ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए नंदकिशोर हेगडे यांनी दिली.

बिबवेवाडी येथील ‘आयसीएआय’ भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला ‘आयसीएआय’ वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलच्या अध्यक्षा सीए प्रीती सावला, उपाध्यक्ष सीए उमेश शर्मा, सचिव सीए राकेश आळसी, खजिनदार सीए यशवंत कासार, विभागीय समितीचे सदस्य सीए आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’च्या पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए ऋता चितळे, उपाध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सचिव समीर लड्ढा, सीए काशिनाथ पाठारे आदी उपस्थित होते. सनदी लेखापालांकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रमाणपत्रावर ‘युनिक आयडेंटिफिकेशन डॉक्युमेंट नंबर’ (युआयडीएन) असणे अनिवार्य आहे, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले.

हेगडे म्हणाले, ‘सीए अभ्यासक्रम कमी खर्चात करता येण्यासारखा आहे. गरीब कुटुंबातील मुलेही सीए करण्यासाठी आशावादी आहेत. सगळ्यांनाच क्लासेस लावणे शक्य होत नाही. शिवाय ग्रामीण भागात अशा प्रकारची सुविधाही नाही. त्यामुळे या मुलांना चांगले, अद्ययावत शिक्षण मिळावे, यासाठी ई-पाठशाळा उपयुक्त आहे. घरबसल्याही विद्यार्थी या आभासी क्लासचा शिकण्यासाठी उपयोग करू शकतो. चार ते सहा महिन्यांचे हे प्रशिक्षण असून, देशभरातील एक हजर ६४ शाखांमार्फत विद्यार्थी आणि प्रॅक्टिसिंग सीएंसाठी नियमित मार्गदर्शन, चर्चासत्रे, नव्या तंत्रज्ञान, तरतुदींविषयीची माहिती पुरविली जाते.’

प्रीती सावला म्हणाल्या, ‘महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांत एक लाख १६ हजार सीए काम करत आहेत. सीए शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सतत अद्ययावत ज्ञान देण्यासाठी आम्ही पुढाकार घेत असतो. सीएच्या काही परीक्षा डिझिटलायझ होत आहेत. पेपरचा पॅटर्नही बदलत आहे. शासन स्तरावर कर प्रणालीत होत असलेले बदल सनदी लेखापालांपर्यंत पोहोचावेत, यासाठी वर्षभर विविध उपक्रम रिजनतर्फे आयोजिले जातात. ‘युडीआयएन’ प्रत्येक सीएने वापरने बंधनकारक असून, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’

उमेश शर्मा म्हणाले, ‘वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यामुळे कर प्रणालीत सुसूत्रता आली आहे. कर भरणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. सुरुवातीला हा कायदा काही लोकांना जाचक वाटत होता; मात्र त्यातील सकारात्मक बदलांमुळे तो अधिक सुलभ होत आहे. येत्या काळात ‘ई-इन्व्हाइस’ चालू होणार आहे. त्यातून सर्व देयके संगणकीकृत होतील. व्हॅट आणि इतर जुने कर चुकता करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘सेटलमेंट ऑर्डीनन्स’ अर्थात व्हॅट करमाफी योजना आणली आहे. त्याचा फायदा अनेकांना होईल.’

राकेश आळसी म्हणले, ‘बहुतांश सीए हे इंडस्ट्रीमध्ये काम करतात. सीएच्या अभ्यासक्रमात वेळोवेळी बदल होत असतो, यात केस स्टडी, सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, आयटी ट्रेनिंग, कॅम्पस मुलाखत अशा प्रकारचे उपक्रम घेतले जातात. यामुळे कंपन्यांना खूप फायदा होतो. कारण निवड झालेल्या विद्यार्थाना स्पेशल कोर्सेस, सेमिनार आणि ग्रुप डिस्कशन घेण्यात येतात. यामुळे विद्यार्थी पूर्णतः प्रत्यक्ष कामालाही सुरुवात करू शकतो.’

सीए यशवंत कासार यांनी सीएंसाठी राबविण्यात येत असलेल्या तांत्रिक मार्गदर्शन सत्रांविषयी सांगितले. सीए ऋता चितळे यांनी प्रास्ताविक केले. सीए अभिषेक धामणे यांनी आयसीएआयच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. सीए समीर लड्ढा यांनी आभार मानले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search